गेल्या भागात आपण वाचले...दारूच्या आहारी गेलेला प्रशांत रुग्णालयात दाखल आहे. नर्स ललिता त्याची काळजी घेत आहे. त्यांच्या बोलण्यातून ते पूर्वी भेटल्याचे संकेत मिळतात. प्रशांतला जगण्याची इच्छा नाही, पण ललिता त्याला धीर देत आहे. ललितालाही प्रशांतबद्दल पूर्वीचा स्नेह जाणवतो. ...आणि आता पुढे...
ललिता मूळची राजापूरची. वाडा येथील माध्यमिक शाळेतून एस.एस.सी. होऊन स्वत:च्या आवडीने, प्रेमळ बाबांच्या सेवाभावी जनसेवेच्या व्रताचं कंकण बांधल्यानं परिचारिका झाली.
ललिता नेहमीप्रमाणे वॉर्डात आली. तोच प्रशांतनं विचारलं.
“तुम्ही त्या दिवशी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही!”
“तुम्ही प्रशांतच ना?”
“हो, आणि तुम्ही ललिता! खरं ना!”
“तुम्ही नाही ...तू” त्यानंतर हायस्कूलमधल्या कितीतरी आठवणी निघाल्या. डाॅक्टरांचं बोलावण आलं तेव्हा ती थोडी नाराजच झाली. म्हणाली, “आज तुला दु:खाची बातमी सागंणार आहे.”
“दु:खाची?” प्रशांत चपापला. इतका वेळ आपण खळखळून हसलो, बोललो आणि आता दु:खाची बातमी!
“नाही, म्हणजे तशी सिरीयस दु:खाची बातमी नाही. आज तुला रुग्णालय सोडावं लागणार आहे.”
“का? मी इतक्यातच बरा झालो?”
“हो, अगदी ठणठणीत बरा झालास!”
“आता आपली पुन्हा भेट?”
प्रशातनं आपला पत्ता तिला दिला. राजापूरला येण्याचं ललितानं आश्वासन दिलं. प्रशांतने तिला रक्षाबंधनाला बोलावले.
प्रशांतच्या आमंत्रणानुसार ललिता व बाबा राजापूर स्टेशनवर आले. त्यावेळी तेथे प्रशांत आपुलकीने त्यांची वाट पाहात होता. त्या गर्दीत प्रशांतनं त्यांना बरोबर ओळखलं मग ते सागवे - राजापूर एसटीत बसून राजापूरला उतरले. राजापूरच्या प्रसिद्ध बाजाराला लागूनच असलेले हनुमंताचे मंदिर... राजापूर गावामधून वळणावळणांनी वाहणारी जैतापूर खाडी अन् त्या खाडी किनारी उभ्या असलेल्या बोटी त्यावरील विविध रंगीबेरंगी झेंडे हे दृश्य पाहून ललिताच्या आनंदाला उधाण आलं!
प्रशातनं बाबांची व ललिताची घरी, शेजारी व मित्रमंडळीना ओळख करून दिली. सगळे ललिताकडे कुतूहलाने पहात होते. ही ललिता प्रशांतची शाळेतली मैत्रीण की आणखी कुणी? कुणालाच कोडं सुटत नव्हतं! पण रक्षाबंधनाच्या दिवशी ललितानं जेव्हा प्रशांतला राखी बांधली तेव्हा सर्वांना कुठं कोडं उलगडलं. घरातले वातावरण आनंदून गेले!
ललिता दोन दिवस राजापूरला राहिली. प्रशांतने तिला सागवे गाव होऊ घातलेले प्रकल्प राजापूर येथील रमणीय स्थळे दाखविली. मग प्रशातनं ललिता व बाबांना एस.टी. त बसवलं त्यांचा निरोप घेतला. प्रशांत घरच्या काही कामाच्या निमित्ताने पुन्हा चार महिन्यानंतर मुंबईला आला होता. तेव्हा त्यांने ललिताची भेट घ्यायचीच असं ठरवलं होतं. तो सरीता रुग्णालयात गेला. ललिता वाॅर्डात होती. बराच वेळ तिची वाट पाहात तो बाहेर उभा होता. ललिताला प्रशांत आल्याचं कळलं होतं. तिनं त्याला आत बोलावलं. प्रशांत ललिताकडं पाहातच होता. एका अपघातग्रस्त झालेल्या रुग्णांची ललिता देखभाल करीत होती. रुग्ण तळमळत होता. ओरडत होता. त्याला कश्याचंही भान राहिलं नव्हतं, प्रशांतनं त्या रुग्णांला न्याहाळून पाहिले आणि तो चपापला!
तो प्रवीण होता! ललिताला सायकलनं उडविणारा प्रवीण! प्रशांत गप्प झाला! ललिता मात्र त्यांची तन्मयतेने सेवा करीत होती. त्याला इंजेक्शन दिल्यानंतर तो पडून राहिला होता आणि ललिता थोड्या वेळानं बाहेर आली.
ललिता आणि प्रशांत दोघं क्षणभर काही बोललीच नाहीत. शेवटी प्रशांतनेच बोलायला सुरुवात केली.
“ललिता, तुझी कमाल आहे! अग, तो रुग्ण कोण आहे माहीत आहे तुला?” प्रशांतनं रागानं विचारलं.
“कोण आहे?” ललिता शांतपणाने म्हणाली. “तो प्रवीण आहे. तुला सायकलने उडवणारा... तुझी भर रस्त्यात...” प्रशांतला पुढे बोलवेना.
“इथं तो एक रुग्ण आहे आणि अशा रुग्णांची सेवा - शुश्रुषा करणं हे माझं कर्तव्य आहे. इथं मित्र, शत्रू सर्व सारखेच, नाही का!”
प्रशांत गप्प झाला. ललिता आणि प्रशांत खाली उपगृहात गेले दोघांनी चहा घेतला.
“परत राजापूरला कधी येणार?”
“आता भाऊबिजेलाच.”
“ठीक आहे. पण निश्चित हं!”
“अगदी निश्चित!”
भाऊबिजेला ललिता येणार या विचारानं घरातल्या सर्वांनाच आनंद झाला होता. एका गोष्टीचे समाधान सर्वांना होते. ती म्हणजे प्रशांतला एक बहीण मिळाली होती.
भाऊबिजेचा दिवस उजाडला. प्रशांतला वाटले, ललिता आदल्या दिवशीच येईल पण ती आली नाही. आता प्रशांत सकाळापासून ललिताची एस.टी. स्टॅडवर वाट पाहात बसला होता. सकाळनंतर दुपार झाली तरीही ललिताचा पत्ता नव्हता. आता दिवस ढळू लागला होता. प्रशांतचा धीर खचत होता. ललितानं आपला बेत बदलला तर नाही? त्याचं अंतर्मन म्हणत होतं, ती भाऊबिजेला निश्चित येणार! आणि दिवस बुडायच्या वेळेला शेवटची एस.टी आली. प्रशांत पुढे धावला. त्याला ललिता कुठेच दिसेना! पण इतक्यात...
“प्रशांत, अरे प्रशांत” अशी कुणीतरी हाक मारली तोच प्रशांत भानावर आला आणि इकडे तिकडे पाहू लागला. ललिता चांगल्या पातळात सुटकेस घेऊन उभी होती आणि सोबत कुबड्या घेऊन एक तरुण उभा होता. तो कोण असावा हे प्रशांतला कळेना! त्याने दाढी वाढविलेली होती.
“प्रशांत, मला ओळखलं नाही?” तो म्हणाला
“नाही.” प्रशांत त्याला न्याहाळीत म्हणाला.
“मी प्रवीण”
“प्रवीण?” प्रशांत प्रवीणकडे बघतच राहिला
“हो... आम्ही रजिस्टर लग्न केलं.”
प्रशांतनं ललिताकडं पाहिलं.
“हा, प्रवीण... प्रवीणला आई - वडील, बहीण- भाऊ कुणीच नाही. त्यात हा अपंग! अशा वेळी याला कुणाच्या तरी आधाराची गरज होती.”
“होय प्रशांत. माझे दोन्ही पाय लुळे आहेत. उजाव्या हाताला एक कुबडी आणि दुसऱ्या हाताखाली आधाराला ही ललिता... पण प्रशांत, ह्या कुबड्या मी आता फेकून देणार आहे. कारण हिचा आधारच खरा महत्त्वाचा वाटतो मला!”
आणि खरोखरच प्रवीणने उजव्या हातातली कुबडी दूर फेकून दिली आणि ललिताच्या खांद्याचा आधाराने तो ताठ उभा राहिला!
प्रशांत बघतच राहिला. ललिता फार मोठी होती मनानं, विचारानं... आपल्यापेक्षा कांकणभर जास्तच!
प्रमोद कांदळगावकर
देवगड, ९३७२०८९३१४