याच क्षणाची तुम्ही वाट पाहताय काय, आज समस्त युवा वर्ग हादरलाय या तुमच्या निर्णयाने, आमच्या पिढीने पुढे काय पाहायचं, ही तुमची माया नागरी आमचं अस्तित्वच संपवणारी...
‘नको गं नको गं आक्रंदे जमीन, पायाशी लोळत विनवी नमून’
आज कुसुमाग्रज यांची ही कविता बरोब्बर कळून चुकली. त्यावेळी संदर्भ स्पष्टीकरण करताना ह्या कवितेचे मर्म त्या बालवयात तेवढे भावले नव्हते. कारण आगगाडी म्हटली की, आम्हा मुलांची ती आवडती, ती आम्हाला मामाच्या गावाला न्यायची ना! आता कुठे राहिलीय ती मामाच्या गावाची ओढ. आता न तिथे आजी राहिली ना राहिले आजोबा आणि ना त्यांनी लावलेली ती प्रसन्न वल्ली.
असो, त्या वेळी ती आगगाडी जमिनीवर मजेत धावून जमिनीचे खिंडारे पाडीत होती. पण माझ्या बालमनाला मात्र उद्दामपणे धावणारी आगगाडीच पाहण्यास कुतूहल वाटायचं. जमीन बिचारी दुर्बल होऊन आक्रोश करायची, ‘नको गं असे छातीत, माझ्या खिंडारे पाडू; असे जळते निखारे माझ्या उरावर टाकून नको गं मला जाळीत जाऊ.’ मग ती बेभान आगगाडी आणखीन गर्जत जायची, मी अशीच माझ्या पोलादी टाचा तुझ्या उरात खुपसून अशीच तुला चेंदत जाईन. तू भेकड, दुर्बल आहेस. तुला मला अडवण्याचा काहीही अधिकार नाही.
मित्रहो, ती जमीन आजही भेकड नाही, दुर्बल तर नाहीच. ती आमची माय आहे. क्षणात ती आपल्या संयमाची परिभाषा बदलू शकते. तिची मर्यादा ओलांडू नका. आज जमीन म्हणजे आम्ही सामान्य लोकजन आणि आगगाडी म्हणजे आम्ही आमच्या हितासाठी निवडून दिलेले प्रतिनिधी. अहो ज्या नौकेत आम्ही सर्व सामान्य जनता सैर करीत आहोत त्याच नौकेचे तुम्ही प्रवासी आहात. जर आम्ही बुडलो तर तुम्ही पण बुडणार. चार पैसे जास्त मिळतात म्हणून माजून जाऊ नका. ज्या तुमच्या पिढीसाठी हा पैसा तुम्ही करवून ठेवता आहात ती पिढीतरी तुमच्या या कर्माने शाबूत राहील का? त्यांना तरी मोकळा श्वास घेण्यास मिळेल का? तुमच्या या माया नगरीत. किती सुंदर निसर्ग होता माझ्या या पेडणे महालाचा. सात समुद्रा पलीकडील पर्यटक या आमच्या पेडणे महालात विश्रांतीसाठी येतात. ती विश्रांती भ्रष्ट करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला हो. मतदान करतेवेळी तर तुमचा जाहीरनामा वेगळाच होता. हा कुरघोडीचा प्रवास तुमचा त्यात तर बिलकुल नव्हता.
पूर्वी आमची गाई-गुरं बिनधास्त रानावनात भटकायची. आमचे पाळीव प्राणी आणि जंगलात राहणारे प्राणी यात कमालीचा तालमेल होता. आता जंगलात काय घरच्या गोठ्यात सुधा आमच्या पाळीव प्राण्यांना शाश्वती नाही राहिली. प्राण्यांबरोबर आज माणसांच्या जीवाला पण धोका वाढलाय या जंगली प्राण्यांपासून. त्या प्राण्यांची मर्यादा कोणी ओलांडली. तुम्ही निवडून आलात आणि एकदम हिंस्रक बनलात. एकदा निवडून येऊन तुम्ही गड जिंकलात का हो? असं अमानुष होऊन का वागता तुम्ही. आधीच आमच्या सुंदर जंगलाची वाट लाऊन टाकलीत त्या दिल्लीवाल्यांना थारा देऊन आणि आता ९० विला? अरे आपल्याला शेवटी त्या देवाच्या दरबारीच जायचं आहे. पण शून्यहीन झालेल्या शरीराला या मातीतच मिसळायचं आहे. तेवढी तरी जमीन आणि माती शिल्लक ठेवा ना? माणसाचं माणूसपण थोडं तरी जपा रे. उद्या आपल्याला काडीचाही मोल राहणार नाही या बाहेरच्या पैशांनी विकत घेणाऱ्या ठेकेदारीत.
शेवटी आगगाडीही अशीच बेभान होऊन गर्जत कड्या कपारीत वेगाने धावत सुटते आपला धाक वाढवत, जसे आज पैशांच्या आशेने तुम्ही आमचे तारणहार फसत आहात आमच्या विनंतीला न जुमानता त्या दिल्लीदारांच्या जाळ्यात. पण शेवटी जमिनीचा संयम संपतो आणि शेवटी ती क्रोधाने थरारत आपले रौद्र रूप धारण करते तेव्हा सगळे जंगल, आकाश हादरून टाकते, क्षणार्धात त्या माजलेल्या गाडीची हजारो शकले होऊन ती खोल दरीत कोसळते.
याच क्षणाची तुम्ही वाट पाहताय काय, आज समस्त युवा वर्ग हादरलाय या तुमच्या निर्णयाने, आमच्या पिढीने पुढे काय पाहायचं, ही तुमची माया नागरी. निदान त्या राखणदाराची तरी भीती बाळगा. त्यांनी कुणालाही सोडलेलं नाही आहे. डोळे उघडे ठेवून बघा विनाकारण राखणदारांच्या वाटेला गेलेल्यांची सुद्धा आगगाडीसारखीच दशा झालेली आहे. आज हे अती होतंय. म्हणून लहान तोंडी मोठा घास घ्यावा लागला. आम्ही दुर्बल भेकड आहोत हा तुमचा भ्रम आहे. देव ही एकच गोष्ट शाश्वत आहे बाकीच सार क्षणभंगूर. आम्ही त्या राखणदाराचे प्रतिनिधी आहोत, त्या मायभूमीचे रक्षक आहोत. आम्हाला फक्त त्या मायभूमीचे पांग फेडायचे आहेत.
तेजल तुलसीदास नाईक
दांडोसवाडा, मांद्रे (विद्यार्थिनी)