पेल्विक ऑर्गन प्रोलॅप्स हा स्त्रियांमध्ये सामान्य असला तरी तो बहुतांश वेळा दुर्लक्षित होतो. वेळेत निदान व उपचार केल्यास हे स्थिती पूर्णपणे नियंत्रित करता येते. योग्य व्यायाम, आहार आणि वैद्यकीय मार्गदर्शन याने अनेक महिलांचे जीवनमान सुधारू शकते.

सीमा दोन महिन्यानंतर घरी आलेली. पण यावेळी तिला आईमध्ये काही बदल जाणवत होते. एरवी घरभर झपाझप चालणारी आई आज हळूहळू पावले टाकत होती, नी नेहमीचा उत्साहही गायब होता.
“आई, सगळं ठीक आहे ना?” सीमाने अगदी चार पाच वेळा विचारल्यावर आई उत्तरली, “गेल्या काही महिन्यांपासून पोटाखाली सारखं ओझं वाटतं. डॉक्टरकडे गेले होते. त्यांनी सांगितलं, पेल्विक ऑर्गन प्रोलॅप्स झालाय. माझ्यामुळे त्रास नको म्हणून नाही सांगितले तुला.”
“आई पण यात त्रास कसला, वरून आपण नियमित औषधे व व्यायाम करून स्थिती परत कशी नीट करते येऊ शकते ते बघूया.” हे ऐकून आईच्या डोळ्यात पाणी भरून आले.
हे पेल्विक ऑर्गन प्रोलॅप्स म्हणजे नक्की काय?
हा महिलांमध्ये आढळणारा एक सामान्य पण कमी जागरूकता असलेला आजार आहे. यामध्ये स्त्रीच्या पेल्विक भागातील अवयव – जसे की गर्भाशय, मूत्राशय, गुदद्वार हे आपल्या नैसर्गिक स्थितीतून खाली सरकतात किंवा योनीमार्गात आलेले दिसतात. याला अवयवांचे खाली घसरणे असे म्हणतात. या स्थितीबद्दल आज आपण सविस्तरपणे बघू.
पेल्विस म्हणजेच ओटीपोटाच्या भागात गर्भाशय, मूत्राशय, लघवी नळी गुदद्वार किंवा मलाशय, छोटे आतडे हे अवयव असतात. हे सगळे अवयव स्नायू, लिगामेंट्स आणि पेशी यांच्या सहाय्याने पेल्विक भागात स्थिर असतात. जेव्हा ही रचना दुर्बल होते, तेव्हा अवयव खाली झुकतात किंवा योनीमार्गात ढकलले जातात.
पेल्विक ऑर्गन प्रोलॅप्सचे वेगवेगळे प्रकार असतात:
पेल्विक ऑर्गन प्रोलॅप्स होण्याची कारणे व लक्षणे
अनेक वेळा नॉर्मल प्रसूती होणे, प्रसूती दरम्यान पेल्विक स्नायूंवर ताण येणे, वय वाढल्यामुळे स्नायूंमध्ये लवचिकता कमी होणे, मेनोपॉझनंतर इस्ट्रोजेन हॉर्मोनची कमतरता येणे, वारंवार जड वजन उचलणे, अस्थमा- धुम्रपानामुळे दीर्घकालीन खोकला असणे, दीर्घकालीन कब्ज किंवा जोर लावून शौच करणे, शस्त्रक्रियेनंतर पेल्विक स्नायूंमध्ये कमकुवतपणा येणे या कारणांमुळे पेल्विक ऑर्गन प्रोलॅप्स होण्याची शक्यता असते.
योनीमध्ये जडपणा किंवा खाली काहीतरी सरकत असल्याची भावना जाणवत राहणे, पाठदुखी किंवा कंबरदुखी, लघवी करताना अडथळा जाणवणे किंवा वारंवार लघवी होणे, शौचास त्रास होणे, लैंगिक संबंधांदरम्यान वेदना येणे, जास्त वेळ उभे राहिल्यावर जास्त त्रास जाणवणे, व काही वेळा योनीतून भाग बाहेर दिसून येणे ही लक्षणे दिसतात.
निदान कसे करतात?
सामान्यपणे डॉक्टर शारीरिक तपासणीद्वारे निदान करतात. काही प्रकरणांमध्ये पुढील चाचण्या सुचवल्या जातात जसे: पेल्विक अल्ट्रासोनोग्राफी, एम आर आय व लघवीसंबंधी समस्या असल्यास युरोडायनॅमिक टेस्ट केल्या जाऊ शकतात.
उपचारपद्धती:
जीवनशैलीतील बदल: वजन कमी करणे, जड वजन उचलणे टाळणे, कब्ज टाळण्यासाठी आहारात फायबर आणि पाणी वाढवणे, खोकला नियंत्रणात ठेवणे याने बऱ्यापैकी फरक पडू शकतो.
हार्मोनल थेरपी: विशेषतः मेनोपॉझनंतर इस्ट्रोजेन थेरपीचा उपयोग होतो.
शस्त्रक्रिया: वरील उपाय यशस्वी न ठरल्यास शस्त्रक्रियेचा उपाय असतो. यामध्ये, गर्भाशय काढून टाकणे, स्नायू व लिगामेंट्स दुरुस्त करणे, योनीमार्ग बंद करणे या शस्त्रक्रिया सुचविल्या जातात.
पेल्विक फ्लोअर व्यायाम कसे करावे व त्याचे फायदे
लघवी करताना जसे आपण प्रवाह थांबवतो, तशी पेल्विक स्नायूंची आकुंचन क्रिया करावी. ही स्थिती ५ ते १० सेकंद धरून ठेवावी मग सोडावी.
दररोज ३–४ वेळा, एकावेळेस १०-१५ वेळा करणे. यामुळे पेल्विक स्नायू बळकट होतात, प्रोलॅप्सची तीव्रता कमी होते, लघवीचे नियंत्रण सुधारते, शस्त्रक्रियेनंतर पुनर्वसनात मदत होते.
प्रोलॅप्सचा मानसिक आणि सामाजिक परिणाम:
काही स्त्रियांना या अवस्थेमुळे लाज वाटणे, आत्मविश्वास कमी होणे आणि लैंगिक नात्यांपासून दूर जाणे याचा त्रास होऊ शकतो.
ग्रामीण भागात याकडे दुर्लक्ष केल्याने स्थिती गंभीर होऊ शकते.
मनोरोगतज्ज्ञांचे सल्ले आणि समुपदेशन या महिलांसाठी उपयुक्त ठरू शकते.
पेल्विक ऑर्गन प्रोलॅप्सच्या निवारणासाठी प्रत्येक प्रसुतीनंतर योग्य पेल्विक एक्सरसाईज करणे, वजन नियंत्रणात ठेवणे, योग्य पोषण व हॉर्मोन संतुलन राखणे, वारंवार जड काम टाळणे या गोष्टी आवश्यक असतात.

- डॉ. श्वेता राऊत मुळगावकर