‘वजनदार’ च्या निमित्ताने केलेली बातचित

Story: मुलाखत । हर्षदा वेदपाठक |
25th April, 12:29 am
‘वजनदार’ च्या निमित्ताने केलेली बातचित

घरच्या जबाबदाऱ्या सांभाळता याव्या म्हणून अलका कुबल फारसे काम करत नव्हत्या. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्या चित्रपट मालिका यामध्ये काम करत असतात. तब्बल सत्तावीस वर्षानंतर त्या नाटकांमध्ये परत येत आहेत. वेगळा विषय असल्याने या नाटकात काम करायची इच्छा झाली, हे त्या स्पष्ट करतात.



तुमच्यासाठी ‘वजनदार’ या शब्दाचा अर्थ काय आहे?
खरे तर, यामागचे कारण हे काहीसे खासगी आणि वजनदार आहे. मी अनेक वर्षे वजनाच्या समस्येचा सामना केला आहे. वजन अगदी पार ११० किलोपर्यंत पोहचले होते आणि आता, नाटकाची सुरुवात करत असताना ते वजन मी ४९-५० किलोपर्यंत कमी केले आहे. पण हे नाटक हे वजनावरून होणाऱ्या चेष्टेसारख्या गंभीर विषयावर नाही. हे एक हलकेफुलके नाट्य आहे. एक कुटुंब-केंद्रीत नाटक आहे. वेगवेगळ्या ५६ थांब्यांवर गंमतीदाररित्या संपून शेवटी १५ व्या दिवशी त्याला एक गोड वळण मिळते, असे कथानक आहे. आम्ही हे नाटक फक्त माध्यमे किंवा समीक्षकांसाठी बनवलेले नाही. हे नाटक तरुणापर्यंत पोहचेल, याची मला खात्री आहे.


तुमच्यासारख्या गुणी कलाकाराला एवढे चांगले नाटक आणि अर्थपूर्ण भूमिका मिळवण्यासाठी २७ वर्षे का वाट पहावी लागली?
चित्रपट आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे..यापूर्वी चित्रपटांमध्ये मी खूपच व्यस्त होते. अनेक वर्षे मी, एका वर्षात १२-१५ चित्रपट करत असे. मला दुसऱ्या कशासाठीही क्वचितच वेळ मिळायचा. ११ महिने सलग मी कोल्हापूरसारख्या ठिकाणी रहात असे. मी घरीच यायचे नाही – मग ते सातारा असो किंवा पुणे, मी नेहमीच दूर असायची, कामाप्रती पूर्ण निष्ठा ठेवून...
मुलांच्या परीक्षा किंवा सणवार, अशा अगदी महत्त्वाच्या प्रसंगीच मी घरी जात असे. तेसुद्धा अगदी थोड्या वेळासाठी.. पण आज गोष्ट वेगळी आहे. माझ्या मुली मोठ्या झाल्या आहेत. एकीचे लग्न झाले आहे, तर दुसरीही स्थिरस्थावर झाली आहे. आता मला स्वतंत्र झाल्यासारखे वाटते. नाटक स्विकारल्यानंतर त्यासाठी तारखा देणे गरजेचे असते. कारण जर नाटक करत असताना मी चित्रपटही स्विकारला, तर ते निर्मात्यांसाठी अन्यायकारक ठरेल. त्यामुळे सगळे वेळापत्रक विस्कळीत होते. मी जे काही काम हाती घेते, त्याला न्याय देणे ही मला माझी जबाबदारी वाटते.
जवळपास पन्नास वर्षांची तुमची कारकिर्द आहे आणि तरीही २०२५ मध्ये
तुम्ही एकदम साध्या आणि एटीट्यूड शिवाय वावरताना दिसत आहात. नाहीतर हल्लीचे कलाकार एक चित्रपट करून स्वतःला फार मोठे समजू लागतात?

मला तशी ग ची बाधा कधी झाली नाही. मला वाटते मी सतत नाही म्हणत राहिल्यामुळेच वाचले. मी माझ्या मर्यादा निश्चित केल्या. जर कोणाला जायचे असेल, तर माझ्यामुळे उशीर होणार नाही किंवा एखादी गोष्ट होत असेल तर माझ्यामुळे थांबणार नाही, अशी मी काळजी घेते. जर गोष्टी केवळ माझ्या एकटीमुळेच चालत असत्या, तर माझे सगळेच्या सगळे ३५० चित्रपट यशस्वी झाले असते. पण त्यापैकी केवळ २५ सुपरहीट झाले. बाकीचे ३०० तेवढे चालले नाहीत. मी एकटीने चांगले काम केले म्हणूनच ते चालले असे नाही. माझ्यामुळेच सगळे चालते, हा भ्रम गेला पाहीजे, मग तुम्ही जमिनीवर राहता.


३५० चित्रपट आणि अलका कुबल यांचे नाव आणि त्यांच्या भूमिका हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामध्ये असे काय खास आहे?
मला वाटते प्रत्येक भूमिकेमागे काहीतरी अर्थपूर्ण होते. मी ज्या भूमिकांशी वैयक्तिकरित्या जोडली गेले, त्याच भूमिका मी स्विकारल्या, त्यामुळे माझे प्रेक्षकही त्याच्याशी जोडले गेले. एक स्त्री तिच्या हृदयाद्वारे तिच्या भावना व्यक्त करत असते. स्विच ऑन स्विच ऑफ दरवेळी काम करतेच असे नाही. तुम्ही जेवढे प्रामाणिकपणे काम कराल, तेवढे जास्त प्रेक्षक तुमच्यावर प्रेम करतील. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तिरेखेचा छळ होत आहे, पण तिने चेहऱ्याला मेकअप आणि हातात फॅन्सी बॅग असेल, तर प्रेक्षकांना तिचे दुःख जाणवणार नाही. अशा भूमिका होत्या ज्यामध्ये माझ्या वाट्याला दुःख आले होते, जसे की एखादी नवरी मुलगी जिच्या डोळ्याखाली काळे झाले आहे, केस विस्कटले आहेत, जुनी साडी आहे, या गोष्टी महत्त्वाच्या असतात. पहिली पाच मिनिटेच प्रेक्षक तुम्ही कसे दिसता ते पहातात, त्यानंतर तुमचे कामच महत्त्वाचे असते.
मला आठवते की अलका कुबलचा चित्रपट आहे म्हणून लोकांच्या अपेक्षा वाढत असत. हे खरे आहे की, यामुळेच पूर्वी निर्माते माझ्यासाठी थांबून राहत. सहा महिने आधी माझ्या तारखा घेत. मी तब्बल पंधरा वर्षे यशाच्या शिखरावर होते. आताही मी तेवढेच काम करते. त्यातून मला आनंद मिळतो.


तुमच्या दीर्घकालीन यशाकडे तुम्ही कसे पहाता?
तमाशापटांचे युग संपल्यानंतर, जेव्हा कौटुंबिक चित्रपट केंद्रस्थानी आले, तेव्हा ते युग अलका कुबल या नावाचा उल्लेख न करता पूर्ण होणारे नाही. त्यानंतर अशोक मामा आणि लक्ष्या यांच्या लोकप्रियतेचीही लाट होती. त्या दरम्यान माहेरची साडी प्रदर्शित झाला आणि कौटुंबिक नाट्य खऱ्या अर्थाने आघाडीवर आले. विजय कोंडके दिग्दर्शित त्या चित्रपटात माझ्या जागी कोणीही अभिनेत्री असती, तरीही तो चित्रपट यशस्वी ठरलाच असता, अशी माझी खात्री आहे. कारण त्या कथेतच दम होता आणि सगळ्या गोष्टी बरोबर जमून आल्या.
चित्रपटात कोणाकडूनही एखादी जरी चूक झाली, तरी सगळ्यांच्याच कामावर परिणाम होतो. यशाबाबतही तेच म्हणावे लागेल. तुम्ही नेहमी त्याचा फक्त एक भाग असता.
जेंव्हा एखादा कलाकार यशस्वी होतो, तेव्हा त्याच्या कुटुंबियांनाही ओळख मिळते, जसे की कपूर किंवा खान कुटुंबिय. पण तुमच्याबाबत असे का नाही? समीरजी सोडून इतरही कोणीही या क्षेत्रात का आले नाही?
माझ्या मुली साधारण तीन वर्षांच्या असताना आम्ही त्यांना चित्रिकरणाच्या ठिकाणी नेले होते. पण एक आई म्हणून मला त्यांना इतक्या लहान वयात यामध्ये गुंतवू नये, असे वाटायचे. माझ्या निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनीही यामध्ये माझी साथ दिली. मी मुलींना जबरदस्तीने काहीही करायला लावले नाही. त्या मातीत खेळायच्या, कधीतरी चित्रिकरण पहात बसायच्या. साधारण दहा वर्षांच्या होईपर्यंत त्यांनी आपल्याला काय बनायचे आहे, याचा विचार सुरू केला होता. माझ्या एका मुलीने डॉक्टर व्हायचे ठरवले, तर दुसरीने पायलट. मला त्याचा आनंद आहे.
कॅमेऱ्यामागे जाऊन लेखन-दिग्दर्शन करण्याचा विचार कधी केला?
प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास मला कधी तशी गरजच वाटली नाही. तांत्रिकदृष्ट्या मला सगळे कळते, पण मला त्यात रस नाही. सुरुवातीपासूनच माझे लक्ष अभिनयावरच होते. त्यामुळेच मी पाच चित्रपट आणि दोन मालिकांची निर्मिती केली. पण आता मी खूपच व्यस्त आहे. त्यामुळे इतर काही निर्मितीचा विचार सध्या नाही. ती खूप मोठी जबाबदारी आहे आणि त्यात यशाची खात्री नाही. सध्या मला ज्याची आवड आहे, त्यावरच मी लक्ष केंद्रीत केले आहे.
वजनदारनंतर पुढे काय?
सध्या मी नितिन कांबळेच्या ‘वारी’साठी काम करत आहे. गजेंद्र आहीरेने एका चित्रपटासाठी विचारणा केली आहे. मी प्रमोद शिंदेच्या चित्रपटासाठी काम करत आहे. त्याचबरोबर अजय नाईक बरोबरही काम करत आहे. आणखीनही काही ऑफर्स आहेत. इतर महिला कलाकार ज्या भूमिका करत आहेत, त्यापेक्षा खूप वेगळ्या भूमिका मी करत आहे. हे खूपच आनंददायी आहे. त्याचबरोबर मी एक हिंदी वेबसिरीजही करत आहे.
आता हिंदी वेबसिरीज आणि हिंदी चित्रपटही करत आहात. तुम्हाला नियमित विचारणा होत आहे ना?
हो. एकदा मला एक छोट्या भूमिकेसाठी विचारणा झाली होती. त्याआधी रोहीत शेट्टीच्या टीमबरोबर चर्चा झाली. पण त्यातून काही निष्पन्न झाले नाही. मी चांगल्या भूमिकाच स्विकारल्या आहेत. मराठी सिनेमात मी स्थिरस्थावर आहे. मला हिंदीत काम करण्यात अडचण नाही, पण भूमिका चांगली हवी. केवळ पैशासाठी मला काम करायचे नाही.
या क्षेत्रात पन्नास वर्षे काम केल्यानंतर काही कडूगोड आठवणी आहेत, ज्या मनात राहिल्या आहेत?
जेव्हा मी काळूबाई मालिकेसाठी काम करत होते, तेव्हा माझी आई खूप आजारी होती, तेव्हा मला माझ्या निर्मात्यांनी दिग्दर्शकांनी संभाळून घेतले. मात्र, २००७ मध्ये जेव्हा मी अत्यंत व्यस्त होते, तेव्हा माझा गंभीर अपघात झाला होता. त्यानंतर काही निर्माते माझ्याकडे आले आणि मी कायम व्हिलचेअरवरच राहीन, असा विचार करून त्यांचे पैसे परत घेऊन गेले. ते वागणे आठवले (भावूक होऊन) की फार वाईट वाटते. आता मी जी उभी आहे, ते केवळ माझ्या इच्छा शक्तीवर. पण मी सगळ्यांना चूकीचे ठरवले. ते क्षण अविस्मरणीय आहेत,
एवढ्या मोठ्या अडचणींवर मात करण्याची क्षमता कुठून आली?
माझी दूरदृष्टी आणि दृढनिश्चयाने मला मदत केली, पण त्यापेक्षाही जास्त माझ्या प्रेक्षकांच्या प्रेमाने मला मदत केली. ते एखाद्या कुटुंबासारखे माझ्या पाठीशी उभे राहिले. त्याचबरोबर मानसिक संतूलन सर्व काही आहे, ते मी जाणते. मला अध्यात्मातून ताकद मिळते. मी स्वामींना मानते, गीता वाचते, भगवान महादेव आणि देवी लक्ष्मी प्रती माझी निस्सीम भक्ती आहे. मी नेहमी सकारात्मक असते. दिलेला शब्द मी पाळते आणि त्यामुळेच मी एवढे घट्ट नातेसंबंध निर्माण करू शकले. म्हणून की काय, माझे अनेक वर्षाचे मित्रही आजही माझ्याबरोबर आहेत.