झाले मोकळे आकाश...

आयुष्यभर ज्या क्षणाची मी वाट पाहत होते तो क्षण भाऊच्या आयुष्यात आता आला होता त्यामुळे भाऊ माझ्याकडे फोनवर अगदी मोकळेपणाने व्यक्त झाला होता. आनंदाच्या शब्दांनी मन मोकळे करीत होता.

Story: तिची कथा |
03rd May, 12:33 am
झाले मोकळे आकाश...

मा    झे मन समाधानाने गुणगुणत होते, ‘फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश...’ नुकताच भाऊचा फोन येऊन गेला होता. आज कितीतरी वर्षांनी भाऊ माझ्याकडे अगदी मनमोकळेपणाने बोलला होता. विचारांचा समुद्र ढवळून काढून त्यातले वैचारिक मोती  निवडून ते आपल्या बोलीतून अगदी भरभरून मला दान केल्यागत भाऊ माझ्याशी बोलत होता. 

भाऊ खूप दिवसांनी हसत खेळत मोकळेपणाने बोलत होता हे तो बोलताना प्रत्येक क्षणाला मला जाणवत होते. भाऊ मोबाईलवर त्या बाजूला जरी होता, तरी माझ्या नयनातून मात्र आनंदाश्रू ओघळत होते. आमच्या दोघांचेही मन आभाळ मोकळे होतानाचा आनंद मात्र अगदी उच्च कोटीचा होता. 

तसे पाहायला गेल्यास भाऊ माझ्यापेक्षा मोठा. सर्वात मोठी आमची ताई, नंतर भाऊ, नंतर मी शेंडेफळ आणि आमची आई… असा आमचा परिवार. माझ्या बालपणी बाबांच्या अकाली जाण्याने भाऊ लहान वयातच मनाने आणि मानाने खूप मोठा झाला. घरच्या जबाबदाऱ्या सांभाळीत त्यांने ताईचे लग्नही केले. मी हायस्कूलमध्ये शिकताना भाऊचे लग्न झाले. घरात सुहासिनीच्या नाजूक गोऱ्या, पावलांनी वहिनीने उंबरठ्यावरचे माप ओलांडून घरात प्रवेश केला व घरात आनंदी, उमेदीचे वातावरण निर्माण झाले. आईलाही वहिनीच्या माहेरचा खंबीर आधार लाभला. माझ्यावर मोठ्या बहिणीसारखी व आमच्या आईवर मुलीसारखी माया करणाऱ्या अशा  आमच्या वहिनीने भाऊंच्या खांद्याला खांदा लावून संसाराची जबाबदारी उचलली आणि समर्थपणे पेलली. 

माझे पदवीपर्यंतचे शिक्षण होताच माझ्याच पसंतीच्या मध्यमवर्गीय मुलाशी माझे लग्नही लावून दिले. पुढे भाऊचा मुलगा म्हणजे श्रीशा शाळेत शिकताना मी बाळंतपणासाठी माहेरी आले. आपल्या वडिलांप्रमाणे तल्लख बुद्धिमत्ता लाभलेल्या भाऊच्या मुलाला पाहून मी आनंदीत तर झालेच पण समाधानीही झाले. श्रीशा वर्गात पहिला यायचा त्याला पाहून वाटायचे की, हा भाऊंची स्वप्ने साकार करणार कारण भाऊही तल्लख बुद्धिमत्ता लाभलेला पण परिस्थितीमुळे शिक्षण घेऊ शकला नव्हता. भाऊच्या मुलाला म्हणजेच श्रीशाला लहानपणापासून डॉक्टरकीची खूप आवड होती. पुढे शिकून आपण डॉक्टरच होणार हे त्याचे बालपणापासूनचे स्वप्न होते. मी जेव्हा बाळंतपणासाठी माहेरी आले तेव्हा मी त्याला बालवयात खेळताना पाहत होते, औषध म्हणून खोकल्यावर उपाय म्हणून तो आजीला लिमलेटच्या गोळ्या देत होता. रिकाम्या औषधांच्या बाटलीत रंगीत पाणी भरून ते सिरप म्हणून सांगत होता. अशा प्रकारचा खेळ खेळताना पाहून आम्हालाही समाधान वाटायचे. 

पुढे शहरातील कॉलेजातही श्रीशा चांगल्या मार्कांनी पास झाला परंतु बारावी पास झाल्यानंतर एक दोन मार्क कमी पडल्यामुळे त्याला डॉक्टरकीला अॅडमिशन मिळाले नाही. पण झाले असे की आमच्याच गावातल्या दुसऱ्या एक मुलाला (रोहन) त्याला रिझर्वेशन सीटमुळे मेडिकलला प्रवेश मिळाला. ज्या मुलाला श्रीशाने अभ्यासात मदत केली होती त्यालाच मेडिकलला प्रवेश मिळाला तोही वैद्यकीय क्षेत्रात असलेल्या राखीव जागेमुळे. त्याची आई  मात्र गावभर फुशारक्या मारीत “आपल्या मुलाला एलोपॅथीक डॉक्टर होण्यासाठी ऍडमिशन मिळाले. आपला मुलगा खूप हुशार.” असे सांगत फिरू लागली. त्याला वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश कसा मिळाला हे गावातील सर्वांनाच माहीत होते. 

श्रीशाला आपल्या दोस्ताला वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळाला या गोष्टीचा खूप आनंद झाला पण आपण इतके कष्ट घेऊनही, त्रास काढून अभ्यास करूनही आपल्याला वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळाला नाही याचे दुःखही त्याला झाले. आम्हालाही श्रीशा इतका हुशार असूनही एक हुशार विद्यार्थी डॉक्टर होण्यापासून मुकला याचे दुःख झाले तरी आम्ही सगळ्यांनी त्याला खूप समजावले. तो मनाने खचल्यासारखा झाला. पण आम्ही सर्वांनी त्याला खूप समजावले. भाऊलाही खूप दुःख झाले पण आपले दुःख त्याने मनोमन गिळून टाकले. सगळ्यांच्या समजावण्यावरून पुढे श्रीशाने मायक्रोबायोलॉजी हा विषय घेऊन बीएस्सी तसेच पुढे एमएस्सी केली. तो विद्यापीठात पहिला आला. 

पुढे त्यांने त्याच विषयात डॉक्टरेटही केली. त्याला सुवर्णपदकही मिळाले. विद्यापीठात एक चांगला प्राध्यापक म्हणून त्याची नियुक्ती झाली. आपल्या गावातील विद्यार्थ्यांना तो मोफत शिकवण्या देऊ लागला. गावातील हुशार विद्यार्थ्यांना तो मोफत मार्गदर्शन करू लागला. पुढे श्रीशाचा विवाह एका हुशार प्राध्यापिकेशी झाला व त्याचा मुलगा म्हणजे भाऊचा नातू अत्रेय हा तर अगदी जन्मजात अतिशय तल्लख बुद्धिमत्तेचाच वारसा घेवूनच जन्माला आला. त्याचे कॉलेज शिक्षण भाऊच्या सांगण्यावरून श्रीशाने शहरातील चांगल्या ख्यातनाम कॉलेजमध्ये झाले. आणि त्याला वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळाला. 

आम्हा सर्वांना वाटले की भाऊंच्या कष्टांचे चीज झाले पण भाऊ मात्र शांत होता. पुढे अत्रेय चांगल्या मार्काने वैद्यकीय क्षेत्रात चमकला. एक हुशार चांगला डॉक्टर म्हणून त्याला डॉक्टरकीच्या पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत म्हणजे परदेशात पाठवण्यात आले. तेथेही बुध्दिमत्ता व स्वकष्टांच्या बळावर एक चांगला डॉक्टर म्हणून तो प्रसिद्ध झाला. तो ज्या   हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिपसाठी प्रॅक्टिस करीत होता तेथेच त्याला डॉक्टर म्हणून नोकरी मिळाली. तो एक चांगला हृदयतज्ञ म्हणून त्याची खात्यी होऊ लागली तेव्हा भाऊला खूप आनंद झाला. 

आता अधूनमधून आपल्या देशातही अत्रेय वैद्यकीय सेवा देण्यासाठी किंवा इथल्या डॉक्टरांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या देशात म्हणजे भारतात येऊ लागला. आता भाऊला खूप आनंद झाला. इतका काळ शांत शांत, आपल्या नातवाबद्दल काहीच न बोलणारा भाऊ मात्र आता आपला नातू डॉक्टर म्हणून त्याचे गुणगान गाऊ लागला. त्यामुळे आम्हा सगळ्यांना भरून पावल्यासारखे झाले. भाऊचे आता वय झाले होते श्रीशा व त्याची धर्मपत्नी गावात ये-जा करून माझ्या भाऊची, वहिनीची खूप काळजी घेत होते. आयुष्यभर कष्टात वाढलेल्या, आयुष्यभर कष्ट काढलेल्या भाऊंच्या ओंजळीत स्वप्नपूर्तीचे मोठे सुख देवाने म्हातारपणात पदरी घातले होते. त्याची स्वप्नपूर्ती होताना आम्हालाही खूप आनंद होत होता.

 इतक्या दिवसात गप्प गप्प असणारा भाऊ आज मात्र माझ्याशी फोनवरून आपल्या नातवाबद्दल म्हणजेच डॉ. अत्रेयबद्दल भरभरून बोलत होता. त्यालाही कारणही तसेच होते. सगळ्या दैनिकातून, वर्तमानपत्रातून व टीव्हीवरच्या बातम्यातून  बातमी प्रसिद्ध झाली होती की एक-दोन दिवसांत अत्रेयचा भव्य सत्कार प्रधानमंत्र्यांच्या हस्ते एका मोठ्या कार्यक्रमात दिल्ली येथे होणार आहे आणि श्रीशा व त्यांच्या पत्नीला अत्रेयचे माता-पिता म्हणून कार्यक्रमाला  जाण्यापासून तिथे निवास करण्यापर्यंत सगळी व्यवस्था सरकारने केली होती. भाऊंचा मुलगा श्रीशा व सुनबाईंना खास आमंत्रण आणि विमान प्रवासाची तिकिटेही त्यांनी पाठवली. 

हे सारे पाहून भाऊंचा आनंद गगनात मावेनासा झाला. आयुष्यभर ज्या क्षणाची मी वाट पाहत होते तो क्षण भाऊच्या आयुष्यात आता आला होता त्यामुळे भाऊ माझ्याकडे फोनवर अगदी मनमोकळेपणाने व्यक्त झाला होता. आनंदाच्या शब्दांनी मन मोकळे करीत होता. माझे मन म्हणत होते ‘झाले मोकळे आकाश’... गाणे गुणगुणताना नकळत माझ्या भाऊंचा सारा संघर्षमयी जीवनातील चढ उतारांचा जीवनपट माझ्या डोळ्यांसमोरून तरळून गेला.


शर्मिला प्रभू 
आगाळी, फातोर्डा-मडगाव