यावर्षी ७ देशांमध्ये होणार रोड शो, इव्हेंट, महोत्सव

पर्यटन खात्यातर्फे वर्षभराचे कॅलेंडर निश्चित

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th April, 11:48 pm
यावर्षी ७ देशांमध्ये होणार रोड शो, इव्हेंट, महोत्सव

पणजी : पर्यटन खात्याने रोड शो, इव्हेंट आणि महोत्सव ठरवण्यासाठी कॅलेंडर जाहीर केले आहे. त्यानुसार २०२५-२६ मध्ये सात देशांमध्ये व्यापार मेळावे भरवण्याचा निर्णय खात्याने घेतला आहे. तसेच गोवा महोत्सव साजरा करण्यासाठी पर्यटन खात्याने कॅलेंडरही निश्चित केले आहे. पर्यटन खात्यातर्फे मार्केटींग आणि जनसंपर्क विषयक २१ व्या उच्चस्तरीय समितीची बैठक पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
या बैठकीला पर्यटन सचिव संजीव आहुजा, पर्यटन संचालक केदार नाईक, गोवा पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक कुलदीप आरोलकर, टीटीएजीचे अध्यक्ष जॅक सुखिजा, ट्रॅव्हल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अर्नस्ट डायस, बिगफूट संग्रहालयाचे संस्थापक महेंद्र अाल्वारिस, गोवा पर्यटन मंडळाचे सदस्य मार्क मेंडिस आणि मोपा विमानतळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
टीटीएजीचे अध्यक्ष जॅक सुखिजा म्हणाले, गोवा पर्यटन मंडळाकडे चार उच्चस्तरीय समित्या असून त्यांची दरवर्षी बैठक होते. गुरुवारी मार्केटिंग आणि पीआर विषयीची बैठक होऊन यात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय व्यापार मेळावे, रोड शो आणि महोत्सवांसाठी अर्थसंकल्पीय वाटपाबाबत चर्चा झाली. या तिन्ही मुद्द्यांसाठी येत्या वर्षाचे कॅलेंडर जवळपास निश्चित झाले असून सात देशांमध्ये रोड शोचे आयोजन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आखाती देशांमध्येही ‘रोड शो’चे आयोजन
- आगामी २०२५-२६ साठी पर्यटन खाते सप्टेंबरमध्ये आयटीबी सिंगापूर, नोव्हेंबरमध्ये डब्ल्यूटीएम लंडन, सप्टेंबरमध्ये रशिया, उझबेकिस्तान आणि कझाकिस्तान, तर मार्च २०२६ मध्ये आयटीबी बर्लिन आणि एटीएम दुबई या व्यापार मेळाव्यात सहभागी होण्याची योजना आखत आहे.
- यासाठी रोड शोचे आयोजन केले असून आखाती देशांमध्ये प्रत्येकी एक रोड शो असेल जो गोवा, पश्चिम आणि पूर्व युरोपीय देश तसेच आग्नेय देशांशी थेट जोडला जाईल.
- देशातील टियर १, टियर २ आणि टियर ३ शहरांमध्ये रोड शो आयोजित करण्याचा प्रस्तावही त्यांनी ठेवला आहे. गोव्यातील १० महोत्सवांचे कॅलेंडर पर्यटन खात्याने निश्चित केले आहे, अशी माहिती सुखिजा यांनी दिली.

हेही वाचा