जर तुम्हाला दुसऱ्यांच्या आनंदात आनंद होत नसेल आणि त्यांच्याकडे काहीतरी नवीन दिसले की तुम्हाला वाईट वाटत असेल, तर समजून जा की तुमच्यातही त्या बेडकासारखा फुगणारा विनीत कुठेतरी दडून बसला आहे.
सध्या आपल्या आजूबाजूला अनेक 'बेडूक' वाढलेले दिसतात. हे बेडूक म्हणजे कोण, तर ती आपल्या लहानपणीच्या गोष्टीत भेटलेले. स्वतःची तुलना बैलाबरोबर करून हळूहळू फुगत जाणारे आणि शेवटी आपल्याच फुगण्याने फुटून जाणारे. प्रस्तुत कथा अशाच एका बेडकाची आहे, जो आपल्या शेजारी राहणाऱ्या माणसाच्या प्रत्येक कृतीची तुलना करत, त्याच्याशी स्पर्धा करत स्वतःला विनाशाच्या खाईत ढकलतो.
कथेतील प्रमुख पात्रे म्हणजे श्रीकांत आणि विनीत. दोघेही लहानपणापासून एकाच शेजारी वाढत आले. मात्र, त्यांच्या स्वभावात जमीन-अस्मानाचा फरक होता. श्रीकांत हा स्वभावतः सरळमार्गी होता. तो कधीही कोणाच्या वाटेला जात नसे आणि आपल्या कामात मग्न असे. दुसरीकडे, विनीत लहानपणापासूनच श्रीकांतबद्दल ईर्षा बाळगून होता. श्रीकांतने काहीही नवीन गोष्ट केली की, विनीतला त्याची तीव्र इच्छा होई आणि तो त्याची बरोबरी करण्याचा प्रयत्न करे. ही त्याची स्पर्धात्मक वृत्ती इतकी टोकाला गेलेली असे की, श्रीकांतने एखादी साधी गोष्ट जरी केली, तरी विनीतला ती आपल्याकडे नसल्याची तीव्र खंत वाटे.
श्रीकांत मात्र विनीतच्या या बालिश वागणुकीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असे. त्याचे लक्ष नेहमी आपल्या ध्येयांवर आणि योग्य गोष्टींवर केंद्रित असे. त्याच्या मनात कधी विनाकारण काळजी किंवा दुसऱ्यांबद्दलची नकारात्मक भावना नसायची. याउलट, विनीत प्रत्येक वेळी श्रीकांतच्या यशाने किंवा त्याच्याकडील नवीन वस्तूने अस्वस्थ होई. जोपर्यंत तीच गोष्ट किंवा त्याहून चांगली वस्तू आपल्याकडे येत नाही, तोपर्यंत त्याला शांतता लाभत नसे.
श्रीकांतला विनीतच्या या सवयीची अनेकदा कीव येई. त्याने अनेक वेळा विनीतला समजावण्याचा प्रयत्न केला की, दुसऱ्यांशी तुलना करून आपण कधीही खरे सुख मिळवू शकत नाही. प्रत्येकाचे आयुष्य आणि परिस्थिती वेगळी असते आणि स्वतःच्या गरजा व क्षमतेनुसार जीवन जगण्यातच खरे समाधान असते. मात्र, विनीतला ही साधी गोष्ट कधीही कळली नाही. तो त्या गोष्टीतल्या बेडकाप्रमाणे सतत फुगत राहिला आणि नकळतपणे स्वतःला आर्थिक आणि मानसिक त्रासाच्या खाईत ओढून घेत राहिला.
याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे एकदा श्रीकांतने आपल्या घरी एक मोठी, बत्तीस इंची टीव्ही आणली. ही गोष्ट विनीतला कळताच त्याची नेहमीची अस्वस्थता सुरू झाली. त्याला लगेच वाटले की आपल्याकडेही याहून मोठी टीव्ही असायला हवी. मग काय, नेहमीप्रमाणे विनीत दुसऱ्याच दिवशी बाजारात गेला आणि नवी टीव्ही घेऊन आला. घरात नवी टीव्ही आल्यावर त्याने मोठमोठ्याने आवाज लावून ती बघण्याचा 'सोहळा' सुरू केला, जणू काही त्याने एखादा मोठा पराक्रम केला होता.
श्रीकांतला विनीतच्या या वागणुकीची चांगलीच कल्पना होती. त्याला विनीतला एक चांगला धडा शिकवायचा होता, जेणेकरून त्याला स्वतःच्या चुकीच्या वागण्याची जाणीव होईल. दोन दिवसानंतर श्रीकांतने एक युक्ती केली. तो बाजारात गेला आणि बेचाळीस इंची टीव्हीचा फक्त रिकामा खोका घेऊन घरी आला. विशेष म्हणजे, हा खोका आणताना विनीत त्याला पाहिल याची त्याने पुरेपूर काळजी घेतली.
एवढा मोठा टीव्हीचा खोका पाहताच विनीतच्या मनातली ईर्षा पुन्हा एकदा जागृत झाली. त्याला वाटले, आता श्रीकांतने त्याच्याहून मोठी टीव्ही आणली. या विचाराने तो पुन्हा आपल्या घरी जाऊन बसला. घरात नवी टीव्ही असूनही त्याचे लक्ष पूर्णपणे श्रीकांतच्या 'मोठ्या' टीव्हीवर केंद्रित झाले होते. ‘माझ्याकडे आधीच नवी टीव्ही असताना याने अजून मोठी कशी आणली आणि मला कमी कसे लेखले’, या नकारात्मक विचारांनी त्याचे मन पोखरून गेले.
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, अजूनही विनीतला स्वतःच्या वागण्यातली चूक कळत नव्हती. समोर असलेली नवीन टीव्ही देखील त्याला आनंद देऊ शकली नाही. त्याच्यातला बेडूक अजूनही फुगत होता. त्याला या गोष्टीची कल्पनाही नव्हती की तो केवळ दुसऱ्यांशी स्पर्धा करण्याच्या नादात आपल्या घरात अनावश्यक वस्तूंची गर्दी करत आहे आणि आर्थिक नुकसान ओढवून घेत आहे. कदाचित एक-दोन दिवसात तो याहून मोठी टीव्ही घेऊन येईलही.
आता प्रश्न हा आहे की, विनीतने काय करावे? त्याने अजून मोठी टीव्ही आणावी का? खरं तर, या परिस्थितीत विनीतला आत्मपरीक्षण करण्याची आणि आपल्या सवयी बदलण्याची नितांत गरज आहे. दुसऱ्यांशी अनावश्यक स्पर्धा करण्याऐवजी त्याने स्वतःच्या गरजा आणि आर्थिक परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे.
ही कथा आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवते – ईर्षा आणि दुसऱ्यांशी केलेली निरर्थक स्पर्धा यामुळे आपल्याकडे असलेल्या गोष्टीसुद्धा आपल्याला सुख आणि समाधान देऊ शकत नाहीत. आपण नको त्या विवंचना आपल्या मनात घेऊन बसतो आणि यामुळे आपल्या आजूबाजूला असलेला आनंद उपभोगण्यास मुकतो. अनेकदा आपल्यातही असाच एक विनीत लपलेला असतो, जो शेजाऱ्यांच्या प्रत्येक गोष्टीची तुलना आपल्याशी करतो आणि त्यांच्याशी स्पर्धा करायला लावतो.
जर तुम्हाला दुसऱ्यांच्या आनंदात आनंद होत नसेल आणि त्यांच्याकडे काहीतरी नवीन दिसले की तुम्हाला वाईट वाटत असेल, तर समजून जा की तुमच्यातही त्या बेडकासारखा फुगणारा विनीत कुठेतरी दडून बसला आहे. या बेडकाला शक्य तितक्या लवकर दूर करा. नाहीतर तुम्ही स्वतःच्या वाट्याचे सुख आणि समाधान कधीही मिळवू शकणार नाही. दुसऱ्यांचा आनंद तुम्हाला कधीही दिसणार नाही आणि आयुष्यभर तुम्हाला असेच वाटत राहील की लहानपणी ती बोधपर गोष्ट शिकूनही आपण अजून अडाणीच राहिलो आहोत. त्यामुळे, दुसऱ्यांशी तुलना करणे सोडा आणि आपल्या जीवनातील छोट्या-छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला शिका.
प्रा. सागर डवरी
हरमल, पेडणे