तिच्या जाण्याने मनात एक अनामिक हुरहुर लागून राहिलेली असते आणि त्यामुळे तिच्या भेटीच्या आशेत गुरफटून राहताना तिची ओढ मनाला व्याकूळ करून राहते. आणि मनाला भरभरून आनंद दिल्यानंतर तिच्या जाण्याची सल मनात कायम टोचत राहते.
तिच्या येण्याच्या प्रतीक्षेतला प्रत्येक क्षण हा मनाची उत्कंठा, अनामिक हुरहुर वाढवणारा ठरतो. ती येणारच आहे अगदी आताच! ती आहेच माझ्यासाठी... फक्त माझ्यासाठीच! ती कधीही येऊ शकते... अगदी आत्ता या क्षणालाही... माझ्यापाशी ती कधी येईल? याची वाट पाहताना. ‘हुरहुर असते तीच उरी... दिवस बरा की रात्र बरी?’ हा प्रश्न मनाला सतावत राहतो. आणि तिच्या येण्याच्या प्रतीक्षेत तहानभूक हरपून तिच्या येण्याची वाट पहात असलेला तो... त्याच्या मनाची झालेली अवस्था ही फार बिकट होऊन जाते. कारण तिच्या येण्याची वाट पाहताना एक एक सेकंद हा त्याच्यासाठी त्याला एक एक तासासारखा वाटत असतो आणि मग तिच्या येण्याची वाट पाहत तो मनातल्या मनात तळमळत, झुरत झुरत आलेला क्षण पुढे ढकलत असतो.
ज्येष्ठ कवि चिं. त्र्यं. खानोलकर उर्फ आरती प्रभू यांनी आपल्या ‘नक्षत्रांचे देणे’ या कवितासंग्रहातील ‘उदास’ या गाण्यात या भावंनांचे उदात्त चित्रण केले आहे. ते म्हणतात...
ती येते आणिक जाते
येताना कधी कळ्या आणिते
अन जाताना फुले मागते
या गाण्याला जेव्हा पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीताचा स्वरसाज चढला, आणि त्याला पहाडी आवाजातील प्रसिद्ध गायक महेंद्र कपूर. ज्यांनी हिन्दी चित्रपट सृष्टीत आपल्या आवाजाने आपला वेगळा ठसा उमटवला होता, त्यांच्या आवाजात या गीताचा अर्थ जाणून घेताना आपण जेव्हा परत परत हे गाणे ऐकतो, तेव्हा त्यातील भावार्थ हा प्रत्येक वेळेस अधिकाधिक समजत जातो आणि हे गाणे हृदयात झंकारत राहते.
‘ती’ च्या प्रतीक्षेत असणारा तो... ती आपल्यापाशी येऊन आपल्या जीवनाला कधी अर्थ प्राप्त करून देईल, या आशेवर आहे. आता ‘ती’ म्हणजे लेखकाची प्रतिभा, कवीची कविता किंवा प्रियकराची प्रेयसी असा कोणताही अर्थ आपण आपापल्या परीने घेऊ शकतो. लेखकाची प्रतिभा, स्फूर्ती आपल्यापाशी कधी येईल आणि आपल्या हातून चैतन्याचे चांदणे आपल्या प्रतिभेत प्रतीत होईल, या आशेत लेखक असतो. कल्पनेच्या विश्वात रमलेला कवी हा आपल्या मनात कवितेचे स्फुल्लिंग कधी फुलून येईल आणि छानशी कविता शब्दांत नटून थटून कधी कागदावर उतरेल याची त्याला उत्कंठा लागून राहिलेली असते. तर प्रियकर हा आपल्या प्रेयसीची वाट पहात असताना तिच्या प्रेमाने फुलून येणारे त्याचे प्रेम हे कधी बहरास आणि पूर्णत्वास येईल या आशेवर तिच्या येण्याची वाट पाहत झुरत असतो.
जेव्हा ती त्याच्याकडे येते, तेव्हा तिने आणलेल्या प्रतिभेच्या, काव्याच्या, प्रेमाच्या कळ्या ममतेने त्याच्याकडून नाजूकतेने जपल्या जातात, तेव्हा त्याची सुंदर फुले निर्माण होतात. ही फुले लेखकाच्या प्रतिभेतून त्याच्या दर्जेदार लेखनात फुलतात. कवितेत काव्याच्या स्वरुपात फुलतात, तर प्रियकराच्या हृदयातील प्रेमाचे अंतरंग फुलताना त्याचे प्रेम बहरास येते आणि आत्मिक समाधान लाभताना उत्कट प्रेम म्हणजे काय? याचा सुंदर अनुभव येतो. हे इतके सुंदर आणि उत्कट अनुभव घेण्यासाठी ती जेव्हा ज्या उत्कटतेने येते, तेव्हा तिच्यातील अपूर्णतेच्या कळ्या या पूर्णत्वास आणताना तिच्याशी तितक्याच उत्कटेने समरसून जाणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळेच ती जेव्हा येते तेव्हा तिच्या बिलगून जाण्याने आसमंत प्रफुल्लित होतो. चैतन्याचे चांदणे फुलते, आसमंत अनामिक सुगंधाने भरून जातो...
देणे घेणे हा तर निसर्गाचा अलिखित नियम! देण्याघेण्यातून प्रेम वाढत जाते. देणारा हात असला, की त्याला थांबणे हे माहीत नसते. ज्याला प्रेम ज्या उत्कटेने दिले, तितक्याच उत्कटेने ते परत जेव्हा मिळते तेव्हा होणारा आनंद हा कल्पनेच्या पलीकडला असतो. कधी कधी अकल्पित असे प्रेम मिळून जाते.
येणे जाणे देणे घेणे
असते गाणे जे न कधी ते म्हणते
ती येते आणिक जाते!
असे जेव्हा आरती प्रभू म्हणतात, तेव्हा अकल्पित अशी प्रतिभा फुलून येताना निर्माण होणारी कलाकृती, गाणे प्रेमाचा अनुभव हा अंतर्मनाला आनंद, तृप्ती, समाधान देणारा असाच असतो.
लेखकाची प्रतिभा घेऊन, कवितेची कविता घेऊन, प्रियकराची प्रेयसी प्रेम घेऊन जेव्हा ती या स्वरुपात येते, तेव्हा ती अकस्मात न येता काहीशी लाजत लाजतच येते. या लाजण्याचा अर्थ काही केल्या समजत नाही. तिला तर बिलगून जावेसे वाटत असते तरीही ती नाही म्हणते...
येताना कधी अशी लाजते
तर जाताना ती लाजविते
कळते काही उगीच तेही
नकळत पाही काही बाही
अर्थावाचून उगीच नाही नाही म्हणते
ती येते आणिक जाते!
तिला ही यायचं आहे. अगदी जवळ येऊन बिलगून जायचं आहे. तरीही ती लाजून नाहीच म्हणत आहे. हे सर्व काही त्याच्या समजण्यापलीकडचे आहे. तिच्या लाजून नाही म्हणण्यातच तिचा होकार आहे, हे मात्र कवीला समजून यायला उशीर लागतो आणि ती जवळ यायला उत्सुक असूनही नाही म्हणत आहे असे कवी आपल्या गीतात म्हणतात की येताना तर ती लाजतेच, पण जातानाही लाजतच जाते आणि मग तिच्या जाण्याने निर्माण होणारी हुरहुर, तिच्या पुन्हा भेटीची जबरदस्त ओढ मनात निर्माण होत राहते. ती आता परत कधी येईल आणि परत हा तिच्या भेटीचा आनंद आपल्याला कधी मिळेल याच आशेवर तो झुरत राहतो. मग ती लेखकाची प्रतिभा असो, कवितेची कविता असो वा प्रियकराची प्रेयसी असो.
ती जेव्हा येते, तेव्हा ती गुणगुणतच आलेली असते. तिच्या या गुणगुणत येण्याने जसा काही वसंत फुलून आलेला असतो. खूप प्रतीक्षा केल्यावर, ती जेव्हा येते, तेव्हा खूप खूप दुराव्यानंतर आलेली असते. तिच्या येण्याने हा दुरावा जेव्हा संपतो, तेव्हा लक्ष लक्ष कळ्या फुलून आल्याचा आनंद मनात साठून राहतो आणि मग जातानाही ती एकदम न जाता मनात रुंजी घालूनच जाते. तिच्या जाण्याने मनात एक अनामिक हुरहुर लागून राहिलेली असते आणि त्यामुळे तिच्या भेटीच्या आशेत गुरफटून राहताना तिची ओढ मनाला व्याकूळ करून राहते. आणि मनाला भरभरून आनंद दिल्यानंतरचे तिच्या जाण्याची सल मनात कायम टोचत राहते आणि मग पुढे आपल्या या गाण्याच्या शेवटच्या कडव्यात कवी आरती प्रभू लिहितात...
येतानाची कसली रीत
गुणगुणते ती संध्यागीत
जाताना कधी फिरून येत
जाण्यासाठीच दुरून येत
विचित्र येते, विरुनी जाते
जी जी सलते
ती येते... आणिक जाते!
येताना कधी कळ्या आणिते
कविता आमोणकर