आता कृती हवी!

वन्यजीव संरक्षण कायदे व‌ नियमन‌ फक्त कागदावर लिहून ठेवण्यापुरते मर्यादित राहिले आहेत का? असा सवाल उपस्थित झाला आहे. वन्यजीव संरक्षणाच्या हितार्थ पाऊले उचलण्यात हयगय होत आहे का? वन्यजीवाचे संरक्षण करण्यास आपण कुठे कमी पडतो यावर विचारमंथन करणे गरजेचे नाही का?

Story: साद निसर्गाची |
04th May, 05:34 am
आता कृती हवी!

विकासकामाच्या भडीमारामुळे नष्ट होत चाललेली गोव्याची हिरवळ आठवड्याभरात दोन बिबट्यांचा बळी घेऊन गेली. या प्रकारामुळे वन्यजीव संरक्षण कायदे व‌ नियमन‌ फक्त कागदावर लिहून ठेवण्यापुरते मर्यादित राहिले आहेत का? असा सवाल उपस्थित झाला आहे. वन्यजीव संरक्षणाच्या हितार्थ पाऊले उचलण्यात हयगय होत आहे का? वन्यजीवाचे संरक्षण करण्यास आपण कुठे कमी पडतो यावर विचारमंथन करणे गरजेचे नाही का? 


वेळेवर उपचार न मिळू शकल्याने दोन महिन्यापूर्वी धारबांदोडा लगत एका उदमांजराला आपला जीव गमवावा लागला होता.  हे उदमांजर गाडीची धडक बसल्याने जखमी झाले होते. अपेक्षित असलेला उपचार‌ न मिळाल्याने व उपचार पद्धतीच्या अभावी उदमांजराचा मृत्यू झाला होता. वन्यजीव संरक्षण कायद्याच्या परिशिष्ट १ मध्ये समाविष्ट होणाऱ्या या उदमांजराची गणना दुर्मीळ प्रजातींमध्ये केली जाते. गोव्यात रोडकिलचा शिकार‌ ठरलेला असाच आणखी एक दुर्मीळ प्राणी म्हणजे ब्लॅक पँथर (काळा बिबट्या). (जेनेटिक म्युटेशनमुळे किंवा शरीरामध्ये मॅलेनीनचे प्रमाण जास्त झाल्याने बिबट्या काळ्या रंगाचा होतो). ही घटना आठवड्याभरापूर्वीची. कोने-प्रियोळ येथे महामार्गाच्या कडेला हा बिबट्या जखमी अवस्थेत आढळून आला. कदाचित महामार्ग ओलांडताना गाडीची धडक बसून तो जखमी झाला असावा. मृत्यू पावलेला बिबट्या मादी असून गरोदर असल्याचे समोर आले. ही मादी सुमारे अडीच वर्षांची होती व तिच्या गर्भाशयात तीन शावक असल्याचे पोस्टमॉर्टम तपासणीदरम्यान आढळले. या घटनेच्या पाठोपाठ सांगे तालुक्यात एक बिबट्या थेट कुणाच्या तरी घरात घुसला. वनखात्याने त्याला जेरबंद करुन नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे समजले. 

सद्यस्थितीचा आढावा घेतल्यास पशुवैद्यकीय दवाखान्यांची किती गरज आहे याचा अंदाज बांधता येतो. उत्कृष्ट दर्जाच्या वन्यजीव वैद्यकीय सेवा उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. वन्यजीव पशुचिकित्सालये व दवाखान्यांची कमतरता, अपुऱ्या वैद्यकीय व आपत्कालीन सुविधा वर्षानुकाठी कितीतरी प्राण्यांचा बळी घेतात.

वनमंत्री विश्वजित राणे यांनी या दुर्दैवी घटनांचा निषेध करत वन्यजीवांच्या हितार्थ घेतलेले निर्णय प्रशंसनीय आहेत. आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी विभाग वाइल्डलाइफ एसओएस या स्वयंसेवी संस्थेसोबत सामंजस्य करार करण्याच्या प्रक्रियेत असल्याचे वनमंत्री म्हणाले. वन्यजीव बचाव कार्य आणि आपत्कालीन परिस्थितीत तज्ञ असलेल्या पशुवैद्यकीय डॉक्टरांची भरती करण्याचाही विभाग प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. गोव्यात कार्यरत असलेल्या नामांकित पशुवैद्यकीय डॉक्टरांशी चर्चा करुन हा प्रश्न सोडवणार असल्याचे वनमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

उन्हाळ्याच्या दिवसात वन्यप्राणी-पक्षी पाण्याच्या शोधार्थ इकडे तिकडे भटकतात. उन्हाळ्यात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक पाणीसाठ्यांचा स्रोत कमी होत असल्याने तहानेने व्याकूळ झालेले प्राणी जंगलातून बहुतेक वेळा लोकवस्तीकडे वळतात. यावर उपाय म्हणून वनखात्याने जंगलात ठिकठिकाणी 'वॉटर हॉल्स' तयार‌ करावेत. वॉटर हॉल्स म्हणजे पाण्याची कृत्रिम छोटी छोटी तळी. यांना पाणवठा (पाण्याचा साठा) असेही म्हणतात. वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सहज उपलब्धता व्हावी यासाठी ही विशेष सोय करण्याची गरज आहे.

अपघातग्रस्त व जखमी प्राण्यांना वेळेवर उपचार मिळावा यासाठी फिरत्या वन्यजीव पशुचिकित्सालय पथकाची स्थापन करावी. विविध उपकरणे व चिकित्सालयासह सुसज्ज असलेल्या वाहनाची सोय पीडित वन्यजीवांसाठी वरदान ठरु शकते. फिरत्या पशुचिकित्सालयामुळे अपघात पीडित वन्यजीवाला औषधोपचार, लसीकरण, शस्त्रक्रिया, वंध्यत्व तपासणी, गर्भधारणा तपासणी आदी प्रकारच्या वैद्यकीय सेवा पुरवणे शक्य होईल. प्रत्येक शहरात बहुधा विकासकामांचा तगादा लावलेल्या जंगल भागात स्वतंत्र अशा प्राणी बचाव पथकाची नेमणूक करणे अत्यंत आवश्यक आहे.


स्त्रिग्धरा नाईक, (लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या प्राध्यापिका आहेत.)