लिहिणं मनाला टवटवीत ठेवते. साचलेपणाला मोकळी वाट करून देते. एकटेपणाच्या नैराश्याला एकांताची सर्जकता बहाल करते. निर्मितीचा आनंद पैशात मोजता येणार नाही. तो मुक्त, अमर्याद असतो.
तरुण मुलं वाचत नाहीत ती काही कृतिशील, कौशल्यपूर्ण लिहित नाहीत, त्यांना सगळं हातात हवं आहे. नवीन तंत्रज्ञान, मोबाईलमुळे ती वाया गेलेली आहेत हे असे सर्रास ऐकू येते. मात्र सकारात्मक दृष्टीने सभोवताली बघितले की लिहिणाऱ्या तरुणाईचे हात आपल्याला दिसतात. लिहिण्याची माध्यमे बदलली आहेत, परंतु याचा अर्थ ती लिहित नाहीत, वाचत नाहीत असा होत नाही. या अशा तरुण स्पंदनामुळे वाटते की लिहिण्याची वाचण्याची संस्कृती अमर आहे. डिजिटल माध्यमांचा कितीही मारा झाला तरीसुद्धा वर्तमानपत्रातून सातत्याने लिहिणाऱ्या संकेत संतोष पाडलोस्कर सारख्या तरुणांईची स्पंदने प्रतिबिंबित होत आहेत ही सुखावह गोष्ट आहे. संत सोहिरोबनाथ आंबिये महाविद्यालयातून त्याने कला शाखेतून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. दाडाचीवाडी धारगळ पेडणे येथील या युवकाचे आजपर्यंत विविध वर्तमानपत्रातून तसेच नियतकालिके, डिजिटल वर्तमानपत्रातून शेकडो वैचारिक, प्रासंगिक लेख प्रकाशित झालेले आहेत. एका दशकांपूर्वी गोव्यात साहित्य क्षेत्रात शिखर संस्था गणल्या गेलेल्या अनेक संस्थांनी तरुणाईला लिहिते करण्यासाठी कविता, कथा लेखनाच्या सकस कार्यशाळांचे आयोजन केले होते. त्यासाठी दिग्गज साहित्यिक मार्गदर्शन करण्यासाठी यायचे. या कार्यशाळेतून बऱ्याच लिहित्या हातांना फायदा झाला. आज ही अशी साहित्यिक चळवळ थंडावली असतानाही संकेत पाडलोस्कर सारखे युवक आपल्या इतर आवडीनिवडी सांभाळून लिहित आहेत ही जमेची बाजू आहे. संकेत एक पत्रकार, वैचारिक लेखन करणारा एक सजग समाजभान असलेला नागरिक, कवी, क्रिकेटचा छंद जोपासून त्यासाठी समालोचन करणारे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व. त्याला अष्टपैलूत्वाचे कंगोरे आहेत. ते नाटकात काम करतात, तसेच अनेक साहित्यिक-सांस्कृतिक उपक्रमात सक्रिय राहून स्वतःला प्रसन्न ठेवतात.
एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला रसरशीत चैतन्याची रसद पुरविणाऱ्या कुळागराच्या मायेच्या कुशीत विसावलेला गाव आणि याच पार्श्वभूमीवर असलेल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील त्यांचा जन्म झाला. घरात लेखनाची कोणतीच पार्श्वभूमी नाही तरीही त्याला लिहिण्याची प्रेरणा मिळाली ती “आभाळाएवढ्या मायेचा भाऊ” हा लेख त्याची बहीण स्नेहल पाडलोस्कर यांनी त्यांच्यावर लिहिला, तो प्रकाशित झाला, त्यावेळेपासून मला लिहावेसे वाटू लागले आणि मी लिहित गेलो. अनेकांना त्यांचे लिहिणे आवडू लागले. वाचकांच्या प्रतिक्रिया लिखाणाची पोचपावती म्हणून मिळू लागल्या आणि मग ते लिहित गेले. मला लिहायचं असे एकदा का मनाने घेतले की तेथे विषयाचे बंधन येत नाही. विवेकी आणि विचारशील भान बाळगून समाजाचे निरीक्षण केले की विषय सापडत जातात. संकेत यांचेही असेच झाले. जीवन म्हणजे नक्की काय..? परीक्षा आल्या जवळ सारखे लेख अंकातून प्रकाशित झालेले आहेत. त्यांनी लिहिलेली ‘शेतकरी’ ही कविता खूप गाजली. त्यावर अनेकांच्या प्रतिक्रिया आल्या… लेखक कसा असावा? तसेच माझा आवडता लेखक-संकेत पाडलोस्कर या शीर्षका अंतर्गत वाचकांनी त्यांच्यावर लिहिलेले लेख ही त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट ठरली. त्यांच्या लिखाणाची ती पावतीच म्हणावी लागेल. या अशा प्रतिसादामुळे लिखाणातील हुरूप वाढत गेला. खरंतर क्रिकेट आणि साहित्य या दोन्हीही दोन टोकाच्या गोष्टी. त्यात समतोल साधणे ही तसे कठीणच. परंतु आवड तिथे सवड असल्याने त्यातील मर्म जाणून घेत या आवडीनिवडी जोपासताना क्रिकेटच्या स्पर्धांमधून पन्नासहून अधिक प्रतिष्ठित सामन्यांची पंचगिरी करण्याची संधी लाभली. पत्रकार मेळाव्यात उत्कृष्ट पत्रकार म्हणून गौरव करण्यात आले. आतापर्यंत त्यांनी दहापेक्षा जास्त नाटकात काम केलेले असून त्यात ‘वादळ शिरले घरात’ या नाटकातील भूमिकेला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सामाजिक प्रश्नांना लेखणीच्या रूपातून धुमारे फोडणाऱ्या या पत्रकार लेखकाचा शिर्डीमध्ये सत्कार करण्यात आला. तसेच स्थानिक क्लबतर्फे त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. जन्माला आलो की जगावेच लागते. या विचाराने आपण जगत जातो. माणूस म्हटल्यानंतर त्याला स्वतःच्या भावभावना, विचार, संवेदना असतातच. प्रत्येकाचीच अभिव्यक्तीची वेगवेगळी माध्यमे आहेत. संकेत पाडलोस्कर यांनी भावनांना शब्दांतून वाट मोकळी करून दिली. सजगता असली की लिहिणाऱ्याला विषय भरपूर सापडत असतात. त्यातही समाजात घडणाऱ्या घटना, प्रसंगांनी संवेदनशील मनात प्रश्नांचे काहूर उठते ते मन अस्वस्थ होते. ती अस्वस्थता जेव्हा शब्दबद्ध होते तेव्हा वाचकांच्या मनात त्या लिहिणाऱ्या हातांविषयी कृतज्ञता निर्माण होते. “समाजात घडणाऱ्या घडामोडी आणि लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांना जाणून घेत त्या विषयांवर लिहिणे मला आवडते” असे ते सांगतात. लिखाण पुष्कळ झाले. त्याचे संकलन चालू आहे. विचारांचे पुस्तक प्रकाशित करण्याचा विचार मनात घोळत आहे. तो दिवस दूर नाही, की ज्या दिवशी माझ्या विचारांचा संग्रह समूर्त होईल.” जे डिप्लोमा, डिग्री घेतात किंवा त्याहीपेक्षा जास्त शिकतात आणि मग नोकरी न करता लिखाण किंवा एखादी कला निष्ठेने जोपासतात त्यांना लोक शुद्ध वेडेपणा मानतात. काय करतोस? किंवा काय करतेस ? या प्रश्नांवर मी लिहितो, लिहिते असे उत्तर दिले तर ते हास्यास्पद ठरते.
लिहिणं मनाला टवटवीत ठेवते. साचलेपणाला मोकळी वाट करून देते. एकटेपणाच्या नैराश्याला एकांताची सर्जकता बहाल करते. निर्मितीचा आनंद पैशात मोजता येणार नाही. तो मुक्त अमर्याद असतो. संकेत पाडलोस्कर या आनंदात सहभागी होत साहित्यिक वैविध्यपूर्ण कार्यक्रमाचा आस्वाद घेत अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करतात. प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमात उपस्थित राहतात आणि स्पर्धांचे परीक्षण करतात. लिहिणारे खूप असतात पण बऱ्याच अंशी त्या लिखाणात विचारांची कमतरता भासते. मोकळ्या, प्रसन्न वातावरणात वाढलेल्या संकेत यांची विचारधारा स्पष्ट, संवेदनशील आहे. त्यात प्रामुख्याने समाजाच्या चांगुलपणाची आस असल्याने त्याला महत्त्व प्राप्त झालेले आहे. साहित्यात विचार महत्त्वाचा. हा सशक्त विचार व्यक्तिमत्त्व खुलवतो आणि सुहृदता निर्माण करतो. संकेत यांना लेखनासाठी शुभेच्छा... समाजमनाला भेडसावणाऱ्या समस्यांना कणखर शब्द लाभो... पत्रकारिता करणाऱ्या त्यांच्या लेखणीतून वंचित दुबळ्यांना सामर्थ्य लाभो...
पौर्णिमा केरकर, (लेखिका लोकसाहित्याच्या अभ्यासक, कवयित्री आणि शिक्षिका आहेत.)