घरी आल्यावर 'आतू आतू' करत मला ते नेहमी शोधत होते. कारण मला माझ्या बाबांच्या आत्यांचे नाव ठेवलं आहे त्यामुळे ते मला आतू म्हणत. आपल्या लहानपणापासून ते आतापर्यंत कोणत्याही विषयावर ते माझ्याशी बोलत. मला ते ऐकताना खूप मजा येई.
म्ही त्यांना दादाच म्हणत असू. अजूनही त्याचं नाव मी बाबांना जाऊन विचारते. ते म्हणजे 'आत्माराम उर्फ बाबूली विठोबा परब' संपूर्ण गावचे बाबूली व आमचे दादा. माझ्या बाबांचे चुलत भाऊ, एकदम साधं असं व्यक्तिमत्त्व. पण अभ्यासात लहानपणापासूनच हुशार. सर्वांनाच हवेहवेसे. कोणीही असू आपूलकीने वागणारे. काळाचा घात झाला आणि एका क्षणात माणूस नाहीसा झाला.
त्यांना माझ्याबद्दल जास्त आपुलकी. घरी आल्यावर 'आतू आतू' करत मला ते नेहमी शोधत होते. कारण मला माझ्या बाबांच्या आत्यांचे नाव ठेवलं आहे त्यामुळे ते मला आतू म्हणत. आपल्या लहानपणापासून ते आतापर्यंत कोणत्याही विषयावर ते माझ्याशी बोलत. मला ते ऐकताना खूप मजा येई.
पूर्वी कसे ते एकाच घरात राहत होते याचे चित्रण ते अगदी आताच समोर घडत असल्याप्रमाणे करत. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या होत्या. मोठे असूनही लहान कसं व्हावं याचे उदाहरण म्हणजे दादा. मी काय लिहिते यावर त्यांचे लक्ष होते. जर काही खटकलं किंवा काही दुरुस्त्या ते सहजपणे सांगत. जेव्हा ते गेले तेव्हा मला व माझ्या लिखाणाला पोरकपण वाटलं. इतक्या आत्मियतेने ते सांगत होते, त्यावर विचार करून ते प्रत्येक गोष्ट सहज सांगत.
अनेकदा ते मला सांगत की 'त्यांना लिहिण्याची, वाचण्याची खूप आवड पण घरच्या परिस्थितीमुळे ते पुढे लिहू शकले नाहीत. पण तू लिहितेस, तुझी वाचण्याची आवड व पुस्तक प्रकाशित झाले या सर्वांचा अभिमान आहे' असं मला ते वारंवार सांगत असत.
गावातील कार्यक्रमात जेव्हा मी सूत्रसंचलन करताना त्यांची हजेरी ही होतीच. काही दुरुस्त्या असल्या तर नमुद करून फोन करून किंवा घरी येऊन ते सांगत. अशाने माझा आत्मविश्वास वाढत होता. मला आठवतंय मी दहावीत होते आणि निरोप समारंभाला मला भाषण द्यायला सांगितले होते. कसं लिहावं काय बोलावं हे मला माहीत नव्हते तेव्हा मी त्यांच्या घरी गेले त्यांनी मला सहज मार्गदर्शन केले. दहावीत इतरांना चांगले गुण आले व मला कमी गुण मिळाले याचे त्यांना खूप वाईट वाटले. रोज ते त्याबद्दल सांगत 'कुठे कमी पडलीस?' असं ते विचारत. कारण इतर जी माझ्याबरोबर वर्गात होती ती चुलत काकाची मुलं. आम्ही पाच सहा मुली एकाच वर्गात होतो त्यामुळे सहज त्यांना माझी खंत वाटे. पण जेव्हा मी पुढे लिहायला लागले, पुढचं शिक्षण मराठी विषयात झालं हे कळलं तेव्हा त्यांना माझा अभिमान वाटू लागला त्यामुळे इतरांनाही माझ्याबद्दल ते सांगत होते. लहानपणीच्या आठवणी तर अगदी रंगवून सांगत त्यामुळे कधीच कंटाळा आला नाही. त्यांच्याकडे अनेक गोष्टी सांगण्यासारख्या होत्या. ते शिक्षण घेण्यासाठी बाहेर पडले तिथं त्यांनी आपलं नाव कोरलं. पुढं ते संजिवनी साखर कारखान्यात कामाला होते तिथल्या गोष्टी ते सांगत. या सगळ्या गोष्टी कधीच कंटाळवाण्या नव्हत्या. इतरांशी तात्पुरते ते बोलत पण माझ्याकडे अगदी मनसोक्त गप्पा मारत.
आठ दिवस अगोदर ते आमच्या घरी आले होते. सहज बोलताना अनेक गोष्टी त्यांनी रोजच्याप्रमाणे सांगितल्या. एका क्षणालाही असं वाटलं नव्हतं की ही शेवटची भेट ठरेल. त्यांच्या आठवणींची पुंजी ही हृदयाच्या बंद कप्प्यात जागीच राहणार हे मात्र नक्की. ईश्वर दादांच्या आत्यास शांती देवो हीच सदिच्छा.