वाचकहो, आजपर्यंत मी अनेक कथा पेपरात, दिवाळी अंकात लिहिल्या, त्याचे पुस्तक काढले. चरित्रे, प्रवास, ललित अनेक क्षेत्रात लिहित आहे आणि मुख्य म्हणजे आपणही मला आनंदाने स्वीकारत आहात. असो!
गुणगान कुणाचे गावे? तर देवाचे असे वडिलधारी म्हणतात. अर्थात देव म्हणजे कोण, तर जो आपल्याला चांगला मार्ग दाखवतो. आपल्याला माणूसपण देतो तो. अर्थात तो कोणत्याही रूपाने येतो आणि आज मी अश्याच माझ्या देवाची म्हणजेच मला ह्या क्षेत्राचा मार्ग दाखविणाऱ्या व्यक्तीची ओळख करून देणार आहे ते म्हणजे माझे मावसोबा, श्री. पूर्णानंद काका यांची.
अर्थात मावसोबा म्हणजे बरोबर मावशी आलीच. आपल्याला आईचे प्रेम देणारी, हक्काची अशी मावशी. तर अशी ही माझी मावशी शाळेत शिक्षिका होती. आणि तिची बदली आमच्याच दाभाळ गावाजवळ झाली. जुने दिवस ते खेड्यातील. धड लाईट नाही, रस्ते नाहीत, ट्रान्सपोर्ट तर दूरच. मावशी आमच्याचकडे राहायची काही दिवस. मी सहा-सात वर्षांची होते. खूप लाडकी होती मी तिची.
थोड्याच दिवसात मावशीचे लग्न ठरले. अर्थात लग्न म्हणजे काय हे त्या वयात कळण्यासारखे नव्हते. आम्ही बाहुला बाहुलीचे लग्ने लावणारी पोरं जिवंत माणसाचे पण लग्न होते हा अनुभवच मला नवीन होता. लहान हो आम्ही. कळायचे वयच नव्हतं ते. होता होता मावशीचे लग्न झाले. अर्थात तिचा नवरा कोण हे बघायची इच्छा होतीच पण एवढ्या गर्दीत ते कळतच नव्हते.
लग्नानंतर पहिल्यांदा मावशी, मावसा घरी आले आमच्या आणि ती पहिली ओळख आमची. गोरा गोमटा, थोडे फॅशनेबल केस, हसरा चेहरा, हळुवार बोलणे, पटकन छाप पडेल असा. मावशीने ओळख करुन दिली ही माझी भाची आणि ही खूप चांगली गाते. भाची म्हटल्यावर सहजतेने माझ्याकडे बघणारा मावसा मी गाते म्हटल्यावर थोडा चमकला. चेहरा जरा प्रफुल्लित झाला. मला जवळ घेऊन त्याने एखादे गाणे म्हण म्हणून सांगितले मला. मला काय कोणी गा म्हटले की माझे हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट हे गाणे सुरू व्हायचे. घरी मला चेष्टेने रेडिओ म्हणायचे.
असो! गाण्याचे एक कडवे झाल्यावर मला त्यांनी थांबविले. मग आपण परत ते गाणे चालीत म्हणून दाखविले. अर्थात मला हे नवीनच सगळे. पण त्या बालवयातही मला जाणवले की ही व्यक्ती इतरांपेक्षा वेगळी आहे.
आमचा पूर्णानंद मावसा एका प्रख्यात खानदानी सारस्वत कुटुंबात जन्मला. घरात तशी आर्थिक सुबत्ता, एकत्र परिवार. पाच-सहा भावंडे, थोडक्यात गोव्यातील त्या काळी भाटकार राहत तसे. लहानपण तसे त्याचे सर्वसामान्यच, पण संगीत, कविता यांची भयंकर आवड, अर्थात घरातही तसे वातावरण पोषकच होते. शाळेत असल्यापासून तबला, पेटी, वादनात पारंगत असलेला पूर्णानंद सुंदर गळ्याचाही होता. गायनाचे शास्त्रीय नसले तरी थोडेफार शिक्षण घेतले होते त्याने. आणि शेवटी मातीचा गुण गोव्याच्या. अहो दगडाला रत्नांचे रूप देणारी माती हो ही आमच्या गोव्याची.
तर असा हा आमचा मावसा नाट्यसंगीत, भजनामध्ये पारंगत. आमच्या घरी आला की बाबा आणि तो यांची मैफल असे छोटीशी. बरोबर मी. मला गाण्याची आवड होती खरी, पण वळण नव्हते ते मात्र त्याने लावले. तसा हाडाचा शिक्षक होता तो. आपला शिक्षकी पेशा निभावताना कित्येक विद्यार्थ्यांना संगीताची गोडी लावली त्याने. तसाच कवितेचाही भोक्ता तो. थोडी मोठी झाल्यावर मी चारोळी लिहायचे, हक्काने वाचायचा तो, आणि प्रोत्साहन द्यायचा.
स्टेजवर कसे बोलायचे, कसा आत्मविश्वास ठेवायचा हे तो फार सुंदररित्या सांगे. शाळेतील अनेक मुलांना त्याने घडविले, कलाकार म्हणून. नव्हे तीच खरी आवड होती त्याची. शिकविण्यापेक्षा कलेत रमणाऱ्या पूर्णानंदने अनेक विद्यार्थ्यांना रेडिओवर, अनेक मोठ्या समारंभात गायनाची, कविता, कथा सादरीकरणाची संधी दिली. आपल्या विद्यार्थ्याला बक्षीस मिळाले, कौतुक झाले, तर त्या मुलापेक्षा जास्त खूश व्हायचा तो आमचा पूर्णानंद मावसा. मग त्या दिवशी दोनच्या जागी तीन मुद्दुश्या पोटात जायच्या त्याच्या जेवणात. हो हाडाचा कलावंत असणारा हा माणूस प्रचंड मत्स्यप्रेमी होता. सोमवार हा त्याच्या दृष्टीने कसाबसा ढकलायचा दिवस. गोव्यातील गावठी माश्याबद्दल इतका माहितगार व चोखंदळ गोवेकर मी तरी दुसरा बघितला नाही. कलाकारांशी जशी त्याची लगेच दोस्ती व्हायची तशीच मत्स्याहारिशिही. ह्याच प्रेमापोटी त्याने माझ्या लग्नावेळी मला आणि माझ्या नवऱ्याला पूर्ण पाठिंबा दिला. कारण माझ्या नवऱ्याचे मत्स्यप्रेम.
एखादी गोष्ट करायची ठरवली तर आर या पार तो ती पूर्ण करणारच. मग ते कोणाचे लग्न असो नाही तर आणखी काही. त्याच्यासारखा प्रत्येक गोष्टींचा बारकाईने विचार करणारा माणूस निदान माझ्यातरी पाहण्यात नाही.
शिरोड्याच्या कामाक्षी देवीवर नितांत श्रद्धा असणारा असा हा माझा मावसा. शिरोड्यात देवदेवींचे विविध उत्सव व्हायचे. प्रत्येक उत्सवाला अगदी हिरिरीने भाग घेणारे पूर्णानंद कधी ढोल वाजव तर कधी गायनाच्या कार्यक्रमात पेटी, तबला वाजव एवढे उत्साही. किती सांगावे, लिहावे हो त्यांच्याबद्दल जो भेटेल तो त्याचाच. माझ्या सासरी तर त्याला
खूप मान द्यायचे. माझे सासरे खूप कलाप्रेमी, साहित्यप्रेमी. लगेचच सूर जुळले त्यांचे.
आपल्या आजारपणात तो मुंबईला आला होता. ट्रिटमेंटसाठी आमच्याकडे राहिला हक्काने. डॉक्टरकडे जाऊन आला की बसायचे दोघे गाणी ऐकत टेपरेकॉर्डरवर. खूप मजा यायची. अनेक विषयात पारंगत, कलाप्रेमी, माणूसप्रेमी असा हा माझा लाडका मावसा शेवटी त्याला झालेल्या असाध्य व्याधिशी मात्र दोस्ती करू शकला नाही. आपलेसे करू शकला नाही तिला. त्याच आजारात पन्नाशीतच तो गेला. योगायोग बघा की ज्या देवीवर त्याची श्रद्धा होती खूप, तिला भेटायला नवरात्रातच गेला तो. असं म्हणतात की ज्यांचे आयुष्य कमी असते ना तेच खरे आयुष्य जगतात. खरेच प्रत्येक क्षण जगला तो अगदी मनस्वीपणे, आपल्याच धुंदीत, कलेच्या मस्तीत.
आजही मनाचा एक कोपरा त्याच्या आठवणीने भरलेला आहे. त्याचा तबला, पेटी, स्कूटर अजूनही सांभाळून ठेवलीय मावशीने. घरी जाते मी तिथे, प्रत्येक वेळेस वाटते की आत्ता येईल मावसा शाळेतून आणि म्हणेल, “रेश्मा आयले मगो, बरे जाले. चल जेवून प्रॅक्टिस करूया पदाची...”
रेशम जयंत झारापकर, मडगाव