श्री लईराई महिमा

एक दीड तासाच्या एका बैठकीत आपण हे पुस्तक संपवू शकतो. तुम्हाला नक्कीच एक आंतरिक शक्ती हे पुस्तक प्रदान करते व देवीच्या थोर महिमेची जाणीव करून देतो. प्रत्येकाच्या घरात हे पुस्तक असावेच असे माझे ठाम मत आहे.

Story: पुस्तक |
19 hours ago
श्री लईराई महिमा

य जगदंबे उदयोस्तु’ 

‘बोलो पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, पार्वती पते हर हर महादेव’    

 हाच नामगजर करीत लाखोच्या संख्येत मोठ्या उमेदीने भक्तगण वसंत पंचमीला शिरगावला येतात. अस्नोड्याहून दोन किलोमीटर अंतरावर वसलेले  शिरगाव हे गाव देवी लईराईच्या जत्रेसाठी जगभर प्रसिद्ध असे ठिकाण आहे. भक्तांचा देवीवर असलेला ठाम विश्वास व भक्तांच्या हाकेला पावणारा देवीचा वरदहस्त याचेच वर्णन म्हणजे हे पुस्तक ‘श्री लईराई महिमा. देवी कश्याप्रकारे आपल्या असंख्य भक्तांना तारते याचे सोप्या सरळ भाषेत वर्णन लेखक राजेश वझरीकर करतात. लेखक पेशाने एक शिक्षक आहेत. त्यांची समजावून शिकविण्याची साधी-सुबक पद्धत त्यांच्या लेखनशैलीतून दिसून येते.

‘श्री लईराई महिमा’ या पुस्तकात १९ वेगवेगळ्या लेखांमधून देवीच्या वेगवेगळ्या पैलूची व्यवस्थित मांडणी केली आहे. प्रत्येक लेखात एक वेगळी आणि काहीतरी नवीन महिती आपल्याला वाचायला मिळते. संपूर्ण हिरवागार, मनमोहक निसर्ग. त्यात मधे टुमदार देवीचे मंदिर अश्या शब्दात लेखक सुरुवातीला शिरगाव गावाचे वर्णन करतात. मंदिरात कलशरुपी विराजमान सायबिणीचे सार्थ वर्णनही येते. देवी लईराई आपल्या अन्य भावंडांसह घाटावरून चोर्ला, मोर्ले, मावळिंगे ते मये येथील ‘वड्यांर’ स्थानावर आली. त्यानंतर या सर्व भावंडांची आख्यायिकाही वाचण्यासारखीच आहे. सगळी भावंडे वेगवेगळ्या गावी गेली, तर देवी लईराई शिरगावतील मुड्डे येथे टेकडीवर स्थानापन्न झाली. लोकांनी देवीला गावात येण्याची मागणी केली. देवीने कुक्कुट पालन न करणे, दारू बंद, डुक्कर पालन बंदी अश्या अटी घातल्या. गावकऱ्यांनी त्या मान्य केल्या व देवी गावात आली. आजही गावकारी त्याचे पालन करतात. शिरगावच्या जत्रेचे, तळीबद्दल या पुस्तकात विस्तृत पद्धतीने वर्णन आले आहे.

 जत्रेदिवशी लाखो भाविक धोंड तळीत स्नान करतात. स्नानाशिवाय ‘धोंड’ म्हणजेच व्रतस्थ भक्ताला होमकुंडात प्रवेश नसतो. स्नान केल्यावर देवीचा मुड्डे येथे स्थानी जाऊन ‘कौल’ घ्यावा लागतो व नंतर धोंड होमकुंडात जाण्यास तयार होतो. गळ्यात मोगऱ्याचे कळे, धोतर व हातात बेद असा या धोंडांचा पोशाख असतो. लाखो धोंड अग्निदिव्यातून एकदम शिस्तबद्ध पद्धतीने प्रवेश करतात. एवढी संख्या असूनही कधीच एकही धोंड पडून कपडे जळल्याची घटना घडली नाही, हा देवीचाच महिमा. जत्रेच्या महिनाभर अगोदर शाकाहार पाळून, पाच दिवस आधी धोंड मांडवात जेवण बनवून अत्यंत पवित्रता राखून हे व्रत पाळतात. सोवळ्याने स्वयंपाक करणे, ओल्या अंगाने जेवणे, काही खाल्ल्यावर पुन्हा स्नान करणे, अशी खूप शिस्त पाळावी लागते. जत्रेच्या आदल्या दिवशी ‘व्हडले जेवण’ व जत्रेदिवशी सकाळी ‘फराळ’ याचेही थोडक्यात वर्णन लेखक करतात.

 होमकुंडाची रचना, त्याचप्रमाणे शिरगावची जत्रा ही अन्य जत्रेशी कशी जोडली आहे याचेही वर्णन नमूद करतात. देव, केळबाय, महामाया, खेतोबा यांच्याकडून फुलांची, मिलाग्री देवीकडून तेलाची अश्या देवीला येणाऱ्या भेटींचाही उल्लेख पुस्तकात आहे. जत्रेसाठी चौगुले, गावकरांची  कशी तयारी असते, आपसात असलेल्या मानपानाचीही माहिती मिळते. एवढे मोठे होमकुंड एका ‘चंद्रावाती’ने देवी कशाप्रकारे पेटवते, एरवी आमच्याकडे माचीस घेऊनसुद्धा चूल पेटत नाही. त्याचप्रमाणे देवीचा अपमान करणाऱ्याला कशी शिक्षा मिळते, हे ही गड्डू रवळू याच्या उदाहरणातून कळते. तसेच आंब्याच्या झाडावर राहणारा साकवाकडच्या अमोणच्या देवचाराला देवी झेला फेकते या बद्दलही लेखक पुस्तकात सांगतात. जत्रेदिवशी सर्व धोंड होमकुंडातून गेल्यावरच देवी होमकुंडात जाते, त्यानंतर कोणालाही होमकुंडात प्रवेश नसतो. दुसऱ्या दिवसापासून ‘कौलोत्सव’ साजरा होतो. जत्रेसाठी येऊ न शकणारे भाविक मुद्दाम कौल घेण्यासाठी दुरून येतात.

देवीला आवडणारी पिटकुळी, कुड्याची, मोगरीचे झेले लोक आवर्जून आणतात. जत्रेसाठी अनेक व्यापारी येतात. लाखोंची उलाढाल होते. पण भक्तांसाठी आपल्या मातेचा चमत्कार पाहण्याचा हा अमूल्य क्षण असतो. एका भुकेलेल्याला आईच्या दुधाची आस लागावी व नंतर आई भेटावी अशीच अवस्था भक्तांची आई लईराई मातेला भेटून होते.

‘देवी लइराई महिमा’ या पुस्तकात एकंदर लेखक राजेश वझरीकर खोलात जाऊन, देवीच्या व गावाच्या प्रत्येक घटकाबद्दल, मान्यतेबद्दल माहिती देतात. लोकांना आलेला देवीचा प्रत्यय, वेळप्रसंगी दिलेला मदतीचा हात, रोग्याला रोगमुक्त करणारी, नवसाला पावणारी दयाळू माता, निसर्गावर व भक्तांवर असिम प्रेम करणारी देवी व तिचा महिमा म्हणजेच हे पुस्तक. प्रत्येकाने; लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी हे पुस्तक नक्कीच वाचावे. लक्षपूर्वक वाचल्यास एक दीड तासाच्या एका बैठकीत आपण हे पुस्तक संपवू शकतो. तुम्हाला नक्कीच एक आंतरिक शक्ती हे पुस्तक प्रदान करते व देवीच्या थोर महिमेची जाणीव करून देते. प्रत्येकाच्या घरात हे पुस्तक असावेच असे माझे ठाम मत आहे.


श्रुती परब