हल्ल्याआधी अर्धा तास माघारी परतल्याने बचावला जीव

पहलगाम येथे फिरायला गेलेल्या नावेलीतील दामोदर नाईक यांचा अनुभव

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th April, 11:50 pm
हल्ल्याआधी अर्धा तास माघारी परतल्याने बचावला जीव

मडगाव : पहलगामध्ये ज्याठिकाणी अतिरेकी हल्ल्याची घटना घडली, त्याठिकाणी त्याचदिवशी सकाळी सुमारे एक तासाभराच्या कालावधीनंतर फिरून माघारी आलो. त्यानंतर अर्ध्या तासाच्या कालावधीत अतिरेकी हल्ला झाला. आम्ही गेलो असता गर्दी कमी होती त्यामुळे पर्यटकांची गर्दी होण्याची वाट त्यांनी पाहिली असावी. अजूनही ते आठवले की अंगावर काटा येतो, अशा शब्दांत काश्मीरवरून परतलेल्या नावेलीतील दामोदर नाईक यांनी सांगितले.
काश्मिरातील पहलगाम याठिकाणी अतिरेक्यांनी गोळ्या झाडून अनेक पर्यटकांचा जीव घेतला. या घटनेत गोव्यातून काश्मिरला गेलेले अनेकजण सुखरूप माघारी परतले आहेत. गोव्यातील १८ जणांचा एक गट काश्मिरात फिरण्यासाठी गेला होता. त्यातील १२ जण पहलगाम येथील अतिरेकी घटना घडलेल्या ठिकाणी अर्धातास आधीपर्यंत फिरत होते व घटना घडण्याआधी डोंगरावरून सर्वजण खाली आले.
अतिरेकी घटनेचे वातावरण अनुभवलेल्या नावेलीतील दामोदर नाईक यांनी सांगितले की, काश्मिरात फिरण्यासाठी १८ जणांच्या गटासह आम्ही कुटुंबीयांसमवेत गेलो होतो. अतिरेकी हल्ल्याच्या आधी एक दिवस आम्ही पहलगाम येथे पोहोचलो. दरम्यान, अंधार पडल्यामुळे केवळ आजूबाजूच्या परिसरात फिरून आम्ही मागे आलो. त्यानंतर मंगळवारी सकाळी पहलगाम येथील अतिरेकी हल्ला झालेल्या ठिकाणी आमच्या गटातील १२ जण गेले होते. हल्ला होण्याच्या आधी साधारणत: अर्धातास आधी ते घटनास्थळावरून माघारी आले. त्यामुळे ते वाचले.
ज्या ठिकाणी आम्ही फिरायला गेलेलो तेथे जाण्यासाठी घोड्यावरून किंवा चालत जावे लागते. घटना घडली त्याठिकाणी आम्ही भेळपुरी खाल्ली होती. पुढील पर्यटनस्थळावर जाण्यासाठी आम्हाला लवकर येण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे आम्ही तेथून निघालो व आमचा जीव वाचला. देवच पावला व जीव वाचला अशा शब्दात त्यांनी आपला अनुभव सांगितला.

पर्यटकांची गर्दी झाल्यानंतरच केला हल्ला
जेव्हा आम्ही तेथे गेलो त्यावेळी पर्यटकांची जास्त गर्दी नव्हती. मात्र, आम्ही तेथून माघारी येताना अनेक पर्यटक घटनास्थळी जाताना दिसले. त्यामुळे अतिरेकी कदाचित घटनास्थळी गर्दी होण्याची वाट पाहत असावेत. पर्यटकांची गर्दी झाल्यानंतर त्यांनी हल्ला केला. हिंदू हेच दहशतवाद्यांचे लक्ष्य असल्याचे लक्षात आले. त्याठिकाणी आमचे कुटुंबीय असते तर, असा विचार करूनच आजही भीतीने अंगावर शहारे येत आहेत. ज्यांचा जीव गेला त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. 

हेही वाचा