कधीकधी मौनातही एक संवाद असतो. आणि तो संवाद समजून घ्यायला ‘मौनं सर्वार्थ साधनम्’ ह्या विचारामागचा गर्भित अर्थ आपल्या मनाला कळणे फार गरजेचे होय...
प्रिय वाचकांनो,
क गंमत सांगू का? लहानपणी आमच्या गावी, माझ्या आजीच्या घराच्या ओटीवर संध्याकाळी आजी शांत बसायची. कुठलाच आवाज नाही का कल्लोळ नाही, फक्त तिच्या वाऱ्यावर डुलणाऱ्या परड्यांची खसखस आणि एखादी कावळी दारावरून ओरडत जाणं एवढीच काय ती वर्दळ बरं. आता ह्यात असे आमच्या आजीचे मौन व्रत जे आम्हा चिमुकल्यांना त्याकाळी काहीतरी खुपच खडतर आणि जणू एक महा-व्रतच वाटे!
मी विचारायचे, “आजी, का गं बोलत नाहीस?”
ती किंचित हसून पण तरीही पुढचा प्रश्न येऊ नये अशा दटावणीच्या स्वरात म्हणायची, “बयो, आज मौनाचं व्रत घेतलंय हो मी. ह्यात बोलायचं नाही काहीच. पण मनातली खुसपुस चालू ठेवायची हो... ती का कोणास थांबलीये?”
खरं सांगू का तुम्हाला? मला तेव्हा ही मनातली खुसपुस आणि हे मौनाचे तत्वज्ञान सरळ डोक्यावरून बाउंसर जात असे! काहीच कळत नसे. परंतु, आता समजतंय हो, की कधीकधी मौनातही एक संवाद असतो. आणि तो संवाद समजून घ्यायला ‘मौनं सर्वार्थ साधनम्’ ह्या विचारामागचा गर्भित अर्थ आपल्या मनाला कळणे फार गरजेचे होय...
मौन म्हणजे काय?
आज जर पु. ल. असते तर म्हणाले असते, “हे मौन म्हणजे असा प्रकार आहे की, न बोलता जे सांगितलं जातं, तेच उलटरित्या मोठ्या आवाजात आरडाओरड करणाऱ्यांना बोलून सुध्दा ऐकू जाणार नाही!” आहे की नाही विशेष? खरं तर, मौन हे एक ‘बोलणं’च आहे. फक्त वेगळ्या भाषेतलं. आणि या भाषेचा गोडवा आणि गांभीर्य दोन्ही मनाच्या खोल पातळीवर उमटले जाते.
सायकोअॅनालिटिक दृष्टिकोनातून पाहिलं, तर मौन म्हणजे resistance नाही, तर एक reflection आहे. कसं? सांगते. हल्ली बहुतेकवेळा असं होतं की आपण कुणाच्या बोलण्यातल्या एखाद्या विधानाकडे “हे आपल्यालाच बोलले गेले” असल्याचा समज अगदी सहज करून घेतो. साध्या संभाषणात ही “तुला कुणीतरी मुद्दाम टार्गेट करतंय” असे आतून भय अथवा संशय का बरं वाटत राहते?
कारण हा असतो आपल्या मनाचा projection चा खेळ! हा अगदी काॅलेजातल्या projector सारखा असतो. म्हणजे, आपण नकळत दुसऱ्याच्या भावनांना, अपेक्षांना, किंवा रागाला आपल्या अंगावर घेतो. थोडक्यात एखादं वाक्य जसं “काही लोकांना जबाबदारीच जमत नाही” असं कुणी ऑफिसमध्ये म्हटलं, तर ते आपल्याबाबतीत उच्चारले गेले आहे की नाही, हे ठरवायला आपल्याकडे emotional filters लागतात. आणि ही फिल्टरची घागर डुचमळली की संवादाचा विसंवाद निश्चित!
आता तुम्ही विचाराल, की अगं मग ह्यात मौनाचं काय? त्याचा इथे काय बरं उपयोग? थांबा! संदर्भासकट स्पष्टीकरण देते.. तर, मुळात, अशा ‘फिल्टरलेस’ प्रसंगी, मौन राहणे सर्वोत्तम! आता, मौन म्हणजे काही एकदम गप्प राहणं नव्हे. उलट, मौन म्हणजे स्वत:च्या त्या गोंधळलेल्या भावनांचं संयोजन, त्यांचं निरीक्षण. एक मानसोपचारतज्ज्ञ म्हणून सांगते, मौन ही खरंतर, assertiveness ची एक शक्तिशाली शैली आहे.
आम्ही सेशन्समध्ये अशा केसेसच्या बाबतीत एक अतिशय छान वाक्य सांगतो, ‘नाॅट माय मंकी, नाॅट माय सर्कस!’ ह्याचा एकूण अर्थ असा आहे की, जर ते मुळात तुमच्याबाबतीत काही नाहीच आहे, तर ते स्वतःच्या अंगास चिटकवून घेणे मूर्खपणाचे लक्षण होय. त्यामुळे वड्याचे तेल वांग्यावर निघत असता, रिअॅक्ट न होवून मौन धारण करणे योग्य.
ह्या उलट, जर कोणी तुमच्यावर खरंच कुरघोडी करत असेल, आणि तुम्ही स्पष्ट, शांतपणे फक्त त्यांच्या डोळ्यात पाहून ‘मी इथेच आहे आणि तुझ्या निगेटिव्हीटीचा माझ्यावर जराही प्रभाव पडत नाही’ असं सांगत असाल, तर ते मौन पॅसिव्ह नाही, उलट, असर्टिव्ह असतं.
अर्थाचा अनर्थ, राग आणि मौन
“माझ्या शब्दांचा वाटेल तसा अर्थ तू लावू नको हं...”
“मला बोलायचं नाहीये तुझ्याशी!”
असे मौन पॅसिव्ह अग्रेसिव्ह तेव्हाच होते, जेव्हा त्यास संवाद टाळण्यासाठी वापरले जाते. उदा. तुम्ही रागावलेले आहात, पण “मी काही बोलणार नाही” असं म्हणत समोरच्याला गोंधळात टाकता. हे मौन त्रासदायक असते, psychological punishing सारखे. यात काय होतं, आपण चिडलेलो असतो, रागावलेलो असतो, पण बोलत नाही. फक्त ‘गप्प’ राहतो. समोरच्याला त्रास व्हावा म्हणून! परंतु ते योग्य नव्हे. अशा मौनाने असंख्य प्रिय नाती कुरतडली जातात. कोलमडून पडतात.
त्याउलट, काही प्रसंगी मात्र, शांत राहणे, न बोलता समोरच्याचे ऐकून घ्यावे ह्यातच साऱ्यांचे हीत असे. आता बोलण्याची गरज नाही. मी समजून घेतोय वा घेतेय हा पवित्रा अनेक कलह-तंटे शांत करीत असत. ह्यालाच आम्ही असर्टिव्ह मौन म्हणतो, जो self-regulation साठी असतो.
भगवंताच्या मौनाची भाषा...
भगवान श्रीकृष्णांनी देखील अर्जुनास वदलेल्या भगवद्गीतेत गप्प न राहता एक सारथी म्हणून संवाद साधलाय. तरीही अनेक वेळा ते केवळ एक स्मितहास्य करतात आणि अर्जुनाला ‘शब्दांच्या पलिकडचं’ ऐकू येतं!
आणि, म्हणूनच आपले पूर्वज मौन व्रत पाळायचे. ती काही शिक्षा नव्हती, उलट ते एक emotional detox होते! कारण रोज सतत आपण इतके बोलतो व ऐकतो की त्याचा निचरा होणे कठीणच! अशावेळी शांत राहून, स्वतःच्या अंतर्मनातील आवाजाची खुसपुस (हो हीच खुसपुस जिच्याविषयी माझ्या आजीने मला सांगितले होते!) हळुवारपणे आपल्याला ऐकावयास मिळते हो..
समुपदेशनातही मौन असते बरे!
माझ्या समुपदेशनाच्या केबिनमध्ये रोज अशा अनेक मौनांची आणि आवाजांची असंख्य नाती मी अनुभवत असते. त्या नात्यात नाटकी संवाद नसतात. असतो तो एक समंजस संवाद, कधी नजरेतून, कधी हसण्यातून, आणि कधी चहा समोर ठेवताना होणाऱ्या मौनातून.
एक समुपदेशक म्हणून आम्ही तुमचं मौन ऐकतो. का? कारण ते तुमच्यातले एक unspoken narrative आम्हाला समजण्यास मदत करते. कधी कधी मौनाला शब्द देणं हाच उपचार असतो... आणि कधी मौन साजरं करणं, हेच तर खऱ्या अर्थाने growing असतं.
आहे की नाही मज्जा?
मानसी कोपरे
मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक