आता तरी धडा घ्या!

शिरगावातील रस्ते अरुंद आहेत. अग्निकुंडावेळी त्या भागात हजारो धोंड उपस्थित असतात. शिवाय अग्निकुंड पाहण्यासाठी लाखो भाविकही उपस्थित असतात. त्यामुळे संभाव्य संकटे, अडथळे लक्षात घेऊन नियोजन आखणे, त्या भागात कमीत कमी दुकानांना परवानगी देणे ही जबाबदारी मुळात देवस्थान समितीची होती. पण, या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच या जत्रोत्सवात पहिल्यांदाच इतकी मोठी चेंगराचेंगरी झाल्याचा आरोप आता सर्वच घटकांकडून होत आहे.

Story: वर्तमान |
04th May, 12:01 am
आता तरी धडा घ्या!

लईराईची जत्रा...गोव्यासह आजुबाजूच्या महाराष्ट्र, कर्नाटकसह इतर काही राज्यांतील भाविकांच्याही आतुरतेचा हा जत्रोत्सव. हाकेला पावणारी देवी म्हणून अनेक राज्यांमध्ये ख्याती असल्याने दरवर्षी लाखो भाविक लईराईच्या जत्रोत्सवाला भेट देत देवीचे दर्शन घेतात. पण, यंदाच्या जत्रोत्सवात शनिवारी पहाटे घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेने सगळेच हादरले आहेत. अचानक घडलेल्या या घटनेत आतापर्यंत सहा भाविकांचा मृत्यू झाला असून, पाच जण गंभीर जखमी आहेत. तर, अनेकांना किरकोळ दुखापत झाली असून, जखमींवर बांबोळीतील गामेकॉ, म्हापशातील आझिलो आणि डिचोली येथील इस्पितळातही उपचारही सुरू आहेत.

गोव्यातील सर्वात मोठ्या जत्रोत्सवात प्रथमच घडलेल्या चेंगराचेंगरीसारख्या घटनेमुळे समाजमन सुन्न झालेले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तत्काळ उच्चस्तरीय बैठक घेत ​उत्तर गोवा जिल्हाधिकारी स्नेहा गीते, डिचोलीचे उपजिल्हाधिकारी भीमनाथ खोर्जुवेकर, पोलीस अधीक्षक अक्षत कौशल, डिचोलीचे उपअधीक्षक जीवबा दळवी आणि निरीक्षक दिनेश गडेकर यांच्या बदल्या केल्या. तसेच महसूल सचिव संदीप जॅकीस यांच्या अध्यक्षतेखाली या घटनेचा तपास करण्यासाठी समितीचीही स्थापना केली.

लईराईच्या जत्रोत्सवात घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेला पूर्णपणे धोंडगण जबाबदार आहेत. धोंडगणांच्या बेजबाबदारपणामुळेच ही घटना घडलेली आहे. त्यामुळे यात प्रशासन किंवा देवस्थान समितीला जबाबदार धरणे चुकीचे असल्याचा दावा लईराई देवस्थानच्या अध्यक्षांनी केला. त्यात विरोधी आमदारांनी प्रशासनाच्या अपयशामुळेच ही घटना घडल्याचा आरोप सुरू केला आणि त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही याचे खापर प्रशासनावर फोडत अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या. यातून या घटनेस प्रथमदर्शनी धोंडगण किंवा इतर गोष्टी कारणीभूत असल्याचे वाटत असले, तरी जत्रोत्सवातील महत्त्वपूर्ण होमकुंडाच्यावेळी देवस्थान समिती आणि सरकारी प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी न घेतल्यामुळेच ही घटना घडल्याचे दिसून येत आहे.

लईराईच्या जत्रोत्सवात दरवर्षी गोव्यासह इतर राज्यांतील लाखो भाविक सहभागी होत असतात. त्यामुळे गांभीर्य ठेवून या जत्रोत्सवाचे नियोजन करणे हे सरकारी प्रशासन आणि देवस्थान समितीचे कर्तव्य होते. जत्रोत्सवात दरवर्षी लाखोंची गर्दी उसळत असते हे माहीत असल्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आधीच आखण्याची जबाबदारी प्रशासन आणि देवस्थान समितीची होती. परंतु, त्याकडे त्यांनी गांभीर्याने पाहिले नाही. शिरगावातील रस्ते अरुंद आहेत. अग्निकुंडावेळी त्या भागात हजारो धोंड उपस्थित असतात. शिवाय अग्निकुंड पाहण्यासाठी लाखो भाविकही उपस्थित असतात. त्यामुळे संभाव्य संकटे, अडथळे लक्षात घेऊन नियोजन आखणे, त्या भागात कमीत कमी दुकानांना परवानगी देणे ही जबाबदारी मुळात देवस्थान समितीची होती. पण, या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष झाल्यामुळेच या जत्रोत्सवात पहिल्यांदाच इतकी मोठी चेंगराचेंगरी झाल्याचा आरोप आता सर्वच घटकांकडून होत आहे.

चेंगराचेंगरीत मृत पावलेल्या सहा जणांच्या कुटुंबियांना प्रत्येकी दहा लाख आणि जखमी झालेल्यांना प्रत्येकी एक लाखांचे अर्थसहाय्य जाहीर करीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दु:खाचा डोंगर कोसळलेल्या कुटुंबियांना आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. मुळात सरकारने कितीही अर्थसहाय्य दिले. तरी मृतांच्या कुटुंबियांना त्यांची कायमची निघून गेलेली माणसे मिळणार नाहीत. पण, अशाप्रकारे दु:खाचा डोंगर यापुढे​ कोणाच्याही कुटुंबावर कोसळू नये, यासाठी काम करण्याची जबाबदारी सत्ताधारी, विरोधक, सरकारी प्रशासन आणि देवस्थान समितीचीही आहे.

धार्मिकदृष्ट्या गोवा निश्चित इतर राज्यांपेक्षा वेगळा आहे. राज्यात दरवर्षी सण, उत्सवांची​ रेलचेल सुरूच असते. शिरगावातील लईराईप्रमाणेच राज्याच्या विविध भागांमध्ये मोठमोठ्या जत्रांचे आयोजन होत असते आणि तेथेही हजारो भाविकांची उपस्थिती असते. त्यामुळे लईराई जत्रोत्सवात जे काही घडले, त्याचा प्रत्यय पुढील काळात इतर कोणत्याही जत्रोत्सवांमध्ये येऊ नये, याचे भान सरकारसह सर्वच देवस्थान समित्यांनी राखणे गरजेचे आहे. जत्रोत्सवांत जमणाऱ्या गर्दीचा अंदाज घेऊन तेथे आवश्यक तितका पोलीस फौजफाटा ठेवणे, गैरप्रकारांवर नियंत्रण ठेवून ते रोखणे ही जबाबदारी पूर्णपणे पोलिसांची आहे. जत्रोत्सवांआधी देवस्थान समित्यांसोबत बैठक घेऊन त्यांनी आखलेल्या नियोजनाची माहिती करून घेणे आणि जत्रोत्सव सुरळीत पाडण्यासाठी देवस्थान समित्यांना पूर्ण सहकार्य करण्याचे काम प्रशासनाचे आहे. तर, जत्रोत्सवातील मुख्य कार्यक्रम ज्या ठिकाणी आयोजित केले जातात, तेथे आवश्यक अशाच दुकानांना परवानगी देऊन तेथे भाविक वगळता इतरांची कमीत कमी गर्दी असेल, याचे नियोजन करण्याची जबाबदारी देवस्थान समित्यांनी योग्यरित्या पार पाडली पाहिजे. उत्सवांना कसलेच गालबाेट लागू नये, याची जबाबदारी या दोन्ही घटकांची आहे.


सिद्धार्थ कांबळे, (लेखक गोवन वार्ताचे मुख्य प्रतिनिधी आहेत.)