पणजी : गोव्यातील डिचोली तालुक्यातील रीतेश वायंगणकर यांनी हिमालयातील अन्नपूर्णा बेस कॅम्प ट्रेक पूर्ण करून इतिहास रचला आहे. शरीरात ८८ टक्के दिव्यांगत्व असूनही तब्बल ७५ किलोमीटरचा हा खडतर ट्रेक त्यांनी अदम्य इच्छाशक्तीच्या जोरावर अवघ्या ४ दिवसांत पूर्ण केला. १३ ते २४ एप्रिल २०२५ दरम्यान 'टिंकेश अॅबिलिटी फाउंडेशन' आणि 'अद्वैत आउटडोअर्स' यांच्या पुढाकाराने भारतातील सर्वात मोठ्या इन्क्लूसिव्ह हिमालयीन ट्रेकचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत सहभागी झालेले रीतेश हे एकमेव गोमंतकीय दिव्यांग होते.
या खडतर ट्रेकमध्ये रीतेश यांनी केवळ बेस कॅम्पपर्यंत पोहोचण्यावर समाधान मानले नाही, तर त्यांनी त्यानंतर परतीचा संपूर्ण ७५ किमीचा प्रवासही पायी पूर्ण केला हे विशेष. या मोहिमेत त्यांच्या सोबत टिंकेश कौशिक (ट्रिपल अॅम्प्युटी व 'टिंकेश फाउंडेशन'चे संस्थापक), रचित ( हँड अॅम्प्युटी आणि तीनदा कर्करोगावर मात करणारे तथा मोटिवेशनल स्पीकर) नितीन ( हँड अॅम्प्युटी), दिपेन्द्र व गोविंद (पार्शिअल हँड अॅम्प्युटी) तसेच इतर ९ दिव्यांग पर्वतारोही सहभागी झाले होते.
मनाची ताकद अथांग आहे, या ताकदीच्या जोरावरच अशी शिखरे पादाक्रांत करता येतात. सुरुवातीला प्रत्येक छोटा टप्पा महत्त्वाचा असतो. प्रत्येक पावलाचा आनंद घेऊनच पुढील आव्हानांना सामोरे जावे, तीच यशाची गुरुकिल्ली आहे असे रीतेश म्हणाले.
ही यात्रा नक्कीच खडतर होती पण, हा प्रवास मी अदम्य इच्छाशक्तीच्या जोरावर पूर्ण केला आहे. इच्छाशक्ती प्रखर असेल तर साहस आपोआप येते! मी यशस्वी झालो याचा अभिमान वाटतो आणि माझ्यासारख्या अनेकांना प्रेरणा मिळावी, हीच माझी अपेक्षा आहे असेही ते आपल्या यशाबाबत बोलताना म्हणाले. रीतेश यांची ही कामगिरी हे केवळ वैयक्तिक यश नाही, तर दिव्यांग व्यक्तींनी साहसी क्रीडा व पर्वतारोहण क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी एक नवा मार्ग खुला करणारे पहिले पाऊल आहे.