स्पूल टेपवरून संगणकीय ध्वनीमुद्रणाची ही क्रांती व स्थित्यंतर लोभस होतं, आम्ही त्याचे साक्षीदार बनलो.
आकाशवाणीच्या ध्वनीमुद्रणासाठी एके काळी चुंबकीय टेपच्या स्पूलांचा वापर होत होता. ही एनालॉग पध्दत होती. कारण संगणक, रेकॉर्डींग डिजिटल सॉफ्टवेअर आलं नव्हतं. वर्तुळाकार चॉकलेट रंगाची टेप असलेली स्पूलं सांभाळून ठेवावी लागत. पुन:प्रसारणासाठी त्यात ओलसरपणा येऊ नये, कोळिष्टकं वा इतर बुरशी (फंगस) वा इतर काही बिघाड त्या स्पूलच्या टेपना लागू नये म्हणून ज्या कागदी केसमध्ये ती ठेवत ती काळजीपूर्वक बांधून ठेवली जाई. या स्पूलचा एक विभाग असे त्यात व्यवस्थित लायब्ररी असे. तिथं रजिस्टरवर स्पूलचा नंबर व नाव मथळा असे. म्हणजे भाषण असल्यास कुणी केलं, विषय, प्रथम प्रसारण कधी झालं तारीख वेळ सगळी माहिती लिहिलेली असे. गाण्यांच्या ग्रामोफोन टेप्स असत. स्पूलंही असत. कांतारांची तसंच पाश्चात्य संगिताची स्पूल्स असे.
आरंभीच्या काळात घरात वापरले जाणारे टेप रेकॉर्डरही अशाच प्रकारे असायचे. छोटीशी पेटी असायची. त्यावर पाहिजे ते स्पूल चढवायचं. व्यवस्थित सर्व नॉबवरून फिट्ट बसवायचं. ऑन केलं की गाणं वाजायला सुरू. कालांतरानं कॅसेट्स असलेले टेप रेकॉर्डर आले.
या स्पूलचा वापर आम्ही आकाशवाणीवर अऩेक वर्षं केला. भाषणं रेकॉर्ड केली. पाहुणे कलाकारांची वा पत्रकारांची भाषणे वा विधानसभा कामकाज समालोचन मुद्रित केलं. संपादन करायला फार त्रास व्हायचा. कारण वक्ता अडखळला की त्याला थांबवून बरोबर वेळेच्या त्या बिंदूवर परत सुरू करावं लागे. प्रादेशिक समाचार दर्शन म्हणजे न्यूज रील वगैरे करताना दमछाक होई. कारण त्यावेळी आम्ही मूळ टेप मधल्या यंत्रावर व निवेदन बाजूच्या यंत्रावर व थीम म्युझीक म्हणजे पार्श्वसंगीत उजव्या यंत्रावरून मुख्य ध्वनीमुद्रणाच्या टेपवर (स्पूलवर) सोडत असू. वेळ लागे. कारण मधे तुटकपणा येता कामा नये, सलगता यावी यासाठी सायास करावे लागे.
आमच्या न्यूज रूममध्ये अनेक स्पूलं होती. अधूनमधून ती स्वच्छ करावी लागत. वार्षिक न्यूज रील असायचं. त्यासाठी आम्ही काही महत्त्वाच्या कार्यक्रमांची, मंत्र्यांची व इतरांची भाषणे जतन करून ठेवत असू. वार्षिक घटनांचा आढावा घेणारा व झलक देणारा कार्यक्रम न्यूज रील कार्यक्रम एका तासाचा असे. तो कार्यक्रम दोन स्पूलवर डबिंग एडिटींग केला जायचा. पंधरा मिनिटांच्या मुदतीचं व अर्ध्या तासाच्या मुदतीचं अशी दोन लहान मोठी स्पूलं असायची. या वार्षिक न्यूज रीलसाठी आम्ही वर्षभर काही स्पूलं एका कपाटामध्ये ठेवत असू.
कम्प्युटर आले. डिजिटल सॉफ्टवेअर. स्पूल एका दिवसात गेलं. इतिहासजमा. सुस्कारा सोडला. निवेदक दहा बारा स्पूलं एकावर एक ठेवून, आपल्या फायली वगैरे घेऊन चालत वरच्या मजल्यावर चालत जायचा. त्याचं काम हलकं झालं. कारण स्पूलांच्या अभावी सर्व मुद्रण संगणकामध्ये सांठवलेलं असायचं. सर्व संगणक एकामेकांना जोडलेले. ध्वनीमुद्रण सगळं संगणकावर होऊ लागलं.
जरा कुठं बोलताना कोण अडखळला तर त्याला सूचना दिली जाते, तीन सेकंद थांब आणि पुढे सुरू कर म्हणून. कारण तो गॅप संगणकावर एका सेकंदात डिलिट करता येतो. डबिंग एडिटींग कमालीचं सोपं जालं. स्पूलांवरील त्रास गेले. कारण संगणकावर मल्टिट्रॅक सॉफ्टवेअर वापरून हे चांगल्या आवाजाच्या प्रतीसहीत करणं शक्य झालं. स्पूलांच्या ध्वनीमुद्रणापेक्षा हे डिजिटल रेकॉर्डींग नक्कीच स्पष्ट, स्वच्छ, कर्णमधुर, चांगलं होऊ लागलं. मोठ्या प्रमाणात मोठ्या आकाराचं ध्वनीमुद्रण साठवणं शक्य झालं. एफएम वाहिनी लोकप्रिय होत होती. पाश्चात्य संगीत असो की भारतीय शास्त्रीय संगीतातील गायन, वादन असो ते मंजुळ, मधुर, प्रसारण श्रवण करताना आपल्या घऱातच कोण तरी वाजवत तर नाही ना इतक प्रभावीपणे गोड एकू येऊ लागलं.
स्पूल टेपवरून संगणकीय ध्वनीमुद्रणाची ही क्रांती व स्थित्यंतर लोभस होतं, आम्ही त्याचे साक्षीदार बनलो.
मुकेश थळी
(लेखक साहित्य अकादेमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक, अनुवादक,
कोशकार असून आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक आहेत.)