मनोहर पर्रीकर गोव्याचे मुख्यमंत्री बनताच त्यांनी विकास कामांचा धडाका लावला. समाजातील दीनदुबळ्या वयोवृद्ध लोकांसाठी दयानंद सामाजिक सुरक्षा योजना आदी असंख्य कल्याणकारी योजना मार्गी लावल्या. त्यांनी हाती घेतलेल्या धडाकेबाज योजनांमुळे देशातील पहिले आयआयटीयन मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रीकर देशभर गाजले.
मगोची शिडी घेऊन गोवा विधानसभेत प्रवेश केलेल्या भाजपाने विधानसभेत उत्तम कामगिरी करून जनमानसात चांगले स्थान निर्माण केले. १९९४ मधील निवडणूक युती १९९९ मध्येही चालू राहील असा मगो नेत्याचा होरा होता. १९९४ मधील निवडणुकीत मगो भाजपाची युती असूनही मगो नेते रमाकांत खलप यांचा मांद्रे मतदारसंघात दारुण पराभव झाला होता. हा पराभव अनपेक्षित होता. रमाकांत खलप आमदार नसल्याने त्यांचे राजकीय स्थान काहीसे डळमळीत झाले होते. मात्र मगो भाजपा युती कायम राहील याची त्यांना खात्री होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने ४ जून १९९९ रोजी निवडणूक घेण्याची घोषणा केली, तेव्हा मगो नेते मनोहर पर्रीकर यांनी लवकरच बोलुया असे उत्तर दिले.
१९९४ मधील निवडणुकीत मगो बरोबर युती व्हावी म्हणून भाजपा नेते मगो नेत्यांची मनधरणी करायचे पण आता ५ वर्षांंत परिस्थिती बरीचशी बदलली होती. भाजपाच्या ४ आमदारांनी विधानसभेत चांगली कामगिरी बजावली होती. त्यामुळे मगोचे बरेच कार्यकर्ते भाजपाकडे आकर्षित झाले होते. त्यामुळे भाजपाचे राष्ट्रीय नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी मगो नेत्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले आणि अखेरच्या क्षणी युतीस नकार दिला व मगो नेत्यांना तोंडघशी पाडले. मगो पक्षाकडे पुरेसे उमेदवारही नव्हते. ऐनवेळी धावपळ करुनही मगो पक्ष केवळ ३१ उमेदवार गोळा करू शकला. भाजपाने तब्बल ३९ मतदारसंघातून आपले उमेदवार उभे केले होते. काँग्रेसमधून फुटून निघून डॉ. विली डिसोझा यांनी स्थापन केलेली राजीव काँग्रेस पार्टीही निवडणूक आखाड्यात उतरली होती. त्यांनी १४ उमेदवार उभे केले होते. ४ जून १९९९ रोजी झालेल्या या निवडणुकीत डॉ. विलींची राजीव काँग्रेस रिंगणात असूनही काँग्रेसने २१ जागा जिंकून सभागृहात स्पष्ट बहुमत मिळविले.
काँग्रेस पक्षात तीव्र मतभेद आणि डॉ. विली डिसोझा यांची स्वतंत्र चूल असूनही काँग्रेसचे २१ आमदार निवडून येणे हे एक राजकीय आश्चर्यच मानायला हवे. राजीव काँग्रेसचे डॉ. विली डिसोझा आणि अॅड. बाबूश डिसोझा हेही या वेळी निवडून आले होते. १९९४ मध्ये मगोबरोबर निवडणूक युती असूनही भाजपाचे केवळ ४ उमेदवार जैतिवंत झाले होते. १९९९ च्या निवडणुकीत मगो भाजपाची युती नसतानाही भाजपचे १० उमेदवार विजयी झाले. मगो पक्षाच्या विजयी उमेदवारांची संख्या १० वरुन घसरून केवळ चारवर पोहचली. डॉ. विली डिसोझा यांनी काँग्रेसबरोबर फारकत घेऊन राजीव काँग्रेस हा नवा पक्ष काढून १२ उमेदवार उभे केले होते. त्यापैकी डॉ. विली डिसोझा (साळगाव) आणि अॅड. फ्रान्सिस डिसोझा (म्हापसा) या दोघांनी बाजी मारली. काँग्रेसने तिकीट नाकारल्याने युजीडीपीची तिकीट घेऊन निवडणूक रिंगणात उतरलेले सुरेश परुळेकर (कळंगूट) आणि जुझे फिलीप डिसोझा (वास्को) हे दोन्ही उमेदवार काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांचा पराभव करून विजयी झाले. इजिदोर फर्नांडिस यांना काँग्रसने तिकीट नाकारल्याने त्यांनी बंड करून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. मग़ोचे उमेदवार गोविंद आचार्य व काँग्रेसचे वासू पायक गांवकर यांचा पराभव करून इजिदोर फर्नांडिस यांनी बाजी मारली. या निवडणुकीत काँग्रेसला २१ जागा मिळाल्याने लुईझिन फालेरो यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली.
९ जून १९९९ रोजी लुईझिन फालेरो सरकारचा शपथविधी झाला. ४० सदस्यीय गोवा विधानसभेत सरकारपक्षाचे केवळ २१ आमदार होते. आपल्या पाठीराख्या आमदारांची संख्या वाढविण्यासाठी फालेरो यांनी मगो आणि यूजीडीपी आमदारांशी संपर्क साधला. फालेरो यांच्या विनंतीला मान देऊन १७ जून रोजी मगो व यूजीडीपी आमदारांनी सरकारला बाहेरून पाठिंबा दिला. ४ जुलै रोजी सुरेश परुळेकर व जुझे फिलीप डिसोझा हे यूजीडीपीचे दोन्ही आमदार काँग्रेस पक्षात सामील झाले. त्यामुळे काँग्रेस आमदारांचे संख्याबळ २३ झाले. २७ जुलै रोजी मगो पक्षाने काँग्रेस पक्षाकडे आघाडी केली.
मगो नेते रमाकांत खलप व प्रकाश वेळीप यांनी १५ ऑगस्ट १९९९ रोजी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. संपूर्ण मगो पक्षच काँग्रेस पक्षात विलीन केल्याची घोषणा खलप यांनी केली. अशीच घोषणा मगो पक्षाच्या तत्कालीन अध्यक्ष ताई काकोडकर यांनी केली होती. रमाकांत खलप यांनी त्याला विरोध करुन न्यायालयीन लढा देऊन मगो पक्षाचे अस्तित्व राखून ठेवले होते. १९ वर्षांनी रमाकांत खलप यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करुन मगो पक्ष काँग्रेस पक्षात विलीन केल्याची घोषणा केली. मडकई मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार श्रीपाद नाईक यांचा पराभव करून प्रथमच मगो आमदार म्हणून निवडून आलेले सुदिन ढवळीकर व डिचोलीचे आमदार पांडुरंग राऊत यांनी या विलीनीकरणाला विरोध केला. अशा पद्धतीने सुदिन ढवळीकर यांच्याकडे मग़ोचे नेतृत्व गेले.
सुरेश परुळेकर, जुझे फिलीप डिसोझा, रमाकांत खलप व प्रकाश वेळीप यांच्या पावलावर पाऊल ठेवून डॉ. विली डिसोझा यांचा आधार घेऊन म्हापशातून निवडून आलेले बाबुश डिसोझा यांनीही काँग्रेस पक्षात उडी मारली. मगो, यूजीडीपी व राजीव काँग्रेस मिळून ५ आमदारांची काँग्रेसमध्ये आवक झाल्याने मूळ काँग्रेसवाले नाराज झाले. या असंतुष्ट आमदारांचे नेतृत्व फ्रान्सिस सार्दिन यांनी केले. त्यांच्या नेतृत्वाखाली दयानंद नार्वेकर सोमनाथ जुवारकर मावीन गुदिन्हो, सुभाष शिरोडकर, व्हिक्टोरिया फर्नांडिस, फ्रान्सिस डिसोझा, अलेक्स सिक्वेरा, फ्रान्सिस सिल्वेरा, बंडू देसाई व आरेसिओ डिसोझा या ११ आमदारांनी काँग्रेसमधून फुटून ‘गोवन पीपल्स पार्टी’ हा नवा पक्ष स्थापन केला. भाजपाचे १० आणि मगोच्या २ आमदारांनी या सरकारला पाठिंबा दिला. फ्रान्सिस सार्दिन २४ नोव्हेंबर १९९९ रोजी मुख्यमंत्री बनले आणि त्यांच्याबरोबर फुटून आलेल्या इतर दहाही आमदारांना मंत्रीपदाची बक्षिसी मिळाली.
त्यानंतर दोनच दिवसांनी भाजपा या सरकारात सामील झाले. २६ नोव्हेंबर १९९९ रोजी दिगंबर कामत, डॉ. सुरेश आमोणकर व प्रकाश फडते सार्दिन सरकारात मंत्री म्हणून सामील झाले. भाजपाचे नेते मनोहर पर्रीकर मात्र या मंत्रीमंडळात सामील झाले नाहीत. भाजपाच्या १० आमदारांच्या पाठिंब्यावर उभे राहिलेले सार्दिन यांचे सरकार आपला कालावधी पूर्ण करील अशी अपेक्षा होती. पण अवघ्या काही महिन्यांतच मतभेद सुरू झाले. मुख्यमंत्री सार्दिन आणि भाजपा नेते मनोहर पर्रीकर यांच्यात खटके उडू लागले. हे मतभेद वाढतच गेले. मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार स्थापन करण्याची सगळी तयारी पूर्ण झाल्यावर अवघ्या १० महिन्यात भाजपाने सार्दिन सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि सार्दिन सरकार अपेक्षेप्रमाणे कोसळले.
२४ ऑक्टोबर १९९९ रोजी सार्दिन सरकार कोसळले त्याच दिवशी मनोहर पर्रीकर यांच्या सरकारचा थाटात शपथविधी झाला. गोव्यात भाजपाचे सरकार आणण्याचे आणि गोव्याचे मुख्यमंत्री बनण्याचे मनोहर पर्रीकर यांचे स्वप्न साकार झाले. गोव्यात भाजपाचे सरकार येतंय म्हणून आनंदीत झालेले रवी नाईक, रमाकांत खलप, शेख हसन, बाबू आजगावकर, संजय बांदेकर, प्रकाश वेळीप आदी मंडळी भाजपात दाखल झाली. रवी नाईक यांना उपमुख्यमंत्रीपद तर रमाकांत खलप, दिगंबर कामत, शेख हसन, प्रकाश वेळीप, पांडुरंग राऊत, डॉ. सुरेश आमोणकर, प्रकाश फडते, संजय बांदेकर, बाबू आजगावकर, फिलीप नेरी रॉड्रिगीस, जुझे फिलीप डिसोझा व रामराव देसाई मंत्री बनले.
मनोहर पर्रीकर गोव्याचे मुख्यमंत्री बनताच त्यांनी विकास कामांचा धडाका लावला. समाजातील दीनदुबळ्या वयोवृद्ध लोकांसाठी दयानंद सामाजिक सुरक्षा योजना आदी असंख्य कल्याणकारी योजना मार्गी लावल्या. त्यांनी हाती घेतलेल्या धडाकेबाज योजनांमुळे देशातील पहिले आयआयटीयन मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रीकर देशभर गाजले. गोव्यात विकास योजना राबविण्यात व्यस्त असताना त्यांचे सरकार उलथून पाडण्याच्या हालचाली काही असंतुष्ट मंत्र्यांनी चालू केल्या. गुप्तचर यंत्रणांकडून त्याचा सुगावा लागताच क्षणाचाही वेळ न दवडता त्यांनी मंत्रीमंडळ बैठक बोलावली. अर्जंट बैठक असल्याने काहीतरी महत्त्वाचे कामकाज असणार म्हणून सगळे मंत्री धावत पळत आले. चहापान झाल्यावर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी राजभवनावर महत्त्वाचे काम आहे असे सांगून मुख्य सचिवांना बरोबर घेऊन राजभवनावर गेले. ‘आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.’ असा मजकूर असलेला कागद त्यांनी मुख्य सचिवासमोर धरला व सही करा असे फर्मावले. असे काही घडलेले नाही हे त्यांना माहीत होते पण त्यांनी सही केली आणि तो महत्त्वाचा दस्तऐवज राज्यपालांना सादर केला. केंद्र सरकारकडे सल्लामसलत केल्यानंतर विधानसभा बरखास्तीची अधिसूचना काढण्यात आली. तोपर्यंत बाकीच्या मंत्र्यांना काहीच माहीत नव्हते. मनोहर पर्रीकर यांचा सर्जीकल स्ट्राईक होता.
गुरुदास सावळ
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)