आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये लठ्ठपणा ही एक गंभीर आरोग्य समस्या बनली आहे. विशेष करून महिलांमध्ये वाढते वजन व त्याकारणाने होणारा गुडघ्यांवरील परिणाम अधिक प्रकर्षाने दिसून येत आहे.
गुडघा हा शरीराचा सर्वाधिक भार पेलणारा सांधा आहे. जेव्हा शरीराचे वजन वाढलेले असते, तेव्हा गुडघ्यांवर त्याचा परिणाम दिसून येतो. प्रत्येक पाऊल टाकताना गुडघ्यांवर शरीराच्या वजनाच्या ३ ते ६ पट भार येतो. त्यामुळे लठ्ठ महिलांमध्ये गुडघ्यांतील स्नायू, हाडे आणि कार्टिलेज यावर अधिक ताण पडतो. तसेच लठ्ठ महिलांमध्ये ऑस्टिओआर्थरायटिस होण्याची शक्यता जास्त असते. या स्थितीत गुडघ्यातील कार्टिलेज झिजू लागते आणि सांध्यांमध्ये सूज व वेदना निर्माण होतात. शरीरातील अतिरिक्त चरबीमुळे निर्माण होणारे साइटोकाइन्स नावाचे द्रव्य आतील सूज वाढवतात व यामुळे सांधेदुखी तीव्र होऊ शकते.
महिलांमध्ये विशेष करून नितंब, पोट आणि मांड्यांवर चरबी जास्त प्रमाणात साठू शकते. या भागात चरबी साठल्यामुळे वजन तर वाढतेच, पण त्यामुळे शरीराची हालचाल, चालण्याची ढब व पायांवरील संतुलन बिघडते. या बदलामुळे गुडघ्यावरील ताण अजून वाढला
जातो. लठ्ठपणामुळे शरीरामध्ये सूज निर्माण करणाऱ्या घटकांचे प्रमाण वाढते. या सूजेमुळे गुडघ्यांचे सांधे लालसर, गरम होतात, दुखू लागतात, सांध्यांची हालचाल मर्यादित होते, चालताना क्लिकींग किंवा क्रॅकींग आवाज येतो तसेच दीर्घकाळ बसल्यानंतर उठताना त्रास होतो. ही लक्षणे पुढील जीवनशैलीतील बदलांमुळे होऊ शकतात.
व्यायामाचा अभाव : वजन वाढल्यामुळे महिलांना शारीरिक हालचाली करणे कठीण जाते, ज्यामुळे गुडघ्यांची लवचिकता कमी होते.
तणाव व हार्मोनल बदल : शरीरातील हार्मोन्समध्ये होणाऱ्या बदलांमुळेही सांधेदुखी वाढू शकते.
अनियमित आहार : तेलकट व साखरयुक्त पदार्थांचे जास्त सेवन केल्यामुळे वजन वाढते आणि गुडघ्यांवर परिणाम होतो.
गुडघ्याचे दुखणे आणि लठ्ठपणामुळे काही महिलांमध्ये नैराश्य, आत्मविश्वासाचा अभाव आणि चिंता निर्माण होऊ शकते. यामुळे त्या अजून निष्क्रिय होतात, वजन कमी करणे अवघड होते व हे चक्र चालूच राहते.
लठ्ठपणामुळे होणाऱ्या गुडघेदुखीवर पुढील प्रतिबंध आणि उपाय केले जाऊ शकतात.
वजन कमी करणे : अगदी थोड्या प्रमाणात म्हणजे ५-१०% सुद्धा वजन कमी केल्याने गुडघ्यांवरील ताण कमी होऊ शकतो.
संतुलित आहार घेणे : जास्त तळलेले पदार्थ, मैदा, साखर टाळावे. प्रथिने, फायबरयुक्त व कमी कॅलरीचा आहार घ्यावा. भाजीपाला, फळे, डाळी, अंडी आहारात असावी. पाणी भरपूर प्यावे.
नियमित व्यायाम करणे : पोहणे, योगासने, चालणे यांसारखा हलका व्यायाम दररोज ३० मिनिटे करावा. पायाची ताकद वाढवण्याचे नियोजित व्यायाम फिजिओथेरपिस्टच्या मार्गदर्शनाखाली करावेत.
योग आणि स्ट्रेचिंग : गुडघ्याच्या लवचिकतेसाठी योगासने (उदा. ताडासन, वज्रासन) करावीत. नियमित स्ट्रेचिंग केल्याने स्नायू मजबूत राहू शकतात.
योग्य शूज वापरणे : मऊ, पायाला आधार देणाऱ्या चपला वापरल्याने गुडघ्यांवर येत असलेला ताण कमी होऊ शकतो.
गुडघ्यावर ताण टाळणे : पाय घालून बसणे, लवकर-लवकर जिने चढणे टाळणे यामुळे गुडघेदुखीत नक्कीच बदल येऊ शकतो.
वैद्यकीय उपाय आणि फिजिओथेरपी घेणे : बी.एम.आय. तपासणी करून घ्यावी. ऑर्थोपेडिक डॉक्टरांकडून गुडघ्यांचे एक्स-रे किंवा जास्त दुखत असल्यास एम.आर.आय. करून घ्यावा. त्रास जास्त असल्यास गुडघ्यांचे इंजेक्शन, हायालुरोनिक अॅसिड, पी.आर.पी. असे उपचार शक्य असतात. डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलेले उपचार व फिजिओथेरपी या वेदना कमी करू शकतात.
महिलांच्या लठ्ठपणाचा गुडघेदुखीशी अतूट संबंध आहे. पण संशोधनानुसार १०% वजन कमी केल्याने गुडघ्याच्या दुखण्यात ५०% पर्यंत सुधारणा दिसून येऊ शकते. अनेक महिलांनी जीवनशैलीत छोटे छोटे बदल करून गुडघ्याचे त्रास कायमचे टाळलेले आहेत. वेळेत लक्ष दिल्यास आणि योग्य उपाययोजना केल्यास या त्रासावर नियंत्रण ठेवता येते. आरोग्यपूर्ण जीवनशैलीचे अवलंब केल्यास वजन नियंत्रणात राहते आणि गुडघेदुखीपासून सुटका मिळू शकते.
डॉ. श्वेता राऊत मुळगावकर