आमच्या चाळीतील 'आत्याबाई' यांचा दी एंड झाला, म्हणजे त्यांचे आयुष्य संपले. दुःखाच्या फोडणीने भरलेले आणि एखाद्या चित्रपटासारखे खडतर असलेले त्यांचे आयुष्य शेवटी शांतपणे संपुष्टात आले.

मागच्या महिन्यात आमच्या चाळीतल्या रहिवाशी ‘आत्याबाई’ यांचा दी एंड झाला. अर्थात, ऐकायला जरा विचित्र वाटले ना! अहो, आयुष्य संपले म्हणा, फार फार तर मरण पावल्या म्हणा, पण डायरेक्ट 'दी एंड'! नाटक-सिनेमा संपतो, त्याला 'दी एंड' म्हणतात ना? बरोबर आहे तुमचे, पण आमच्या आत्याबाईंचे आयुष्य सुद्धा खरेच एखाद्या चित्रपटासारखे होते; तो सुद्धा साधासुधा नाही, अगदी टक्क्याटोपण्याच्या आयुष्याला अजून दुःखाची फोडणी दिल्यासारखा. अगदी जुन्या काळचा सुलोचनाचा किंवा नवीन जमान्यातला अलका कुबलचा चित्रपट.
मुंबईत आलेला प्रत्येक जण हा काहीतरी कमावण्यासाठीच आलेला असतो. आपले सर्व नातेवाईक, परिवार सोडून अगदी एका अपरिचित दुनियेत. अर्थात एखादा लांबचा काका, मामा, मित्र असतोच ओळखीचा, पण तो खरेच लांबचा. आणि मग जुळतात नवीन नाती-गोती. मग जात, गोत्र, धर्म, काही लागत नाही. असते फक्त आत्मीयता, मैत्री, शेजार धर्म. आता याला बरीच नावे आहेत. असो!
तर आता आमच्या आत्याबाईंकडे वळूयात. तसे खरे नाव फारसे ठाऊक नाही अनेकांना; अर्थात चाळीतील जुन्या रहिवाशांना ते माहीत असावे, पण सगळे ‘आत्याबाई’च म्हणत. पहिल्या मजल्यावर एकदम कोपऱ्यात असलेली जोशींची खोली म्हणजेच आत्याबाई यांचे घर. स्वतः जोशी निवर्तले कधीच. चिरंजीव परिवारासोबत परदेशात गेले, ते परत न येण्यासाठीच. आत्याबाई ह्या जोशींच्या भगिनी. जोशींचा मुलगा त्यांना आत्या म्हणायचा, मग तेच नाव रूढ झाले. मग त्याला ‘बाई’ जोडले, झाल्या ‘आत्याबाई’.
एका डबल रूममध्ये एकट्या राहत त्या. तशा फार सगळ्यांकडे बोलायच्या नाहीत, पण जे कोण मोजके होते त्यांच्याशी मात्र अगदी चांगल्या. स्वतःच्या आयुष्याबद्दल फारश्या चर्चा करीत नसत त्या. कोणी विचारले, तर लगेच विषयांतर करायच्या. पण एक मात्र चाळीत कसल्याही मदतीला त्या एका पायावर तयार असत. विशेषतः उन्हाळ्यात वाळवणचे दिवस सुरू झाले की सर्वांना आत्याबाईंची आठवण होई. कुरडया, पापड, सांडगे अगदी हातखंडा त्यांचा. हाताला चवच वेगळी हो त्यांच्या! वेगवेगळ्या प्रकारची लोणची घालणे हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. अर्थात थोडी अर्थप्राप्तीही होत असे म्हणा त्यांना. त्यांचे मोठे बंधू जोशी, हे आमच्या सासऱ्यांचे मित्र, त्यामुळे सासऱ्यांना त्या परिवाराची बरीच माहिती होती. आत्याबाईंचे खरे नाव ‘अंबा’. तीन बहिणी आणि एक भाऊ, त्यात अंबा नंबर तीन. साहजिकच जरा दुर्लक्षितच त्या काळातल्या रिवाजाप्रमाणे. त्यात सारखी मागे-मागे राहणारी, लाजरी, असा स्वभाव. शिक्षणही झाले तेही व्यवहारापुरतेच. त्यामुळे घरात फक्त घरकाम हा एकमेव उद्योग.
मोठ्या बहिणींची लग्ने झाली, शेवटी उरली ती ही. पण रूपाने सुमार. त्यामुळे स्थळे तशी कमी येत. त्यात भावाच्या पत्नीलाही घरात कामाला फुकट बाई हवीच होती. यातच अंबा पस्तिशीला आली. आई-वडिलांचे छत्र केव्हाच हरपले. आता जोशी भाऊ फक्त साथीला. पण जोशी भाऊंनी बहिणीला कधीच अंतर दिले नाही. घरातली तिची परिस्थिती जाणून होते ते. शेवटी वयाने मोठ्या बिजवराशी लग्न लागले तिचे. खूश होती म्हणतात सुरुवातीला. पण शेवटी एखाद्याचे आयुष्यच खडतर असेल, तर त्याला कोण काय करणार? नवरा पक्का दारुडा, रोज रात्री दारू पिऊन येई. मग शिव्या काय, मारहाण काय, त्यात पहिल्या पत्नीपासून त्याला दोन मुलेही होती. घरात सगळ्यांची उस्तवार, आणि रात्री नवऱ्याकडून मारहाण, यात आयुष्य जात होते. पार वाट लागली होती आयुष्याची. त्यात भर म्हणजे ती गर्भार राहिली त्या वेळेस. पण गरोदरपणातही हाल संपत नव्हते. शेवटी भावाला समजले सर्व काही. गर्भारपणाचे निमित्त काढून तिला जे माहेरी आणले, ते परत न पाठवण्यासाठीच. सासरच्यांनी खूप प्रयत्न केले तिला परत न्यायचे, पण जमले नाही. शेवटी पदरी एक मुलगा घेऊन कायमची परत माहेरवाशीण झाली अंबा.
हातात शिक्षण नाही, नोकरी नाही, त्यात पती-वियोग. पदरी एक मुलगा. अशा स्त्रियांच्या बाबतीत जे प्राक्तन असते, अगदी तेच नशिबात आले तिच्या. घरात वहिनीचा जाच व टोमणे सहन करीत तिचे नवीन आयुष्य चालू झाले. पण एक मात्र कधीच तक्रार नाही कोणाकडे. जे आहे ते स्वीकारले तिने. दिवस जात होते, मुलगा हळू हळू मोठा होत होता; अर्थात तोच सहारा होता तिचा. जोशींनी भाच्याच्या शिक्षणाचा खेळखंडोबा केला नाही कधीच. आपल्या मुलाबरोबर त्यालाही ते चांगले वागवीत. त्याच सुमारास काही आजारपणाने जोशींच्या पत्नी निवर्तल्या. झाले! मग काय सगळा भार परत आत्याबाईंवर. अर्थात आता अंबाची आत्याबाई झाली होती.
मुलगा शिकत होता, त्यातच घरातले जाच कमी झाले होते. जरा सुखाचे दिवस दिसत होते आयुष्यात, पण म्हणतात ना तसा प्रकार. नुकताच मॅट्रिक झालेला तरुण मुलगा इंटरव्ह्यूला जाताना अपघातात सापडला तो कायमचाच. हा मात्र आघात फार मोठा ठरला त्यांच्या आयुष्यात. खूप अपमान, हेटाळणी, मारहाण, टोमणे सहन केले होते तिने, पण आपल्या एकुलत्या एक मुलाचा मृत्यू सहन झाला नाही त्यांना. कोणाशी बोलेना झाल्या त्या. जोशींनी खूप सांभाळले आपल्या बहिणीला. ही एकमात्र चांगली गोष्ट त्यांच्या आयुष्यात घडली, ती म्हणजे बंधूप्रेम. थोड्या सावरल्या त्या. जोशींनी गपचूप थोडे पैसे बहिणीच्या नावावर ठेवले होते, पुढच्या आयुष्याची पुंजी म्हणून. जोशींचा मुलगा अमेय अमेरिकेत गेला, तिकडेच लग्न केले, स्थायिक झाला. मग एक दिवस येऊन वडिलांनाही घेऊन गेला. पण आपल्या आईपश्चात प्रेमाने वाढविलेल्या आत्याला
मात्र एकही शब्दाने विचारले नाही त्याने, पण एक मात्र आत्तेला घरातून बाहेरही काढले नाही, हे ही खरे.
शेवटी आत्याबाई एकट्याच होत्या. आयुष्यभर दुःखाचे कढ पचवले होते त्यांनी. अगदीच स्थितप्रज्ञ झाल्या त्या. तुम्हाला माहित आहे, त्यांनी घरात कोणाचेच फोटो ठेवले नव्हते, कारण गत आयुष्याच्या आठवणी पुसायच्या होत्या त्यांना. काही माणसे जन्माला येतात तीच चुकीच्या मुहूर्तावर, त्यातली आत्याबाई एक. आयुष्यभर सावली बनून राहिली ती, पण व्यक्तिमत्त्व कधीच मिळाले नाही तिला. म्हणूनच मी म्हटले की तिच्या मृत्यूनंतर एक चित्रपट संपला, ‘दी एंड’ झाला. तिला लक्षात ठेवण्यासारखे काहीच नव्हते तिच्याकडे.

- रेशम जयंत झारापकर
मडगाव, गोवा.