पंचायतीकडून काम बंदची नोटीस बजावूनही काम सुरू
हरमल : जूनसवाडा मांद्रे येथील २७२/३ या रेंडारवुड कंपनीने खरेदी केलेल्या जागेत रिव्हा रिसॉर्ट्सने लोखंडी खांब घालून कुंपण घालण्याचे काम सुरू होते. बाऊन्सरच्या उपस्थितीत हे काम करीत असल्याचे पाहून सरपंच व पंचायत मंडळाने धाव घेऊन काम बंद करण्याची नोटीस बजावली. यानंतर स्थानिक व रिव्हा रिसॉर्ट्स अधिकाऱ्यांत वादावादी झाली. मांद्रे पोलीस निरीक्षक गीरेंद्र नाईक यांनी समेट करण्याचा प्रयत्न केला. यावेळी ४० पेक्षा बाऊन्सर आणल्यामुळे तणाव निर्माण झाला होता.
शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास रिव्हा रिसॉर्ट्सने कुंपणाबाहेरील जागेत कुंपण घालण्याचे काम सुरू केले. त्यावेळी ४० पेक्षा जास्त बाऊन्सर कुळ मुंडकरांच्या जमिनीत उभे राहिले. यावेळी अँथनी फर्नांडिस यांनी आक्षेप घेत, स्थानिक पंच रॉबर्ट फर्नांडिस यांना सांगितले. यावेळी सरपंच व अन्य पंचायत सदस्य, पंचायत सचिव अमित प्रभू घटनास्थळी दाखल झाले. अँथनी फर्नांडिस यांनी पोलिसात तक्रार दिल्यावर ते घटनास्थळी दाखल झाले होते.
सरपंच राजेश मांद्रेकर यांनी सांगितले की, महिनाभरापूर्वी रिव्हाने परवानगी मागितली होती. परंतु त्या जागेत मुंडकार राहत असून सदरचे प्रकरण न्यायालयात चालू आहे. मात्र, स्थानिक पंचायतने नकार दिल्यानंतर त्यांनी पंचायत संचालकाकडे दाद मागितली. संचालनालयाने परवानगी दिली व काम सुरू केले. मांद्रे पंचायत ग्रामस्थांच्या बाजूने आहे. सदरचे काम बंद करण्याची नोटीस सरपंच राजेश मांद्रेकर व सचिव प्रभू यांनी पोलीस व रिव्हा अधिकाऱ्यांना दाखवली व काम बंद पाडले, असे सरपंच मांद्रेकर यानी सांगितले.
पंचायतीने फाईल नामंजूर केली व पंचायत संचालनालयाने तीन दिवसांत परवानगी देण्याचे आदेश पंचायत सचिवास दिले असल्याचे पंच नाईक यांनी सांगितले. यावेळी मांद्रे पोलीस निरीक्षक नाईक यांनी मुंडकार व्यक्तीकडे कागदपत्रे मागितली.
पंचायतीचे कायदा सल्लागार अॅड. प्रसाद शहापूरकर यांनी सांगितले, रिव्हाने सीआरझेडकडून बेकायदेशीर परवाना मिळवताना, या जागेतील मुंडकरांची घरे दाखवली नाहीत. पंचायतची ऑर्डर बाजूला ठेऊन पंचायत संचालनालयाने त्यांना परवाना दिला. पंचायतने जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. पंचायतीने कोणताच परवाना दिला नाही, उलट काम बंद ऑर्डर दिली आहे, असे ॲड. शहापूरकर यांनी सांगितले.
संबंधितांना अटक करण्याचे पोलिसांचे आश्वासन
खासगी जमिनीत प्रवेश केल्याबद्दल तक्रार दिली असून, पोलिसांनी त्यांना त्वरित अटक करण्याची मागणी पंच रॉबर्ट फर्नांडिस, प्रशांत नाईक यांनी केली. मांद्रे पोलीस निरीक्षक नाईक यांनी संबंधितांना २४ तासात अटक करण्यात येईल, असे सांगितले.