नेमकी काय होती पोस्ट? सविस्तर वाचा...
पणजी : मराठी आणि कोकणी या दोन भाषांतील वाद काही दिवसांपासून पुन्हा चव्हाट्यावर आलेला असतानाच, मराठीसंदर्भात सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्याबाबत प्रकाश नाईक यांच्याविरोधात म्हार्दोळ पोलीस स्थानकांत गुन्हा नोंद झाला आहे. डॉ. मधु घोडकिरेकर यांनी ही तक्रार दाखल केली होती.
'ज्यांना मराठी हवी त्यांनी खुशाल महाराष्ट्रात जावे. असे लोक गोव्यातील तरुणांची वाट लावण्यासाठी पुढे आले आहेत. त्यामुळे नीज गोंयकारांनी त्यांचा विरोध केला पाहिजे' अशी आशयाची पोस्ट प्रकाश नाईक यांनी ३१ मार्च रोजी फेसबुकवर केली होती. नाईक यांच्या या पोस्टला आक्षेप घेत डॉ. घोडकिरेकर यांनी म्हार्दोळ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. फेसबुकवर द्वेषमुलक पोस्ट करून राज्यातील दोन भाषिक गटांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न प्रकाश नाईक करीत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. या पोस्टमुळे राज्यातील मराठीप्रेमींमध्येही संताप पसरला होता. याची दखल घेत म्हार्दोळ पोलिसांनी प्रकाश नाईक यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १९(१)(अ)(ब) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. त्यांच्यावरील गुन्हा सिद्ध झाल्यास त्यांना तीन वर्षांचा तुरुंगवासदेखील भोगावा लागू शकतो.
दरम्यान, कोकणीप्रमाणेच मराठी भाषेलाही सरकारने राजभाषेचा दर्जा द्यावा, अशी मागणी राज्यातील मराठीप्रेमींकडून होत आहे. तर, कोकणीवाद्यांकडून मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यास विरोध केला जात आहे. या वादातून मराठी आणि कोकणी भाषा आंदोलनांतील कार्यकर्ते विविध माध्यमांतून एकमेकांसमोर येत असून, त्यांच्यात यावरून वाद झडत असतानाच, कोकणीची तळी उचलत मराठीप्रेमींवर घसरलेल्या प्रकाश नाईक यांच्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.