बेडूक हा प्राणी जरी आपल्यासाठी नेहमीचाच झालेला असला तरी या प्राण्यांबद्दल अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या आपल्याला परिचयाच्या नाहीत. सारी काही निसर्गाची किमया म्हणायची.
उन्हाळ्याचे दिवस, वाढती उष्णता असल्याने आम्ही चार-पाच मित्र-मैत्रिणींनी कुठल्यातरी एका धबधब्यावर जाऊन यायचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे मागच्या आठवड्यात सुट्टीच्या दिवशी तीन-एक तासांचे पदभ्रमण करत आम्ही एका तलावाकाठच्या धबधब्यावर जाऊन पोहोचलो. घनदाट जंगलाच्या मध्यभागी वसलेला तो लहानसा तलाव व त्या तलावाचे पोषण करणारा तो छोटासा धबधबा. वेळ दुपारची होती पण तिकडचं वातावरण मात्र एकदम आल्हाददायक होतं. दिवस उन्हाळ्याचे असल्याने धबधब्याला जेमतेमच पाणी होतं. पाणी वाहते जरी असले तरी पाण्याला तितका जोर नव्हता. आम्ही सगळीजणं धबधबा आणि तलावाच्या मध्यभागी एका खडपावर पाण्यात पाय सोडून बसलो. अचानक आमचं लक्ष त्या पाण्यातील माशांच्या घोळक्याकडे गेलं. संथगतीने वाहणाऱ्या पाण्याच्या ठिकाणी कितीतरी लहान मासे घोळका करुन होते. वीस-पंचवीसाच्या संख्येत असावे कदाचित. कुतूहलाने जवळ जाऊन पाहिलं तर हे मासे काळ्या रंगाचे असल्याचं समजलं. त्यांना चार पाय व लांब शेपूट होतं. अगदी बारकाईने पाहिले असता या माशांच्या कळपात मध्यभागी एक तपकिरी रंगाचा मासा दिसला अन् शंका निर्माण झाली. हा कळप माशांचा नसावा कदाचित! वन्यजीव संरक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका मित्राला फोटो पाठवून विचारले असता त्याने हे मासे नसून बेडूकाचे टॅडपोल असल्याचं सांगितलं आणि आम्ही चकीतच झालो.
बेडूक हा सर्वांच्या परिचयातला प्राणी. बेडूकाच्या डरांव - डरांवने त्रस्त झालेला कवी जेव्हा विचारतो की, ‘का ओरडता उगाच राव’ तेव्हा कुठेतरी वाटतं की हो राव! का बरं तरी हा उगाच ओरडत असेल? पण ही डरांव-डरांव उगाच नसते, बरं का. ही नराने मादीला प्रजननासाठी घातलेली साद असते. डरांव - डरांव ही साद केवळ नराचीच असते कारण मादीत आवाज निर्मितीची यंत्रणाच नसते. ह्या प्राण्यांबद्दल कुतूहल वाटण्याजोगे अशा कितीतरी प्रक्रियांबाबत माझ्यासारखेच कित्येकजण अनभिज्ञ असतील म्हणून हा लेख.
बेडूक ह्या उभयचर प्राण्याचा जन्म विविध टप्प्यातून होतो. याला जीवनचक्र असे म्हणतात. या टप्प्यांमध्ये, अंडी, टॅडपोल, तरुण बेडूक आणि प्रौढ बेडूक यांचा समावेश होतो. बेडूक जसजसा वाढतो तसतसा तो बदलतो. अंड्यापासून प्रौढ बेडूक होईपर्यंत बेडूकाच्या शरीरात आश्चर्यकारक असे बदल घडून येत असतात. याला 'मेटामॉर्फोसिस' असे म्हणतात.
उष्ण प्रदेशाच्या ठिकाणी मादी बेडूक पावसाळ्यात अंडी घालतात. बहुतेक बेडूक हे पाण्यात अंडी घालतात तर काही बेडकाची मादी दगडांच्या खांचात अंडी घालते. ही अंडी सामान्यतः लहान, जाडसर आणि काळ्या रंगाची असतात. अंडी उबवून या अंड्यांतून टॅडपोल बाहेर पडतात. टॅडपोल हे पूर्णपणे पाण्यात राहतात, त्यांना शेपटी असते. (माशांप्रमाणे शेपटी असलेले मी धबधब्यावर पाहिलेले हेच ते टॅडपोल). हे टॅडपोल हळूहळू मोठे होतात व त्यांच्या शरीरात अनेक बदल होऊ लागतात. त्यांच्या शेपटीची लांबी कमी होते व पाय विकसित होऊ लागतात. हे बेडूक पाण्यात आणि जमिनीवर दोन्हीकडे राहू शकतात. तरूण बेडूक पूर्णपणे विकसित होऊन प्रौढ बेडूक बनतात. ते पाण्यात आणि जमिनीवर सहजपणे राहू शकतात आणि आपली शिकार करू शकतात. टॅडपोलची शारीरिक रचना पूर्णपणे बदलल्यामुळे बेडूक हा पाण्यात व जमिनीवर दोन्ही ठिकाणी जगू शकतो. बेडूक पाण्यात असताना त्वचेद्वारे आणि जमिनीवर असताना फुफ्फुसांद्वारे श्वास घेतात.
डरांव, डरांव करत उड्या मारणाऱ्या ह्या प्राण्याच्या शरीराचे तापमान सभोवतालच्या तापमानानुसार बदलत असते. त्यामुळे बेडूकाला 'शीतरक्त' प्राणी असे म्हणतात. बेडूक हा प्राणी जरी आपल्यासाठी नेहमीचाच झालेला असला तरी या प्राण्यांबद्दल अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या आपल्याला परिचयाच्या नाहीत. सारी काही निसर्गाची किमया म्हणायची.
बेडूकाबद्दल ऐकावे ते नवलच. अमेरिकेतील चार्लस डार्विनने शोधून काढलेल्या डार्विन बेडूकाची पिल्लं नराच्या शरीरात विकसित होतात. मादी जमिनीवर अंडी घालते. नर जवळपासच असतात. ८-१० दिवसांनंतर नर ही अंडी तोंडाने उचलून आपल्या सॅकमध्ये ठेवतो. फलन झाल्यानंतर पिल्लू याच सॅकमध्ये विकसित होते. ऑस्ट्रेलियातील एक बेडूक कोरड्या झऱ्याच्या किंवा दलदलीच्या तळाशी बिळं करून, त्यात राहतो. प्रजननकाळात पाऊस पडण्यापूर्वी बिळाच्या तोंडाशी मादी अंडी घालते. पाऊस झाल्यावर बीळ पाण्याने भरतं. त्या कालावधीत अंडी विकसित होतात. पिल्लं बाहेर येतात. त्यांचं पुढचं जीवन झऱ्यात किंवा डबक्यात सुरू होतं.
बेडूक अन्न साखळीत महत्त्वाची भूमिका बजावतो. तो कीटकांवर नियंत्रण ठेवतो ज्यामुळे इतर प्राणी आणि वनस्पतींना मदत होते. बेडकांच्या बहुतेक प्रजाती मांसाहारी असतात. कीटक, कोळी आणि इतर लहान प्राणी खाऊन बेडूक आपला उदरनिर्वाह करतो. बेडकांच्या काही प्रजाती इतर बेडूकांना खाण्यासाठी देखील ओळखल्या जातात.
स्त्रिग्धरा नाईक
(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या प्राध्यापिका आहेत.)