बाब्या ते बाबा शेट...

तर असा हा बाब्या पंच झाला, मग सरपंच, जिल्हा परिषद, शिड्याच शिड्या. आलेल्या संधीचे सोने करणे हा तर बाब्याचा हातचा मळ. पदे आली, पैसा आला, बाब्याचा बाबा शेट झाला.

Story: व्यक्ती एके व्यक्ती |
16 hours ago
बाब्या ते बाबा शेट...

आजच पेपरला बातमी वाचली थोर समाज सेवक चंद्रहास कोंडिबा उर्फ बाबाशेट दडपे यांना समाज भूषण पुरस्कार जाहीर. चंद्रहास दडपे? नाव कुठेतरी वाचल्यासारखे आठवत होते. थोडावेळ बसून शांतपणे मनाची टेप रिवाइंड केली. शाळेत पोहचले. गावची माध्यमिक शाळा दिसू लागली. मळके धोतर, टोपी घातलेले कोचरेकर मास्तर उजळणी घेत होते. पण पांढरा शर्ट, खाकी चड्डी घालून सगळी मुले व निळा स्कर्ट घालून मुली मधल्या सुट्टीच्या आठवणीने चुळबुळत बसली होती. हळूहळू आठवणींचा कॅमेरा सगळ्यात मागील रांगेत गेला. एक उंचसा, ओठांवर बारीक लव फुटलेला बाप्यासा पोरगा दिसू लागला. निमगोरा वर्ण, मठ्ठ चेहरा थोडेथोडे आठवू लागले. तेवढ्यात कोचरेकर मास्तर जोरात ओरडले, बाब्या सांग वीस अधिक वीस किती?

हा आत्ता आठवले कोण चंद्रहास दडपे? अरे हा तर आमचा बाब्या. आमच्या शाळेतील अभ्यास सोडून सर्वकाही येत असणारा बाब्या उर्फ चंद्रहास दडपे. गावातील एकमेव दारू दुकानाचा मालक कोंडीबा दडपे  यांचा पाच मुलीवर झालेला एकुलता एक मुलगा. पैसेवाल्या घरच्यांचा लाडका मुलगा जसा असतो तसा सेम होता चंद्रहास. अर्थात एवढ्या अवजड नावाचा व बाब्याचा अर्थात आधीही काही संबंध नव्हता. पौर्णिमेच्या दिवशी जन्मला म्हणून चंद्रहास. अख्खे गाव त्याला बाब्या म्हणूनच ओळखे.

     अतिशय वांड आणि मस्तीखोर असा हा बाब्या  शाळेत  मास्तरांसाठी एक  कटकटच होता. बरे बाप स्वतः दारूवाला त्यामुळे कीर्ती तशीच होती. त्यामुळे मास्तर लोकही जरा टरकूनच होते. मग आमच्यासारख्या पोराटोरांचे काय?

भर वर्गात कोंबडीचे पिल्लू सोडणे, मास्तरांची खुर्ची मोडून ठेवणे, नको ते उद्योग त्याला सुचत असत. आमच्या शाळेत शाळा तपासणीच्या वेळेस सर्व मुलांना हजर राहणे बंधनकारक होते फक्त बाब्या सोडून. त्यादिवशी बाब्याला शाळेतून खास सुट्टी मिळायची. त्याचे कारणही खास होते. मुळात मस्ती, मारामारीत अव्वल असणारा बाब्या अभ्यासात पूर्णपणे गोल भोपळा होता. एकेका इयत्तेत दोन ते तीन वर्षे काढून कसाबसा आठवी झाला. त्यामुळे तपासनीसाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर बाब्याला माहीत तरी असायला हवे त्यापेक्षा तो न आलेला परवडला, असे स्पष्ट मत शिक्षकांचे होते. अभ्यासाच्या बाबतीत बाब्या कसाही असला तरी इतर अवांतर गोष्टीत त्याचा हात धरणारा गावात दुसरा कोणी नव्हता. खेकडे धरणे, पाग लावणे, आंबे चोरणे ह्या गोष्टी अगदी हातचा मळ त्याच्या. खरे तर माझ्यापेक्षा खूप मोठा तो पण का कुणास ठाऊक मला लहान बहिणीसारखा वागवयाचा. शाळेत कदाचित माझे दोन्ही मोठे भाऊ त्याचे वर्गमित्र होते म्हणून किंवा त्यांच्या सहाय्याने तो दोन इयत्ता पुढे गेला असेल म्हणून कोणास ठाऊक?

उन्हाळ्यात परीक्षेच्या वेळेस कैऱ्या मिळत. थंडी भरेल म्हणून घरातून कैऱ्या खायला बंदी होती अश्यावेळी उपयोगी पडे बाब्या. रोज खिशातून चारपाच कैऱ्या, मीठ घेऊन येत असे. मधल्या सुट्टीत डब्यापेक्षा आमचे लक्ष कैऱ्यावरतीच जास्त असे. घरी कैऱ्या, चिंच न खाताही लेकीला खोकला कसा होतो हा आईला पडलेला कायमचाच प्रश्न होता. कोचरेकर मास्तरांना पावसात खेकडे देण्याच्या बोलीवर बाब्याची रवानगी वरच्या वर्गात होत असे असा हा बाब्या एक दिवस शाळा सुटायच्या आधीच बेल मारताना पकडला गेला आणि  मग सुटली त्याची शाळा ती कायमचीच.  

बाब्या तसा भयंकर हिकमती, शाळा सुटली तरी वांडपणा सुटला नव्हता. त्यात आठवीपर्यंत शिक्षण म्हणजे त्याच्या घरात पदवीच ती एक. कारण घरातल्या कोणाचेही शिक्षण, शाळा ह्या शब्दाशी दुरान्वयेही संबंध नव्हता कधी. गावभर फिरणारा बाब्या पैशाची गरज पडली तर मग थोडावेळ बापाच्या दारूच्या धंद्यावर बसत असे. पोरगा मदत करतो म्हणून बाप खूश आणि कॅशमध्ये हात मारायला मिळतो म्हणून पोरगाही खूश असा हा सरळसोट  व्यवहार अनेक दिवस चालू होता.

दिवस जाऊ लागले, आधीच दांडगट बाब्या आत्ता खरेच बाप्या दिसायला लागला. अर्थात आमच्याकडे त्याचे चांगले संबंध होते म्हणा विशेषतः मोठ्या भावाशी. कोणत्याही अडीअडचणीला यायचा तो न सांगता.

अशातच कोणीतरी त्याच्या मनात भरवून दिले ते म्हणजे ग्रामपंचायत निवडणुकीला उभे रहायचे. नसतं खुळ भरले त्याच्या डोक्यात. तिरमिरीत अर्ज तर भरला, अरे पण बाब्याला मत देणार कोण? आधीच पोरगा अशिक्षित, वांड त्यात बापाचा दारूचा धंदा. गावात सुशिक्षित काय दारुडेसुद्धा मत देणार नाही अशी परिस्थिती. त्यात समोरचा प्रतिस्पर्धीही तगडा होता. काय करायचे? शेवटी बाब्याने शक्कल लढवलीच. कोंडिबाची गावाबाहेर नदीच्या जवळ बरीच पडीक जमीन होती. वापर काहीच नव्हता तिचा. कित्येक वर्षे गावकरी त्या जमिनीचा उपयोग निसर्गाच्या हाकेला ओ देण्याकरिता करत. पूर्वी गावात कुठे आले हो संडास वगैरे तर अश्या ह्या जमिनीचा मालक कोंडिबा. त्याचाही आक्षेप नव्हता कधी पण बाब्याने मात्र अक्कल लढवली आणि त्याला त्याचे करियर बनविण्यास ही गोष्ट कारणीभूत ठरली. झाले काय की निवडणुकीच्या दोन दिवस आधीपासून रोज पहाटे बाब्या एक दांडा घेऊनच जायचा नदीवर आणि जे कोण नैसर्गिक विधीला यायचे त्याच्या जमिनीत, त्यांना  सांगायचं की आज येताय, इतकी वर्षे आलात पण जर मला पंचायत निवडणुकीत मत दिले नाही तर मात्र लक्षात राहुंदे कायमची वहिवाट बंद करीन, दोन दिवस हेच चालू होते. गावकऱ्यांनी विचार केला गावचा विकास काय घडेल हो पण रोजच्या विधींचे काय? ते तर चुकत नाहीत आणि चुकवताही येत नाहीत. झाले ठरले गावाचे आणि बाब्या निवडून आला. अहो शेवटी निसर्ग हाक महत्त्वाची. ती कशी दाबून ठेवणार? आणि किती दिवस? त्यापेक्षा बाब्याला मत दिलेले परवडले.

तर असा हा बाब्या पंच झाला, मग सरपंच, जिल्हा परिषद, शिड्याच शिड्या. आलेल्या संधीचे सोने करणे हा तर बाब्याचा हातचा मळ. पदे आली, पैसा आला, बाब्याचा बाबा शेट झाला. तसे गावात कामही चांगले होते त्याचे. गावकरी मानू लागले. त्यात बाबा शेटने आपला परंपरागत दारूचा धंदाही बंद केला. मग काय मान वाढला ना! 

ज्या शाळेने हाकलले त्या शाळेची डागडुजी आपल्या खर्चाने केली त्याने. कोचरेकर गुरुजींच्या मुलाला त्याच शाळेत कामालाही लावले. अनेक समाज उपयोगी कामे केली त्याने आणि करतोय तो. पण आपला हिस्सा ठेवूनच. अहो राजकारण हेच पोट भरायचे साधन आहे त्याचे. बाबाशेटचे मस्त चालू आहे आता.

      सगळे प्रसंग एखाद्या चित्रपटासारखे उभे झाले डोळ्यांसमोर. अचानक फोन वाजला. मोठ्या भावाचा कॉल होता. अग तुला आठवतो का बाब्या, आज त्याला समाज भुषण पुरस्कार मिळाला. आम्ही तिथेच आहोत आत्ता वगैरे. मनाला बरे वाटले. खरंच एक टाकाऊ माणूस आज बहुउपयोगी ठरला ह्याचे...


  रेशम जयंत झारापकर 

मडगाव