सासष्टी : मडगावात गोवा मुस्लिम फोरमतर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध

पहलगाम हल्ल्याची सखोल चौकशी व्हावी : संघटनेचे अध्यक्ष शेख इफ्तिकार यांची मागणी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
25th April, 02:22 pm
सासष्टी : मडगावात गोवा मुस्लिम फोरमतर्फे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध

मडगाव : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ गोवा मुस्लिम फोरमतर्फे दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध व्यक्त करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते अझीम शेख, संघटनेचे अध्यक्ष शेख इफ्तिकार आणि अशरफ पांडियाल यांनी या वेळी उपस्थितीत पत्रकारांशी संवाद साधला. दहशतवाद्यांचा कोणताही धर्म नसतो, असे स्पष्ट करून त्यांनी हल्ल्याच्या सखोल चौकशीची मागणी केली.

इस्लाम शांती आणि माणुसकी शिकवतो, हत्या नाही!

दहशतवादाला धर्म नसतो. खरा मुसलमान कधीच दहशतवादी होऊ शकत नाही. इस्लाम कुणाचाही जीव घेण्याची नाही, तर वाचवण्याची शिकवण देतो, असे अझीम शेख म्हणाले. हल्ल्यानंतर काश्मिरी मुस्लिमांनी मदतीचा हात पुढे करून  माणुसकीचे दर्शन घडवले. त्यामुळे माध्यमांनी समाजात मुस्लिमांविरोधात द्वेष पसरवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

चुकीच्या माहितीच्या आधारे गैरसमज पसरवू नये : इफ्तिकार 

संघटनेचे अध्यक्ष शेख इफ्तिकार यांनी स्पष्ट शब्दांत केंद्र सरकारकडे हल्ल्याची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. कडक सुरक्षा असतानाही दहशतवादी शस्त्रांसह त्या भागात पोहोचले कसे? हे समजून घेणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले. त्यांनी हल्ल्यामागे भारतातील धार्मिक ऐक्यता भंग करण्याचे कारस्थान असल्याचे म्हटले. इस्लाम धर्म कोणत्याही निर्बलावर अन्याय करण्यास शिकवत नाही.

भारत हा शांतीप्रिय देश आहे आणि सर्वधर्मीय नागरिक इथे एकत्र सुख समाधानाने राहतात. काही जणांच्या दहशतवादी कृत्यामुळे ही एकता डगमगणार नाही, असे ते म्हणाले. यावेळी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुस्लिम समाजाने हल्ल्याचा तीव्र निषेध करून, देशातील शांतता आणि ऐक्य अबाधित राहावे, यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

हेही वाचा