गुणी वृत्तनिवेदक – सुभाष जाण

सुभाष जाणला रेडिओविषयी आवड आहे, आस्था, निष्ठा आहे. अजूनही रेडिओ दररोज सकाळी, संध्याकाळी ऐकतो. सुभाषने ‘परिक्रमा’ व इतर कार्यक्रमांसाठी लागणाऱ्या अनेक मुलाखतींसाठी इनपुट दिले.

Story: ये आकाशवाणी है |
04th May, 04:59 am
गुणी वृत्तनिवेदक – सुभाष जाण

माझ्या आकाशवाणीच्या कारकिर्दीत अनेक नैमित्तिक वृत्त निवेदक आले आणि गेले. एक गुणी न्यूज रिडर कायम घट्ट राहिले ते म्हणजे सुभाष जाण, हायर सेकंडरीचे प्राचार्य. त्यांना बातम्यांची फारच आवड. पेपर वाचन, टीव्ही बातम्या व विश्लेषण, उच्चारशास्त्राचे बारकावे याविषयी सुभाष कायम अद्ययावतपणे संपन्न. मी रेडिओवर असताना त्यांनी जास्तीतजास्त कालावधीसाठी सेवा दिली.

त्यांची सेवा ही फक्त बातम्या वाचनापुरती मर्यादित नव्हती. चर्चात्मक कार्यक्रमांत सहभागी होणं, न्यूजरीलसाठी निवेदन देणं, बजेट कार्यक्रमात वा निवडणूक निकाल बुलेटिनच्या वेळी सुभाषचं योगदान मूल्यवान म्हणावं लागेल. उमद्या, उमेदी, स्थिर, सहनशील मनाने, आनंदाने केलेली त्यांची सेवा इतरांना व मलाही प्रेरित करायची. ते ड्युटीला फोंड्याहून पणजीला माझ्याबरोबर आले, तर बातम्यांसंदर्भातले अनेक प्रश्न, अनुवादातील शब्दांविषयीच्या शंका विचारायचे. ते स्मरणात टिपून ठेवायचे.

सुभाष जाणला आकाशवाणीच्या दिवसांविषयी विचारलं तेव्हा त्यानं सांगितलं, “पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर नोकरीसाठी जाहिराती कुठे कुठे येतात याचा शोध चालूच होता. दरम्यान आकाशवाणी पणजी केंद्रावरती नैमित्तिक वृत्त निवेदकाच्या काही जागा भरायच्या आहेत अशी जाहिरात बघितली आणि तिथे अर्ज टाकला. सगळे सोपस्कार पूर्ण होऊन कोकणी बातमीपत्रासाठी आकाशवाणी पणजी केंद्रासाठी नैमित्तिक वृत्त निवेदक अशी नेमणूक झाली आणि खूप बरं वाटलं. सहा महिन्यांचं आवश्यक ते प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच बातमीपत्र सादर करायला मिळेल असे त्यावेळचे वृत्त विभाग प्रमुख दिलीप देशपांडे यांनी सांगितल्याचे आठवते. माझे प्रशिक्षण ज्येष्ठ वृत्त निवेदक अनंत केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. कोंकणी भाषातज्ञ, लोकप्रिय वृत्त निवेदक आणि विद्यापीठात ज्यांची ओळख झाली होती ते मुकेश थळी तिथे भेटणं हे माझे मी भाग्यच समजेन. बातमीपत्र तयार करण्यापासून ते सादर करेपर्यंतच्या अनेक बाबी त्यांच्याकडून शिकता आल्या. माझ्या शिक्षकी पेशातही त्याचा बराच उपयोग झाला. बातम्यांचे अनुवाद, सादरीकरण आणि त्यातल्या महत्त्वाच्या बाबी मी थळींकडून शिकलो. शिकवण्याचा आविर्भाव न आणता बातमीपत्र सादर करताना ऐका, बघा आणि शिका असा त्यांचा मंत्र मला अजूनही आठवतो. तरी मुद्दामहून काही न सांगता आम्हाला निरीक्षणाद्वारे शिकायला लावलं.”

“रेडिओ आणि मी याविषयी जर मला कोणी बोलायला सांगितलं तर मला खूप बोलावसं वाटेल. कारण रेडिओकडून मी खूप काही शिकलो. विविध विषयांवर विचार करण्यासाठी प्रवृत्त करणे, इंग्रजी, हिंदी, मराठी भाषेतून कोंकणीत बातम्या अनुवादित करणे हे कौशल्य मला वृत्त निवेदक म्हणून शिकता आलं. हजरजबाबीपणा, वेळेचे महत्त्व आणि भान हे सगळं तिथेच शिकता आलं. त्याकाळी आजच्यासारखं इंटरनेट नव्हतं त्यामुळे जे काही मिळेल ते टिपून ठेवणं, त्याचा अभ्यास करणे, आपली स्वतःची डायरी तयार करणे हे सगळं आम्ही त्याकाळी शिकलो. त्याचा उपयोग मला माझ्या जीवनामध्ये खूप झाला. माझ्या व्यक्तिमत्त्व विकासात आकाशवाणी पणजी केंद्राचे मोठे योगदान आहे असेच मी म्हणेन.”

सुभाष जाणला रेडिओविषयी आवड आहे, आस्था, निष्ठा आहे. अजूनही रेडिओ दररोज सकाळी, संध्याकाळी ऐकतो. त्यातील चांगल्या, सदोष कार्यक्रमांविषयी माझ्याकडे बोलतो. आपण आकाशवाणीच्या न्यूज विभागाशी जोडलेले आहोत याचा त्याला अभिमान आहे. दररोज तो आकाशवाणीच्या बातम्या व इतर कार्यक्रम ऐकतो ही गोष्ट मला आवडते. कारण बातम्या ऐकून आपण विस्तारत असतो. भाषा सुधारते. नवे शब्द समजतात. सुभाषने ‘परिक्रमा’ व इतर कार्यक्रमांसाठी लागणाऱ्या अनेक मुलाखतींसाठी इनपुट दिले. ज्या ज्या वेळी गरज लागली, पेच आला, कोण वृत्तनिवेदक आजारी झाला, तेव्हा आकाशवाणीसाठी तत्परतेने मदत केली. त्यात आमची मदत झालीच, रेडिओची झालीच. पण सुभाष जाणमधील व्यक्तिमत्त्व पंचरंगी होत विस्तारलं.


मुकेश थळी, (लेखक साहित्य अकादेमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक, अनुवादक, कोशकार असून आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक आहेत.)