आज ताटपुळे कुटुंबाच्या स्वयंपाकघरात वादळापूर्वीची शांतता होती. विणाबाई अचानक गायब झाल्याने गॅस, कुकर आणि मिक्सर मामांना घरातल्यांची काळजी वाटू लागली. विणाबाईंच्या अनुपस्थितीमुळे भांड्यांना सुट्टी मिळाली, पण सर्वांना चिंतेने घेरले.

आज सगळीकडे वादळापूर्वीची शांतता पसरली होती. मिस्टर ताटपुळे व त्यांच्या पत्नी विणाबाई ताटपुळे यांच्यात कदाचित भांडण झाले असेल, कदाचित शीतयुद्धही असू शकते. विणाबाई फक्त चहा करून किचनमधून खूप सकाळी निघून गेल्या होत्या. स्वयंपाकाची चाहूलच नव्हती किचनमध्ये. सकाळी पाच ते साडेसात वाजेपर्यंत होणारी विणाबाईंची घाईगडबड नव्हती. या गेल्या तरी कुठे? निव्वळ शांतता! घड्याळ आता डोळ्यात तेल घालून विणाबाईंची वाटच पाहत होते. आज सकाळी सकाळी गॅस भाऊवर तवे काका चढून तापले नव्हते. कुकर काका तर विचारात होते, 'आज आमच्या मुलीला, शीट्टीला अचानक रविवार नसताना सुट्टी कशी भेटली?'
मिक्सर मामा गपचूप मिशीत हसतच आराम फर्मावत होता. कात्री काकींना मात्र विणाबाईंची खूप काळजी वाटत होती. त्यांना त्या गेल्या तरी कुठे याची खात्री करायची होती, म्हणून त्या किचनच्या खिडकीतून डोकावण्याच्या प्रयत्नात होत्या. विळी वहिनी तर आज 'आपल्याला सुट्टी, तर स्पा ट्रीटमेंट घेऊन धार कोण करेल काय?' याच विचारात होती. एरवी सकाळी पाच वाजता सुरू होणारी वॉशिंग मशीन मावशी पण आज वाटच पाहत उभी होती. एवढ्यात पाठ खाली पाय वर करून झोपलेले पोळपाट पणजोबा म्हणाले, “विणाबाई ठीक तर आहेत ना? खूप काळजी वाटते मला.” त्यावर रवी दादा वरून म्हणाले, “काळजी नको उगाच, झोपा तुम्ही गपचूप पाय वर करून. उगीच नको बडबड आणि चिंता.” चमचे चाचू सहमत होत म्हणाले, “पण कुठे गेले, काहीच कळेना.” बघता बघता दुपार होत होती. पातेले पप्पा म्हणाले, “आज आम्हालाही सुट्टी वाटते, पण विणाबाईंची काळजी आहे.” कारण एका गॅसवर चपाती, दुसऱ्यावर डाळ, इंडक्शन अंकलवर चहा, दूध, भाजी, मशीन मावशीमध्ये कपडे, विळी वहिनीवर भाजी, नारळ, सासूबाईंना कोरा चहा, सासऱ्यांना दुधाचा गुळाचा चहा तो पण वेळेवर, बाईचे टिफिन व नाश्ता, आंघोळ, डाळीला फोडणी टाकून दुसऱ्या बाजूला बाबूला आंघोळ घालून नाश्ता भरवणे, मिस्टर ताटपुले यांची ऑफिसची सगळी तयारी करून ती एकदम साडेसात वाजता एका मास्टर शेफप्रमाणे काम खतम कदम पीछे केल्यासारखी झालेली विणाबाईंची स्थिती. एवढे सगळे काम एकदाच करताना झालेली विणाबाईंची दमछाक व तो रुचकर स्वयंपाक करणाऱ्या लाडक्या विणाबाई नाहीत, हो, दिसत! सगळे चिंतेत. भांड्यांना सुट्टी मिळाली, पण सर्वांना घरातल्यांची चिंता.
तेवढ्यात बाहेरून आवाज आला. छोटा बाबू हातात आईस्क्रीम कप व चिमटीत छोटी चमची घेऊन बेसिनकडे टाकून गेला. चिमुकली चमची सर्वांना बघून हसली आणि विचारले, “का हो तुम्ही सगळे एवढे चिंतेत?” तर चमचीला एकच प्रश्न, “कुठे होतीस तू? सगळे घरातले बरे तर आहेत ना? विणाबाई कुठे आहेत?” चिमुकली चमची म्हणाली, “अहो थांबा थांबा! सगळे बरे आहेत, काळजी करू नका. आणि मी बाबू आणि सगळ्या ताटपुळे कुटुंबाबरोबर नवीन झालेल्या हॉटेल 'आम्ही सारेच खवय्ये' मध्ये आता जाऊन आलो. जेवण मस्तच होते बुवा.” सगळ्यांना ऐकून खूपच आनंद झाला. सर्वांनी सुटकेचा श्वास सोडला व हसायला लागले. हसता हसता पातेले पप्पा हसून हसून खाली पडले व मोठ्याने ओरडले, “बरे झाले! विणाबाईंना आज सुखाचा आराम व आम्हा सर्वांना सुट्टी व विश्रांती! आणि कारण फक्त एकच: आम्ही सारेच खवय्ये.”

- श्रुती परब