चोरीतील २ लाख रूपये रक्कम हस्तगत
म्हापसा : नेरुल येथील रिसॉर्टच्या खोलीत शिरून हैदराबाद येथील पर्यटकाची २.८० लाख रुपये रोख रक्कम चोरण्याची घटना घडली. याप्रकरणी आकाश बिनया महतो (२२, पश्चिम बंगाल) याला साळगाव पोलिसांनी अटक केली. संशयिताकडून चोरीतील २ लाख रूपये रक्कम हस्तगत केली आहे.
चोरीची घटना मंगळवार, १६ रोजी मध्यरात्री घडली होती. याप्रकरणी विजय प्रकाश (हैदराबाद) यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. फिर्यादी हे नेरूल येथील थ्री किंग्स रिसॉर्टमध्ये उतरले होते. दि. १६ रोजी रात्री ८ ते दि. १७ रोजी उत्तररात्री १२.३० वा. दरम्यान फिर्यादी व त्याचे सहकारी रिसॉर्टच्या बाहेर होते.
या संधीचा फायदा घेत संशयिताने व्हिलाच्या मागच्या दरवाजातून आत प्रवेश केला. फिर्यादीची २ लाख ८० हजार रुपये रक्कम असलेली बॅग घेऊन संशयित पसार झाला.
तक्रार दाखल होताच पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज व सखोल चौकशीअंती संशयित आरोपीला गुरुवारी सायंकाळी अटक केली.
पोलीस निरीक्षक मिलिंद भुईंबर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक डॅव्हिड कॉस्ता, सर्वे भंडारी, कॉ. श्रीकृष्ण रेडकर, सनी पेडणेकर या पथकाने ही कामगिरी केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.