गोवेकरांचे निरोगी आरोग्य हीच मला वाढदिवसाची भेट!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत : साखळी रवींद्र भवनमध्ये मेगा आरोग्य शिबिर

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
24th April, 11:21 pm
गोवेकरांचे निरोगी आरोग्य हीच मला वाढदिवसाची भेट!

साखळी रवींद्र भवनात मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना शुभेच्छा देताना एक वृद्ध महिला.

साखळी : माझ्या वाढदिवसानिमित्त सर्व साेहळे रद्द केले तरी सेवा कार्यक्रम सुरू राहिले. लोकांनी मला शुभेच्छा देण्यासाठी गर्दी न करता आरोग्य शिबिरांचा लाभ घेत आपले आरोग्य निरोगी राखावे, हीच मला गोमंतकीयांकडून मोठी शुभेच्छा व भेट ठरेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त साखळी रवींद्र भवनात आयोजित मेगा आरोग्य शिबिरास भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली व सर्व डॉक्टरांचे या सेवेबद्दल आभार मानले. यावेळी साखळीतील भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच नगराध्यक्षा सिध्दी प्रभू, उपनगराध्यक्ष आनंद काणेकर, विविध पंचायतींचे सरपंच, उपसरपंच, पंच, नगरसेवक व मोठ्या संख्येने मुख्यमंत्र्यांच्या चाहत्यांची गर्दी होती.
पहलगाम हल्ल्यात मृत पावलेल्या देशवासीयांमुळे दुखवटा असल्याने मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी आपल्या वाढदिनी साजरे करणारे सर्व कार्यक्रम रद्द केले होते. केवळ सेवा कार्यक्रम सुरू राहणार, असे जाहीर केले होते. त्यानुसार लोकांनी आपणास शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन केले होते. तरीही साखळी हाऊसिंगबोर्ड येथील निवासस्थानी सकाळीच मोठ्या संख्येने डॉ. सावंत यांच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. अनेकांनी बर्थडे केकही आणले होते. परंतु, मुख्यमंत्र्यांनी केक कापण्यास नकार दिला. तसेच पुष्पगुच्छ आणण्यास मज्जाव केल्यामुळे अनेकांनी हस्तांदोलन करून मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.

परिसरातील मंदिरांचे मुख्यमंत्र्यांकडून दर्शन
वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी सकाळी हरवळेतील देव श्री रुद्रेश्वराचे, दत्तवाडी साखळीतील श्री दत्तात्रेयांचे, सुर्लतील देवतांचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अनेक आमदारांनी भेटी देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.      

हेही वाचा