जास्वंद

प्रेम, जबाबदारी, आपुलकी, कर्तव्य, झालेच तर सामाजिक आणि नैतिक बांधिलकी या सगळ्या भावनांबरोबरच नवरा बायकोमध्ये एक अशी भावना असते जिची व्याख्या केली जाऊ शकत नाही. ती सहवासाने येते आणि वेळ पडल्यावर या सगळ्या भावनांच्या वरचढ ठरते.

Story: आवडलेलं |
03rd May, 12:22 am
जास्वंद

याच सदरातला ‘कतरन’ या लघुपटावरचा लेख वाचून मला एकाचा मेसेज आला. ते म्हणत होते की, नवरा बायकोचे नाते म्हणजे एक गूढ, संशोधनाचा विषय आहे. वेगवेगळ्या परिस्थितीत आणि काहीवेळा तर वेगवेगळ्या संस्कृतीत वाढलेली दोन माणसे वयाच्या एका टप्यावर एकत्र येतात आणि तिथून पुढे अख्खे आयुष्य एकत्र काढतात. मलाही वाटले, की खरेच. लग्न करणे सोपे आहे पण ते निभावणे मात्र अवघड. 

एकत्र जगताना आयुष्याची दोन टोके जुळवताना काय कमी अडचणी येत असतील? भावनिक, मानसिक, कौटुंबिक, आर्थिक अशा कितीतरी बाजू सांभाळून आपला आणि आपल्या जोडीदाराच्या आयुष्याचा गाडा पुढे न्यायचा असतो. असंख्य खड्डे असलेला हा रस्ता कधीकधी समोर दिसत असतो पण पार कसा करायचा हा प्रश्न असतो. कधीकधी तर हा रस्ता दिसतही नाही... अनेकदा असे होते दिशा, वेळ, काळ कशाचाच ताळमेळ लागत नसताना, केवळ स्वतःवर आणि आपल्या जोडीदारावर विश्वास ठेवून चालत राहणे इतकेच आपल्या हातात असते. 'तुझे माझे जमेना अन् तुझ्यावाचून करमेना...’ लहानपणी हे वाक्य मी भावंडांच्या संबंधात अनेकदा ऐकले आहे, पण आता वाटते की नवरा बायकोच्याबाबतीतही हे तितकेच खरे आहे की, विशेषतः नात्याचे अमुक एक वय ओलांडल्यावर! 

नवरा-बायकोच्या एकरूप होण्यावरून लहानपणी ऐकलेले एक विधान नेहमी मला आठवते. आजकाल तर ते मला पटूही लागले आहे. असे म्हणतात की एकत्र राहणाऱ्या या दोन व्यक्ती काही काळाने चक्क एकमेकांसारखी दिसायला लागतात! अर्थातच लहानपणी मी हे वाक्य हसण्यावारीच न्यायचे. याला काही शास्त्रीय आधारही नाही. पण आता माझ्या बघण्यात खरेच अशी जोडपी आहेत जी एकमेकांसारखी दिसतात! जेव्हा जेव्हा अशी जोडपी समोर येतात, तेव्हा तेव्हा मला थोडे हसू येते. मग मी त्यामागचा अर्थ शोधायला जाते, वाटते एकत्र राहिल्यामुळे एकसारखे शब्द वापरणे, एकसारखे हावभाव असणे किंवा एका विशिष्ट पद्धतीने बोलणे या सवयीही इतक्या सहज एकमेकांच्या उचलल्या जातात... याचमुळे तर ती एकसारखी दिसत नसतील? 

पण प्रत्येक गोष्टीचा अर्थ शोधायला जाऊ नये असे म्हणतात आणि तेही मला इतकेच पटते. काही गोष्टी गूढ असतात, अनाकलनीय असतात. त्या तशाच राहू द्याव्यात. नवरा बायको या नात्यातला अर्थ शोधणे ही या गोष्टींपैकीच एक. हा विचार मी अधिक गांभीर्याने केला तो ‘जास्वंद’ नावाचा, हल्लीच प्रदर्शित झालेला लघुपट बघून. नीना कुलकर्णी आणि मोहन जोशी यांच्यासारखे कलाकार असल्यावर लघुपट खास असणार हे उघड होते. तरीही सुरुवातीला अगदी साचेबद्ध पद्धतीने जातोय की काय अशी शंका आली पण जसजसा लघुपट पुढे सरकत राहिला, तशा अनेक गोष्टी हळुवारपणे उलगडत गेल्या. 

प्रेम, जबाबदारी, आपुलकी, कर्तव्य, झालेच तर सामाजिक आणि नैतिक बांधिलकी या सगळ्या भावनांबरोबरच नवरा बायकोमध्ये एक अशी भावना असते जिची व्याख्या केली जाऊ शकत नाही. ती सहवासाने येते आणि वेळ पडल्यावर या सगळ्या भावनांच्या वरचढ ठरते. या भावनेची नेमकी व्याख्या काय, तिचे धड नावही सांगता येणार नाही. लघुपट बघताना या भावनेचा प्रत्यय मात्र येत राहतो. 

वाढत्या वयात शारीरिक आणि मानसिक बदल होतात, त्यानुसार नात्यातही अनेक बदल होत असावेत. त्यात दोघांमधला एकजण जर एखाद्या आजाराशी सामना करत असेल तर ती लढाई त्या दोघांची होऊन बसते. आजाराशी सामना करणारी व्यक्ती शारीरिक, मानसिक आणि भावनिक त्रासातून जात असते तर दुसरी व्यक्तीही वेगळ्या पातळीवर भावनिक आणि मानसिक समस्यांना तोंड देत असते. अशावेळी आयुष्यात येणारे बदल सहज, सोपे नसतात. अशा बदलांचा स्वीकार करून, रोजच्या जीवनात त्यानुसार बदल करणे मोठे संयमाचे असले पाहिजे. ही संयमाची पूर्तता परिपक्व नात्यातच होऊ शकते. तशीच ती या नात्यात होते. मानसिक, भावनिक पातळीवर एकरूप झालेले हे नवरा बायको एका आजाराच्या निमित्ताने बांधले जातात. त्या आजाराला हरवणे शक्य नसते हे आपल्याला आणि त्यांनाही कळत असते आणि तरीही आपल्या मनातल्या एका शक्यतेत तो आजार हरलेला असतो... 

या आजाराला हरवण्याच्या शक्यतेवर बेतलेल्या या लघुपटाची उकल प्रत्येकाला वेगळ्या पद्धतीने होऊ शकतेच.. हा फक्त मी माझ्या पद्धतीने घेतलेला धांडोळा.


मुग्धा मणेरीकर,
फोंडा