पणजी : गोमंतकीय महिला बसमध्येही असुरक्षित : रिव्हॉल्युशनरी गोवन्सचा आरोप

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
25th April, 04:19 pm
पणजी : गोमंतकीय महिला बसमध्येही असुरक्षित : रिव्हॉल्युशनरी गोवन्सचा आरोप

पणजी : राज्यातील बससेवेचा महिलांना सुरक्षिततेच्या दृष्टीने फारसा फायदा होत नसल्याचा आरोप रिव्हॉल्युशनरी गोवन्स (आरजी) पक्षाने केला आहे. बसमध्ये परप्रांतीय प्रवाशांची संख्या अधिक असते. महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र बस नसल्याने गोमंतकीय महिलांना असुरक्षित भासत असल्याचे पक्षप्रमुख मनोज परब व महिला कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.

आज आयोजित पत्रकार परिषदेत आरजी पक्षाने भाजप सरकारवर निशाणा साधला. महिलांना केवळ प्रचारासाठी वापरले जाते, मात्र त्यांच्या सुरक्षेकडे सरकारचे दुर्लक्ष आहे, असे परब म्हणाले. ‘स्त्री क्रांती’ या आरजीच्या महिला आघाडीतून महिलांनी एकत्र येऊन लढा उभारण्याचे आवाहन करण्यात आले.

बाणावलीच्या आयडा रॉड्रिग्स यांनी सकाळी व सायंकाळी बसमधील गर्दी आणि पॅनिक बटन नसल्यामुळे महिलांना धोका जाणवतो, असे सांगितले. उसगावमध्ये काम करणाऱ्या प्रणया नाईक यांनी औद्योगिक क्षेत्रात परप्रांतीयांकडून महिलांना मिळणारी अपमानास्पद वागणूक उघड केली. महिलांच्या सुरक्षेसाठी खास उपाययोजना सरकारने कराव्यात, अशी मागणीही या कार्यकर्त्यांनी केली. सरकारी योजनांचाही लाभ निवडक महिलांपुरता मर्यादित असल्याचाही आरोप रिव्हॉल्युशनरी गोवन्सच्या महिला आघाडीने केला आहे.

हेही वाचा