गर्भधारणेदरम्यान पित्ताशयाचा त्रास

गर्भधारणेदरम्यान पित्ताशयाचा त्रास हा एक सामान्य पण दुर्लक्षित विषय आहे. हार्मोनल बदल, गर्भधारणेत वाढणारा दाब आणि पित्ताशय रिकामे होण्याचा वेग कमी होणे ही यामागील मुख्य कारणे आहेत.

Story: आरोग्य |
3 hours ago
गर्भधारणेदरम्यान पित्ताशयाचा त्रास

शिल्पा तिसऱ्या तिमाहीत होती. तिचं बाळ व्यवस्थित वाढत होतं आणि घरात आनंदाचं वातावरण होतं. पण एक दिवस अचानक तिच्या हाता- पायांच्या तळव्यांवर तीव्र खाज सुटायला लागली. रात्री झोप येत नव्हती कारण ती सतत खाजवत होती. फक्त जळजळ, खाज आणि तीव्र वेदना.. पण कुठलं दिसायला दिसणारं नव्हतं. डॉक्टर ने सांगितले की हा कोणताही चर्मरोग नसून, तिच्या यकृतातून पित्त वाहणे कमी झाले आहे आणि त्यामुळे पित्तातील आम्ल रक्तात वाढले आहे — ही अवस्था कोलेस्टेसिस ऑफ प्रेग्नन्सी असू शकते. त्यावर तिला नियमित तपासणी, रक्त चाचण्या आणि बाळाच्या आरोग्यावर फायदेशीर उपचार सुचवले गेले, कारण ही अवस्था आई आणि बाळ दोघांसाठीही गंभीर परिणाम निर्माण करू शकते.

गर्भधारणेदरम्यान महिलांच्या शरीरात अनेक हार्मोनल आणि शारीरिक बदल घडतात. या बदलांचा परिणाम पचनसंस्थेवरही होतो आणि काही महिलांमध्ये पित्ताशयाचे (गोलब्लॅडरचे) विविध त्रास वाढू शकतात. गर्भधारणेच्या काळात पित्ताशयात खडे (गोलस्टोन्स) तयार होणे, पित्ताशयातील सूज (कोलॅसीस्टायटीस) किंवा पित्तवाहिनीत अडथळा येणे (कोलेडीकोलिथीएसीस) या प्रकारचे त्रास उद्भवू शकतात. योग्य वेळी निदान झाले तर हा त्रास सहज नियंत्रित करता येतो, आणि गर्भवती महिला तसेच बाळ दोघांचीही सुरक्षितता राखली जाऊ शकते. 

गर्भधारणेदरम्यान पित्ताशयाचा त्रास होण्याची शक्यता का असते?

१. हार्मोनल बदल

  गर्भधारणेदरम्यान शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरोन या दोन्ही हार्मोन्सचे प्रमाण वाढते.

  इस्ट्रोजेनमुळे पित्तात कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. यामुळे खडे तयार होण्याची शक्यता जास्त असते.

  प्रोजेस्टेरोनमुळे पित्ताशयाची हालचाल मंदावते, पित्त साठून राहते व खडे तयार होण्याचा धोका असतो.

२. पित्ताशय रिकामे होण्याचा वेग कमी होणे

 गर्भाशय वाढल्यामुळे पोटातील अवयवांवर दाब येतो.

  यामुळे पित्ताशय पूर्णपणे रिकामे होत नाही आणि पित्त जाड होत जाते.

३. वारंवार उलट्या (पहिल्या तिमाहीत)

  शरीरातील इलेक्ट्रोलाइट बदल

  पित्ताची गती मंदावणे

४. जास्त वजन व जनुकीय कारणे

 बी.एम.आय. जास्त असलेल्या महिलांमध्ये

  कुटुंबात गोलस्टन्स चा इतिहास असल्यास

गर्भधारणेदरम्यान होणारे मुख्य पित्ताशयाचे विकार

१. पित्ताशयात खडे होणे

ही सर्वात सामान्य समस्या आहे. पित्तात कोलेस्टेरॉल जास्त असल्यास किंवा रक्तातील बिलिरुबिन जास्त असल्यास पित्ताशयात खडे होऊन पित्त नलिकांमध्ये अडकल्यामुळे पोटात वेदना निर्माण करू शकतात.

२. अॅक्युट कोलेसीस्टायटीस (पित्ताशयाचा अचानक उद्भवणारा तीव्र दाह/सुजणे)

  खडे पित्ताशयाच्या नलिकेत अडकल्यास किंवा गंभीर आजारांनी, रक्तात संसर्गामुळे पित्ताशय सुजू शकतो.

  यामुळे त्या भागात तीव्र वेदना, ताप आणि थंडी वाटणे, सूजलेला भाग स्पर्श केल्याने वेदना, घसा/जुलाब, उलट्या, भूक कमी होणे हे दिसून येते.

३. पित्तवाहिनीत खडा अडकणे (कोलेडीकोलिथीएसीस)

 अत्यंत गंभीर स्थितीत पित्ताशयातून निघालेला खडा पित्तवाहिनीमध्ये अडकतो आणि पित्ताचा प्रवाह बंद होतो.

४. पॅनक्रियाटायटिस

खडा पॅनक्रियाजच्या नलिकेत अडकल्यास

 आकस्मिक वेदना, जॉन्डीस व ताप येऊन ही आपातकालीन स्थिती असू शकते.

लक्षणे

गर्भधारणेदरम्यान पित्ताशयाच्या विकारांमध्ये खालील लक्षणे जाणवू शकतात:

उजव्या पोटाचा वेदना:

  पोटाच्या वरच्या उजव्या भागात तीव्र किंवा बोथट वेदना जाणवतात

  वेदना सामान्यपणे काही तास टिकू शकतात.

 अनेकदा भूक लागल्यानंतर किंवा चरबीयुक्त खाताना वेदना वाढतात

 वेदना खांदा किंवा पाठीकडे जाऊ शकतात

उलट्या/ मळमळ:

 पोटदुखीसोबत मळमळ किंवा उलट्या येऊ शकतात.

  काही लोकांना भूक कमी वाटणे जाणवते.

पोट फुगणे किंवा गॅसची तक्रार

जॉन्डीस (त्वचा/डोळ्यांचा पिवळेपणा)

  पित्तवाहिनी अडकल्यामुळे त्वचा आणि डोळे पिवळे दिसू शकतात.

  मल पांढऱ्या/चिकण रंगाचे आणि मूत्र गडद रंगाचे होऊ शकते.

जर लक्षणे वारंवार किंवा तीव्र असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला आवश्यक असते.

निदान 

गर्भधारणेत सुरक्षित पद्धती वापरून निदान केले जाते:

१. सोनोग्राफी 

  गर्भधारणेत पूर्णपणे सुरक्षित

  खडे, सूज, द्रव साठा स्पष्ट दिसतो

२. रक्त तपासण्या

  लिव्हर फंक्शन टेस्ट (LFT)

  बिलिरुबिन

 पॅनक्रियाज एन्झाईम्स (अमायलेज, लाइपेज)

  इन्फेक्शन तपासणीसाठी सी.बी.सी.

३. विशेष प्रसंगी एम. आर. सी. पी.

 एक्स-रे नसलेली एम आर आय आधारित ही पद्धत पित्तवाहिनीत खडा असेल तर शोधण्यास उपयुक्त असते

उपचार 

उपचार गर्भधारणेच्या तिमाहीनुसार ठरतात.

 १.पहिल्या तिमाहीत

  यादरम्यान शक्यतो शस्त्रक्रिया टाळली जाते. औषधोपचार, वेदनाशामक, अँटिबायोटिक्स द्वारे आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जातो.

  लहान, हलका, कमी तेलाचा आणि कमी चरबीचा आहार करण्यास सुचविला जातो.

 २. दुसरी तिमाही-सर्वात सुरक्षित काळ

  दुसरी तिमाही हा सर्वात सुरक्षित वेळ मानला जातो कारण यादरम्यान गर्भातील वाढणाऱ्या बाळावर तुलनेने कमी परिणाम होतो. लॅप्रोस्कोपिक कोलेसिस्टेक्टॉमी (लहान छिद्रे करून गोलब्लॅडर काढणे) ही सामान्यपणे सुरक्षित आणि प्रभावी पद्धत असते. 

३. तिसरी तिमाही

  शस्त्रक्रिया कठीण असते कारण गर्भाशय मोठा असतो. पण गंभीर किंवा सतत लक्षणे असतील तर तिमाहीचा विचार न करता सर्जरी केली जाऊ शकते.

  बहुतेक वेळा प्रसूतीनंतर शस्त्रक्रिया केले जाते.

बिलिअरी डक्ट स्टोन/ कोलेडीकोलिथीएसीस:

जर पित्तवाहिनीत खडा अडकून जॉन्डीस, अत्यधिक वेदना किंवा पँक्रियाटायटिसचे लक्षण दिसले तर ई आर सी पी (एंडोस्कोपी शस्त्रक्रिया)करून खड्यांना काढले जाते.

या प्रक्रियेमुळे पित्तवाहिनीतील ब्लॉकेज दूर होते आणि इंफेक्शन, पँक्रियाटायटिसचा धोका कमी होतो.

गर्भधारणेदरम्यानचा कोलेस्टेसिस (तीव्र खाज येण्याची स्थिती)

यामध्ये उर्सोडेऑक्सीकॉलिक अॅसिड डॉक्टरांचा सल्ला घेऊन दिले जाऊ शकते ज्याने कडक खाज व पित्त प्रवाह सुधारला जातो. अॅ-लुकवर्म बाथ, थंड पॅक लावणे यासारखे तात्पुरते उपाय केले जाऊ शकतात. 

आहार आणि जीवनशैली

गर्भधारणेत पित्ताशयाचा त्रास कमी करण्यासाठी:

  कमी तेलकट, तिखट आणि मसालेदार पदार्थ

  हलका, कमी चरबीयुक्त आहार

  ताजे फळ, भाजीपाला

  भरपूर पाणी

  लहान पण वारंवार जेवण

  तळलेले पदार्थ टाळावेत

उपचार न केल्यास खालील गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात:

  तीव्र पित्ताशयातील सूज

  पित्तवाहिनीत अडथळा

  पॅनक्रियाटायटिस

  उच्च ताप व इन्फेक्शन

  गर्भातील बाळावर परिणाम (अकाली प्रसूतीची शक्यता)

गर्भधारणेदरम्यान पित्ताशयाचा त्रास हा एक सामान्य पण दुर्लक्षित विषय आहे. हार्मोनल बदल, गर्भधारणेत वाढणारा दाब आणि पित्ताशय रिकामे होण्याचा वेग कमी होणे ही यामागील मुख्य कारणे आहेत. योग्य वेळी निदान, सुरक्षित तपासण्या आणि योग्य काळानुसार उपचार केल्यास माता आणि बाळ दोघेही पूर्णपणे सुरक्षित राहतात. 

दुसरी तिमाही शस्त्रक्रियेसाठी सर्वात सुरक्षित मानला जातो, तर लहान आहार बदल आणि वैद्यकीय सल्ला यामुळे लक्षणे प्रभावीपणे नियंत्रित करता येतात.


- डॉ. श्वेता राऊत मुळगावकर