गोमंतभूमी आज केवळ पर्यटन आणि सौंदर्यासाठी नव्हे, तर धार्मिक आणि सांस्कृतिक समृद्धीसाठी ओळखली जात आहे. दक्षिण गोव्यात उभारलेला श्रीरामांचा ७७ फुटी भव्य पुतळा याच श्रद्धेचे आणि एकतेचे प्रतीक आहे.

गोमंतकाच्या नसानसात सौंदर्याची खाण बहरलेली आहे,
श्रीरामाच्या आगमनाने अवघी गोमंतक नगरी आनंदाने सजली आहे.
गोवा म्हणजे समुद्रकिनारे, शेती, कुळागरे आणि पर्यटनाचे अविस्मरणीय असे ठिकाण. पण आज आपला गोवा आपल्या एकूण सौंदर्यात प्रगती करताना दिसतो. आज गोवा धार्मिक अनुषंगाने देखील प्रगती करत आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे, अलीकडेच दक्षिण गोव्यात गौड सारस्वत ब्राह्मण वैष्णव यांच्या श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठाच्या ५०५व्या वर्षाच्या प्रसंगी श्रीरामाचा ७७ फूट उंच पुतळा उभारण्यात आला. त्याचे अनावरण आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदींनी केले. गोमंतकात रूढ झालेला हा श्री रामांचा पुतळा केवळ धार्मिक संस्कृतीचा भाग राहिलेला नाही, तर गोमंतकीय जनतेच्या श्रद्धेची आणि सांस्कृतिक समृद्धीची ही जिवंत निशाणी आहे.
सत्य, धर्म, आदर्श, मर्यादा या सर्व गुणांचे प्रतीक म्हणजे श्रीराम. अशा आदर्श गुणरुपी रामाचा पुतळा उभारून गोव्यातील जनतेत सकारात्मकता, शांतता आणि सद्भावना नक्कीच बहरेल. गोव्यात अनेक पंथाचे, जातींचे लोक राहतात. मंदिरे, चर्चेस , मशिदी गोव्यामध्ये आपापल्या पद्धतीने परंपरा साजरी करतात. अशा सर्वसमावेशकतेच्या संस्कृतीत श्री रामांचा पुतळा उभारल्याने एका नवीन अध्यायाची भर पडली आहे. केवळ हिंदू धर्मापुरती सीमित न राहता हा नवा शिल्पस्मारक गोव्यातील सर्व समाजबांधवांना एकत्र आणणारा आहे. त्यामुळे 'गोवा हा सर्वांचा आहे' हा संदेश गोव्यात आज महान ठरला आहे.
गोव्याच्या दक्षिण भागात वसलेला हा श्री रामांचा पुतळा महत्त्वाच्या पर्यटकस्थळांपैकी एक बनलेला आहे. पर्यटकांसाठी केवळ आकर्षण नाही, तर भारतीय संस्कृती जपण्याचा एक अनुभव श्री रामांच्या शिल्पस्मारकातून समाजाला मिळणार आहे.
आज या आधुनिकीकरणाच्या काळात समाजात सत्य, समता, निष्ठा या मूल्यांची खरोखर आवश्यकता आहे. श्री रामांचा पुतळा उभारून गोव्यातील भूमीने अशा मूल्यांना आत्मसात केले आहे. त्यामुळे, आता वेळ आहे ती समाजातील लोकांनी श्रीरामाचे आदर्श आणि मनमिळावू विचार आत्मसात करून सकारात्मकतेचा दीप लावण्याची. कारण श्रीरामाचे विचार मोठे आहेत, त्यांचा आदर्श घेऊन पाऊल टाकणे ही आज समाजातील बांधवांची जबाबदारी आहे.
आजच्या आधुनिक युगात समाजात सत्य, समता, निष्ठा आणि आदर्श अशा मूल्यांची जास्तच गरज आहे. गोव्यात उभारलेला श्रीरामांचा भव्य पुतळा या मूल्यांचे जीवंत प्रतीक आहे. समाजातील प्रत्येकाने श्रीरामांचे आदर्श आत्मसात करून सकारात्मकतेचा दीप पेटवला पाहिजे, आणि एकतेचा मार्ग पुढे चालवला पाहिजे. तेव्हाच अवघी गोमंतक भूमी श्रीरामांच्या गुणांनी सत्य पावलांवर चालेल.
म्हणूनच,
आता वेळ आहे स्वतःच्या प्रगतीची,
वेळ आहे सकारात्मक विचार आत्मसात करण्याची,
प्रत्येकाने विचार करून कार्य केले,
तर गोमंतकात नक्कीच शोभा खुलून येईल श्रीरामांच्या पावलांची.

- पूजा भिवा परब
पालये, पेडणे-गोवा