अभिमानी माणूस

माझ्या मनात एक मोठी खंत घर करून राहिली आहे की, मी आजोबांकडे जात नाही, त्यांना पुरेसा वेळ देत नाही. या धावपळीच्या जगात त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवावा असे वाटत असूनही, ते शक्य होत नाही.

Story: ललित |
15 hours ago
अभिमानी माणूस

आजोबा... नुसता हा शब्द जरी उच्चारला तरी माझ्या डोळ्यासमोर एक प्रेमळ आणि कणखर चेहरा उभा राहतो. ते माझ्या अगदी मनासारखे आहेत. त्यांचे प्रेम म्हणजे निस्सीम आणि निश्चल सागर आहे. आजही त्यांचे बोलणे माझ्या कानात घुमते. त्यांची ती हाक, तो आवाज आणि माझ्या पाठीवर मायेने फिरणारे त्यांचे प्रेमळ हात... त्यांच्या सानिध्यात मी खरंच खूप सुखी असते. पण आज... आज तेच आजोबा शांतपणे एका कोपऱ्यात बसून सगळं काही पाहत असतात. ज्यांच्या पायात कधी आनंद नाचत होता, ते पाय आता स्थिर झाले आहेत.

घरातील प्रत्येक जबाबदारीला समर्थपणे तोंड देत, कधी ते वयोवृद्ध झाले हे समजले नाही. त्यांचे जीवन एक व्रत होते. आपल्या मुलांना, लेकींना काळजीपूर्वक वाढवणे आणि त्यांना जीवनातील प्रत्येक संकटांचा सामना करण्यासाठी सक्षम बनवणे. त्यांना तीन मुलं आणि चार मुली. प्रत्येकाचे लग्न त्यांनी आपल्या कष्टाच्या कमाईतून थाटामाटात केले. स्वत:च्या पायावर उभे राहून त्यांनी आपल्या मुलांच्या जीवनातील त्या खास क्षणांना आनंदाने साजरे 

केले.

आजोबा आणि आजींचे जीवन म्हणजे एक खडतर प्रवास होता. घराची जबाबदारी सांभाळताना आणि सतत कष्ट करताना त्यांनी आपला संसार उभा केला. त्यांना त्यांच्या नातवंडांचा खूप अभिमान होता. आम्हाला खांद्यावर घेऊन ते अख्ख्या गावात मिरवत फिरत असत. जशी त्यांना लहान मुले प्रिय होती, तसेच त्यांचे प्रेम जनावरांवरही होते. गाई आणि म्हशींच्या दुधावर तूप-दही विकून त्यांनी आपल्या संसाराचा गाडा हाकला आणि त्याच पैशातून आपल्या मुलांची लग्नं केली.

पण आता... आता त्यांची तीन मुलं आणि चार मुली आपापल्या संसारात पूर्णपणे व्यस्त झाले आहेत. त्यांना आता वेळ नाही. आजोबा आणि आजी एकाकी घरात दिवस काढतात. आजही दोघे थोडेफार कष्ट करतात, मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह चालवतात. पण त्यांच्या त्या अथक परिश्रमाची किंमत त्यांच्या मुलांना नाही. या जगात, जिथे प्रत्येकाला स्वतःचा विचार आणि स्वतःचा संसार महत्त्वाचा वाटतो, तिथे त्यांना परावलंबी व्हावे लागले आहे. आजोबा, ज्यांनी आपले संपूर्ण जीवन कुटुंबासाठी समर्पित केले, ते आज अनेक रात्री उपाशी झोपतात. ते कधी काही बोलत नाहीत, पण त्यांच्या चेहऱ्यावरचे दुःख स्पष्टपणे 

दिसते.

माझ्या मनात एक मोठी खंत घर करून राहिली आहे की मी आजोबांकडे जात नाही, त्यांना पुरेसा वेळ देत नाही. या धावपळीच्या जगात त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवावा असे वाटत असूनही, ते शक्य होत नाही. मला आणि माझ्या भावंडांना जे काही शिकायला मिळाले, जीवनाचे जे काही सार आम्ही जाणले, ते त्यांच्याच आशीर्वादाने.

माझे आजोबा आनंदाने, शांतीने आणि प्रेमाने आपला प्रत्येक दिवस जगतात. त्यांच्या कष्टाची, त्यांच्या निःस्वार्थ प्रेमाची आणि त्यांचे एकमेकांवर असलेले निस्सीम प्रेम शब्दात मांडणे खरंच कठीण आहे. हेच त्यांच्या जीवनाचे मुख्य ध्येय आहे आणि याच ध्येयाने ते आजही आपले जीवन जगत आहेत.

आजोबा आणि आजींच्या जीवनातील त्या निस्वार्थ मायेने माझे हृदय भरून येते आणि मी नेहमी त्यांचे मनःपूर्वक आभार मानते. त्यांच्या त्यागापुढे आणि प्रेमापुढे माझे शब्द अपुरे पडतात.


सोनी सिदु झोरो

दाबेल, काणकोण