मुक्ता

हा लघुपट अगदी उत्तम म्हणावा असा नसला, तरीही त्यात मांडलेला प्रश्न अगदी गरजेचा आहे. तो प्रश्न म्हणजे, गाडी चालवायची गरज असणे किंवा नसणे हा नसून गरज पडली तर गाडी चालवता येते का नाही हा आहे. याचे उत्तर आपल्याला ठाऊक आहेच... हो ना

Story: आवडलेलं |
21 hours ago
मुक्ता

“अर्निंग आणि ड्रायव्हिंग हे मुलींसाठी गरजेचेच...” माझ्यापेक्षा वयाने थोडीशी आणि अनुभवाने खूप मोठी असलेली एक मैत्रीण एकदा बोलता बोलता बोलून गेली. मला तर ऐकता क्षणीच ते पटले. पैसे कमावणे, स्वावलंबन याबद्दल बऱ्याचदा बोलून आणि लिहूनही झाले आहे. त्यामुळे आज आपण ड्रायव्हिंगबद्दल बोलू या. 

खरेतर बायका आणि गाडी चालवणे, विशेषतः चारचाकी यावर बरेच विनोद असतात. या विनोदांमध्ये काही तथ्य नाही पण ते इतक्या प्रमाणात आणि एका विशिष्ट पद्धतीने आपल्याला सांगितले गेले आहेत, जात आहेत त्यामुळे आपला उगाच एक समज निर्माण झाला आहे, की बायकांना गाडी चालवता येत नाही. यातूनच मग बायकांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होतो. मग गाडी चालवताना एखादी चूक झाली, तरी लगेच अवसान गळून जाते. माझ्या ओळखीतच अशा कित्येक बायका आहेत, ज्या परवाना असूनही गाडी चालवत नाहीत. कारणे अगदी किरकोळ, ‘एकदा गाडी धडकली, त्यानंतर आत्मविश्वासच वाटत नाही.’ किंवा ‘चुकून ब्रेक दाबायचा होता आणि मी एक्सेलेटर दाबला.. त्यानंतर भीतीच बसली आहे.’ किंवा नेहमीचे ठरलेले कारण 'कशाला लागते गाडी? सोडायला कुणीतरी असतेच..’ अगदी दूर कशाला जा? माझ्याबाबतीतही काही वर्षांपूर्वी हीच परिस्थिती होती. दुचाकी चालवूनसुद्धा चारचाकी चालवायचा आत्मविश्वास नव्हता. पुण्यात, चेन्नईत राहताना बस, रिक्षा, टॅक्सी सहज मिळायच्या त्यामुळे चारचाकीशिवाय कधी अडलेही नाही, पण गोव्यात आल्यावर त्याची प्रकर्षाने गरज वाटायला लागली. सतत कुणावर तरी अवलंबून असणे नकोसे वाटायला लागले. आपल्या सतत अवलंबून असण्याचा समोरच्या माणसाला त्रास होतो ही भावनाही मूळ धरू लागली. सुदैवाने माझ्या आजुबाजूला अशी माणसे होती, ज्यांनी मला प्रोत्साहन दिले. 

गेल्या वर्षी पाठीला दुखापत झाल्यावर गाडी चालवण्यावर बंधने आली. त्याकाळात हे अवलंबून असणे अधिक प्रमाणात जाणवायला लागले, मलाही आणि मी ज्यांच्यावर अवलंबून होते, कदाचित त्यांनाही. अर्थात अशा अपरिहार्य घटना घडत असतातच, त्यामुळे त्याबद्दल अपराधी भावना मनात ठेवू नये. पण त्यानिमित्ताने जाणवले, की मी जर गाडी शिकलेच नसते तर आयुष्यभर आपली आणि इतरांचीही किती मोठी गैरसोय झाली असती! 

अनेकांना असे प्रोत्साहन नसते, याची मला जाणीव आहे. आत्मविश्वास नसण्याचे मूळ कारण यातच दडलेले असते हेही मला माहीत आहे. पण या सगळ्या गोष्टींवर मात करून आपल्याला, गरज असो वा नसो काही गोष्टी आपल्या स्वतःसाठी जमल्या पाहिजेत आणि त्यातली गाडी चालवणे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे असे मला खरेच वाटते. 

‘मुक्ता’ हे अतिशय समर्पक शीर्षक असलेली एक ‘लाँग शॉर्ट फिल्म’ मी बघितली. लाँग शॉर्ट फिल्म म्हणून अनेक लघुपट उपलब्ध आहेत. सहसा लघुपट म्हणजे, जे पंधरा ते वीस मिनिटांचे असतात. काही लघुपट अतिशय कमी वेळाचे, म्हणजे अगदी एखाद दुसऱ्या मिनिटांचेही असतात. पण या लाँग शॉर्ट फिल्म अर्धा तासाच्या आहेत. यामध्ये अर्थातच घटना, पात्रे अधिक स्पष्ट होतात. 

मुक्ता या लघुपटातली मुक्ता ही नायिका आपल्या नवऱ्या आणि मुलाबरोबर परदेशात राहत असते. तिने गाडी शिकावी म्हणून नवरा सतत तिच्या मागे लागलेला असतो. पण हिला त्याचा जाच होत असतो. लघुपटात हेच विविध प्रकारे दाखवणाऱ्या अनेक घटना आहेत. पण त्या पुन्हा पुन्हा दाखवल्या जात आहेत किंवा वारंवार एकच गोष्ट सांगितली जात आहे असे वाटत नाही. एक असाही प्रसंग यात आहे की, तिच्या गाडी न चालवण्यामुळे तिच्या मुलालाही ऐन वेळेला शाळेसाठी लागणारी वस्तू बाजारातून आणता येत नाही. नवऱ्याचे मागे लागणे एकीकडे आणि मुलाचे नाराज होणे एकीकडे अशा मनःस्थितीत असूनदेखील तिच्यात आत्मविश्वास निर्माण होत नसतो. खरेतर, परदेशात राहून ती केटरिंगचा व्यवसाय करणारी स्त्री असते. म्हणजे तिच्यात आत्मविश्वासाचा अगदीच अभाव असतो असेही नाही. शिवाय तिच्या व्यवसायाची गरज म्हणूनही तिला गाडी चालवता येणे भागच असते, पण असे असतानाही काहीतरी कुठेतरी कमी पडत असते. 

हे कमी पडणे काय आहे, हे नेमकेपणाने सांगता आणि समजून घेताही येणार नाही. पण हे जिचे तिला माहीत असते एवढे मात्र खात्रीने सांगू शकते. 

अशावेळी एक धक्का फक्त गरजेचा असतो. हा धक्का प्रत्येकासाठी वेगवेगळा असू शकतो. मुक्ताच्या बाबतीत तरी तिला तिच्या जवळच्या माणसांच्या प्रोत्साहाचा फारसा फायदा होत नव्हता. उलट तिला तो जाचच वाटत होता. पण तिच्या व्यवसायाच्यासंबंधी जेव्हा आणीबाणीची परिस्थिती येते, तेव्हा ती खंबीर होते. तिचा मुलगाही तिला त्या प्रसंगात धीर देतो आणि ती तिच्या भीतीवर मात करते. 

लघुपटात एक फार छान वाक्य आहे, ‘तिसऱ्याच्या जीवावर दुसऱ्याला कमिटमेंट देऊ नये.’ 

हा लघुपट अगदी उत्तम म्हणावा असा नसला, तरीही त्यात मांडलेला प्रश्न अगदी गरजेचा आहे. तो प्रश्न म्हणजे, गाडी चालवायची गरज असणे किंवा नसणे हा नसून गरज पडली तर गाडी चालवता येते का नाही हा आहे. याचे उत्तर आपल्याला ठाऊक आहेच... हो ना?


मुग्धा मणेरीकर

फोंडा