वेळ धडा घेण्याची, धडा शिकविण्याची!

गेल्या काही वर्षांत काश्मीरमध्ये पर्यटनाला पुन्हा बहर येऊ लागला. मात्र त्यामुळे फुटीरतावादी​ कारवायांना खीळ बसू लागली. त्यामुळेच बिथरलेल्या दहशतवादी प्रवृत्तींनी पहलगाममध्ये नरसंहाराचा घाट घातला. त्याला रंग धार्मिकतेचा दिला आणि त्यांनी मारलेल्या बंदुकीच्या गोळीपेक्षा हा धार्मिकतेचा निशाणा अचूक साधला गेला! आता सर्व देशवासीयांनी केंद्र सरकार, भारतीय लष्कर आणि काश्मिरींच्या पाठिशी ठामपणे उभे राहायला हवे. काश्मीर हा भारताचा शीरपेच आहे. तो प्राणपणाने सांभाळायला हवा. त्यासाठी काश्मिरींचा विश्वास संपादन करण्यावाचून तरणाेपाय नाही!

Story: वर्तमान |
10 hours ago
वेळ धडा घेण्याची, धडा शिकविण्याची!

जात आणि धर्माचा मुद्दा आला की आम्ही भारतीय दरवेळी गरजेपेक्षा जरा जास्तच आक्रमक होतो. त्याला दहशतवादाची किनार असेल, तर आपली धार्मिक कट्टरता सिद्ध करण्याची जणू स्पर्धाच लागते. अशा वेळी राष्ट्रीयत्व, राज्यघटना आणि व्यक्तिस्वातंत्र्य आदी मुद्द्यांना आपण बगल देतो आणि मिळेल तसे अन्य धर्मांवर ताेंडसुख घेण्यातच धन्यता मानतो. वास्तविक ही झाली एक बाजू. जी कुठल्याही घटनेनंतर तीव्रतेने दिसून येते आणि काही अंशी ती साहजिकही आहे. पण खराेखरच आपल्या अशा वागण्याने घडून गेलेल्या घटना, वर्तमानातील आणि भविष्यातील घटनांना बदलू शकतो का, याबाबत विवेकशील विचार करायला हवा. कारण तिथेच आपण कमी पडतो, जे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आणखी ठळकपणे समोर आले आहे.

पहलगामच्या हल्ल्यानंतर उमटणाऱ्या प्रतिक्रिया देशभक्तीच्या आधारावर तोलल्या तर योग्यच म्हणाव्या लागतील. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचे समर्थन कोणीही न करता या दहशतवादाला कायमची मूठमाती देण्याचा आग्रह रास्तच आहे. दिल्लीतील सर्वपक्षीय बैठकीतही तोच सूर उमटला. धर्माच्या आधारावर अतिरेक्यांनी केलेले पर्यटकांचे शिरकाण अवघ्या हिंदू समाजाला डागण्या देणारे ठरले. यातील तथ्य दोन्ही बाजूने मांडले जात असले, तरी एक बाजू धर्माची आहे हे मान्य करून सर्वांनी पुढे जाण्यातच शहाणपणा आहे. त्याचबरोबर अतिरेक्यांनी हिंदू असलेल्यांवर गोळ्या चालविल्या हे जितके खरे आहे, तितकेच तिथल्या आदिल हुसेन शाह या मुस्लिमाने दहशतवाद्यांना अटकाव करताना आपल्या प्राणांचे मोल दिले. या हल्ल्यानंतर काश्मिरींनी तिथे अडकलेल्या पर्यटकांबाबत दाखविलेली ‘दरीयादिली’ न भूतो अशीच आहे. जे हात लष्करावर दगड फेकत असत, त्याच हातांमध्ये दहशतवादाच्या निषेधार्थ मेणबत्त्या दिसून आल्या. त्यातून आपण कोणता बोध घ्यायचा हे प्रत्येकाने बुद्धी शाबूत ठेवून ठरवावे. उठसूट धर्माचा बावटा दाखवून सर्वसामान्यांचा बुद्धिभेद करणारे यातून काही शिकले, तर भारतीय समाजावर फार मोठे उपकार होतील! 

धर्माच्या नावाने हिंदू पर्यटकांचा बळी घेतल्याबद्दल व्यक्त झालेल्यांपैकी किती लोकांनी या घटनेनंतर काश्मिरी मुसलमानांनी दाखविलेल्या परिपक्वतेचा खुल्या दिलाने स्वीकार केला, याचे अवलोकन करावे. काश्मिरींच्या भारतीयांबाबतच्या बदलत असलेल्या भूमिकेचे स्वागत आपण आज करणार नसू तर कलम ३७० रद्द करणे, काश्मिरी लोकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांचे भारत देशाबाबतचे मत अनुकूल बनविण्याचे प्रयत्न, त्याआधारे भविष्यात पाकव्याप्त काश्मीर हस्तगत करणे आदी धोरणात्मक निर्णयांना नाकारण्यासारखे ठरेल. दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मिरींनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळले. निषेध मोर्चे काढले, दहशतवादविरोधी सभा घेतल्या. ठिकठिकाणी अडकलेल्या पर्यटकांना विनामूल्य निवास, भाेजन, वाहतूक आदी सेवा देऊ केल्या. दगडफेक, दहशतवादी कारवाया आणि एकूणच नकारात्मक अनिश्चिततेकडे पाठ फिरवून पर्यटन व्यवसायातून स्वाभिमानाने जगणे काश्मिरी जनता स्वीकारत असल्याचे हे द्योतक आहे. आपल्या देशाचे सरकार आणि लष्कर या कायम अस्वस्थ असलेल्या भूभागात शांतता, सुव्यवस्था आणि सुबत्ता नांदावी यासाठी करत असलेल्या वर्षानुवर्षांच्या धडपडीची ती अनुकूल प्रति​क्रिया आहे. देशात कुठल्याही पक्षाचे सरकार आले, कितीही कायदे बदलले आणि लष्करी बळाचा कितीही वापर केला, तरी हे काश्मिरी एका दिवसांत बदललेले नाहीत. त्यामागे अनेक वर्षांचे चिकाटीचे प्रयत्न आहेत. त्यातूनच आजचे काहीसे आशादायी चित्र आपण बघू शकतो. उद्याचा उज्ज्वल उष:काल अंधाराच्या गर्तेत न ढकलण्याचा काश्मिरी जनतेचा पोक्त विचार या कृतीमागे आहे.

दुर्दैवाने आपल्या काही देशबांधवांना दररोज सकाळी उठून द्वेषाचे ढेकर दिल्याशिवाय दिवस सुरू झाल्यासारखे वाटत नाही. अशांसाठी पहलगामचा हल्ला आणि त्याला आलेला धार्मिकतेचा रंग अनुकूल ठरला. मात्र या हल्ल्यामागील दहशतवाद्यांचे उद्देश समजून घेण्याची तसदी घेताना कोणी दिसत नाही. जे काश्मिरी युवक आणि सर्वसामान्य जनता पाकिस्तानप्रेरित फुटीरतावाद्यांच्या एका आवाहनावर भारतीय लष्करावर दगडफेक करायचे, तेच नागरिक अलीकडच्या काही वर्षांत सौम्य झाले आहेत. इतिहासातील चुकांना कवटाळून वर्तमानाला नख लावत भविष्याचाही बळी देण्याची वृत्ती मागे पडत चालली. भारत सरकार आणि लष्कराच्या संयुक्त प्रयत्नांतून पर्यटनातून स्वयंपूर्णतेकडे हा विचार काश्मिरींना पटू लागला. त्यातून काही​ प्रमाणात का असेना, अस्थिरतेच्या आणि दहशतीच्या वातावरणातून बाहेर पडून मुक्त श्वास घेणारे आश्वासक काश्मिरी दिसू लागले. तिथल्या पर्यटनाला पुन्हा बहर येऊ लागला. सरळमार्गाने खिशात येणारा पैसा आणि त्यातून मिळणारे स्थैर्य कोणाला नको असते? काश्मिरींनाही ते हवेहवेसे वाटू लागले. मात्र त्यामुळे फुटीरतावादी​ कारवायांना खीळ बसू लागली. दहशतवादी प्रवृत्तींचे मनोरे खचू लागले. त्यामुळेच बिथरलेल्यांनी पहलगाममध्ये नरसंहाराचा घाट घातला. त्याला रंग धार्मिकतेचा दिला आणि त्यांनी मारलेल्या बंदुकीच्या गोळीपेक्षा हा धार्मिकतेचा निशाणा अचूक साधला गेला!

आपली घोडचूक चूक झाली ती इथेच. ‘स्थानिक काश्मिरींच्या सहभागाशिवाय हल्ला शक्य नाही, या लोकांना आपण बहिष्कृत करून धडा शिकवायला हवा, काश्मिरींची रसद तोडली की मग ताळ्यावर येतील, या लोकांना लष्कर घुसवून पळवून पळवून मारायला हवे’ वगैरे वगैरे... सोशल मीडियावर व्यक्त होण्याचीही भीती वाटावी, अशा प्रकारे हे एकांगी युक्तिवाद सातत्याने आदळत आहेत. दहशतवाद्यांचा निशाणा नेमका हाच संवेदनशील मुद्दा होता. त्यात ते यशस्वी होताना दिसतात. जे आपण करणे त्यांना अपेक्षित होते, नेमके तेच आपण करत आहोत आणि अतिरेक्यांनी विणलेल्या अदृश्य जाळ्यात गुरफटून जात आहोत. प्रत्यक्षात तसे न करता आज एकाकी पडत चाललेल्या काश्मिरी बांधवांना पूर्ण पाठबळ देणे गरजेचे आहे. हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या दहशतवाद्यांना घाबरून काश्मिरकडे देशाने पाठ फिरवली, तर या नंदनवनाचे पुन्हा वाळवंट हाेण्यासाठी आपण हातभार लावू, हे लक्षात घ्यायला हवे. त्या पापाचे वाटेकरी न होता केंद्र सरकार आणि लष्कराच्या साहाय्याने काश्मिरींमध्ये जो विश्वास निर्माण होत आहे, तो आणखी सुदृढ होण्यासाठी आपण त्यांच्या पाठिशी राहायला हवे. फुटीरवादी आणि दहशतवादी प्रवृत्तींना तेच चोख उत्तर असेल. 

या एकूणच प्रकरणात आवेशाच्या भरात माध्यमांनी आणि सर्वसामान्य भारतीयांनी एका गोष्टीकडे दुर्लक्ष केले. ती म्हणजे, सुरक्षा व्यवस्थेत झालेला फार मोठा गलथानपणा. ज्या भागात पर्यटक एकत्र आले, त्या भागातील सुरक्षा व्यवस्था रामभरोसे सोडण्यात आली होती, हे खुद्द केंद्र सरकारने गुरुवारच्या सर्वपक्षीय बैठकीत मान्य केले आहे. या त्रुटीमुळेच दहशतवाद्यांना घुसखोरी करता आली आणि आपले देशबांधव या हल्ल्यात प्राणास मुकले. अशा चुका भविष्यात होऊ नये, यासाठी आपण धडा घेणे गरजेचे आहे. केंद्र सरकारच्या संरक्षण आणि गृह खात्यांनी अशा कोणत्याही त्रुटी राहू नयेत, याची खबरदारी घेऊन काश्मिरींसह पर्यटकांनाही आश्वस्त करायला हवे. त्यासाठी गुप्तचर विभाग, ड्रोन, उपग्रहआधारित सिग्नल यंत्रणांचा अविश्रांत वापर करायला हवा. अशा चुका पुन्हा घडू नयेत, यासाठी उचित धडा घेणे आवश्यक आहे. आणि याच निमित्ताने दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानसारख्या देशाला धडा शिकविणेही क्रमप्राप्त आहे. त्याची सुरुवात केंद्र सरकारने विविध कठोर निर्णयांद्वारे केली आहेच. पुढची कठोर पावलेही यथोचित उचलली जातील. गरज आहे ती सर्व देशवासीयांनी एकदिलाने भारत सरकार, भारतीय लष्कर आणि काश्मिरींच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याची. काश्मीर हा भारताचा शीरपेच आहे. तो आपण प्राणपणाने सांभाळायला हवा. त्यासाठी काश्मिरींचा विश्वास संपादन करण्यावाचून तरणाेपाय नाही!


सचिन खुटवळकर 
(लेखक दै. गोवन वार्ताचे वृत्तसंपादक आहेत.)