त्या फुलांच्या गंधकोषी…

बालकांच्या निरागस हास्यात ईश्वराचे स्वरूप जाणवते. अवघ्या चराचरात या ईश्वराचे स्वरूप व्यापून राहिलेले आहेच तरीही कवी आपल्या गीतात हे ईश्वरा, ही सर्व तुझीच रुपे आहेत ना? असे पुन्हा पुन्हा विचारात त्याच्याकडून होकाराच्या अपेक्षेत आहे.

Story: शब्दगीते |
16 hours ago
त्या फुलांच्या गंधकोषी…

ईश्वर ही अशी एक व्यापक शक्ती आहे की त्या शक्तीला आपण प्रत्यक्षात तर कधी पाहिले नाही. परंतु या शक्तीचा अनुभव, आपण निसर्गातील अनेक गोष्टींतून घेत असतो. ईश्वर हा आत्म्याइतकाच निर्गुण आणि निराकार आहे. हे सुंदर जग ईश्वरानेच निर्माण केले आहे. आणि या जगातील प्रत्येक वस्तू ही त्या ईश्वराची निर्मिती आहे. सृष्टीची निर्मिती करताना त्यातील प्रत्येक जिवामध्ये त्याने सुंदरता निर्माण केली. आणि हे अवघे जग सुंदर करून टाकले.

सर्वज्ञ आणि सर्वशक्तीसंपन्न असलेल्या ईश्वराप्रती आपण लीन होत त्याने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल आपण नेहमीच कृतज्ञ राहतो. हे जग ही ईश्वराची निर्मिती आहे आणि सर्वत्र तो व्यापून राहिलेला असला तरी प्रत्यक्ष उघड्या डोळ्यांनी त्याचे दर्शन कधीच होत नाही. तरीही त्याने निर्माण केलेल्या फुलांच्या सुगंधात, आकाशातील चांदण्यांच्या तेजात, सागराच्या लाटांत, पाण्याची बरसात करणार्‍या मेघांत, नभात लखलखणार्‍या विजेत, कष्टकरी  बांधवांच्या नेत्रात, माऊलीच्या वात्सल्याच्या दुधात या ईश्वराचे अस्तित्व आपल्याला अनुभवायला मिळते.

आपल्या जीवनाचा हा मोठा अर्थ ‘त्या फुलांच्या गंधकोषी... सांग तू आहेस का...’ या गाण्यात गीतकार सूर्यकांत खांडेकर यांनी आपल्या सुंदर शब्दांत सांगितला आहे. या गाण्याला पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आपल्या अप्रतिम आवाजात स्वरसाज चढवताना कमालीची ऊंची गाठली आहे. या गाण्याचे संगीतही अर्थात हृदयनाथ यांचेच आहे, हे वेगळे सांगायला नको. कारण आपल्या आवाजातील बहुतांशी गीतांना पंडितजी स्वत:च संगीत देत असत. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतावर आधारित पंडितजींच्या गाण्यांचा रसास्वाद घेताना मन कसे अगदी तृप्त होऊन जाते!

‘त्या फुलांच्या गंधकोषी... सांग तू आहेस का?

त्या प्रकाशी तारकांच्या ओतीसी तू तेज का?

त्या नभांच्या निलरंगी... होऊनिया गीत का?

त्या फुलांच्या गंधकोषी...’

ईश्वराचे अस्तित्व शोधताना त्याला समर्पित केलेले हे गीत आहे. ईश्वराचा शोध घेताना त्याचे अस्तित्व फुलांच्या गंधकोषात शोधताना त्या गंधात, तारकांच्या देदीप्यमान प्रकाशात, आकाशाच्या निळ्याशार रंगात वार्‍याच्या गाण्यात तुझेच रूप आहे का? हा प्रश्न खुद्द ईश्वरालाच विचारला जात आहे.

‘मानवाच्या अंतरीचा प्राण तू आहेस का?

वादळाच्या सागराचे घोर तू रूप का ?

जीवनी या वर्षणारा तू कृपेचा मेघ का ?

आसमंती नाचणारी तू विजेची रेघ का?

त्या फुलांच्या गंधकोषी...’ 

या मानवी देहात ज्याने प्राण ओतून सजीव केले आहे, तो प्राण म्हणजे तूच आहेस ना? वादळामुळे उसळलेल्या सागराचे घनघोर रूप ते तुझेच आहे ना? जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या पाण्याचा वर्षाव अवघ्या सृष्टीवर करणारा मेघ ही तूच आणि आभाळात लखलखणारी, कडाडत जाणारी विजेची रेघ ही तूच आहेस ना? हा प्रश्न ईश्वराला गीतकार सूर्यकांत खांडेकर जरी विचारत असले तरी त्यांना या सर्व रूपात ईश्वराचे अस्तित्व आहे हे ठाऊक आहे.

ईश्वर हा चराचरात व्यापून राहिलेला आहे. तरीही त्याचा शोध घेणे हे अनंत काळापासून चालूच आहे. ईश्वराने प्रत्यक्ष मूर्त स्वरुपात कधीही कोणाला दर्शन जरी दिले नाही, तरी निसर्गातील प्रत्येक कणाकणात त्याचे अस्तित्व भरून राहिले आहे. या ईश्वराची प्रचिती घेण्यासाठी, किंवा त्याचे स्वरूप जाणून घेण्यासाठी बहिर्मन नाही तर अंतर्मन जागृत असावे लागते. ज्ञात आणि अज्ञात विश्वात  जितक्या गूढ गोष्टी दडून राहिलेल्या आहेत, त्याचा उलगडा होणे शक्य नाही. काधी कधी काही घटना अशा काही घडून जातात की त्यावर विश्वास ठेवणे अशक्यप्राय होऊन जाते आणि तिथेच देवाचे अस्तित्व आपल्याला जाणवते.

आपल्या बाळाला जन्म देताच आईला दुधाचा पान्हा फुटतो. या वात्सल्याच्या पान्ह्यात ईश्वराचा अंश जाणवतो. कष्ट उपसणार्‍या कष्टकर्‍यांच्या कष्टांनी त्यांच्या नेत्रात उमटलेल्या समाधानाच्या चमकदार रंगात ही याच ईश्वराचे रूप साकारत आहे. बालकांच्या निरागस हास्यात ईश्वराचे स्वरूप जाणवते. अवघ्या चराचरात या ईश्वराचे स्वरूप व्यापून राहिलेले आहेच तरीही कवी आपल्या गीतात हे ईश्वरा, ही सर्व तुझीच रुपे आहेत ना? असे पुन्हा पुन्हा विचारात त्याच्याकडून होकाराच्या अपेक्षेत आहे. आणि हे ईश्वराला पुन्हा पुन्हा विचारताना कवी सूर्यकांत खांडेकर म्हणतात,

‘जीवनी संजीवनी तू माऊलीचे दूध का?

कष्टणार्‍या बांधवांच्या रंगसी नेत्रात का?

मूर्त तू मानव्य का रे बालकांचे हास्य का?

या इथे अन त्या तिथे रे, सांग तू आहेस का?

त्या फुलांच्या गंधकोषी! सांग तू आहेस का??’



कविता आमोणकर