श्री रुद्रेश्वराची रथयात्रा आणि जातिनिहाय जनगणना मागणी यामुळे भंडारी समाजाच्या विविध क्षेत्रांतील नेत्यांमधील संपर्क वाढला. गोव्यातील अनेक भंडारी नेत्यांनी शिक्षण क्षेत्रात बजावलेल्या कामगिरीची चर्चा आणि परिचय झाला.

तमाम गोमंतकीयांचे श्रद्धास्थान असलेले हरवळे येथील श्री रुद्रेश्वर देवस्थान आता लवकरच खऱ्या अर्थाने मुक्त होणार असून माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली नवी देवस्थान समिती लवकरच देवस्थानचा कार्यभार सांभाळेल. काही का असेना केवळ भंडारी समाजच नव्हे तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यापासून तळागाळातील दीनदुबळे लोक ज्यांना भक्तिभावाने भजतात, तो श्री रुद्रेश्वर लवकरच सरकारी प्रशासकाच्या तावडीतून मुक्त होणार आहे. गेली ८ वर्षे डिचोलीच्या मामलेदारांच्या ताब्यात असलेले श्री रुद्रेश्वर देवस्थान अखेर श्रीच्या कृपेनेच नवनिर्वाचित देवस्थान समितीच्या ताब्यात येणार आहे. ही श्रींची इच्छा आहे.
शतकमहोत्सवी इतिहास व परंपरा असलेले हरवळे जंगलातील धबधब्याजवळ वसलेल्या या शिवमंदिरातील पूजा अर्चा नेमकी कधी सुरू झाली, याची पक्की माहिती उपलब्ध नाही. पण १९२६ साली म्हणजे ९९ वर्षांपूर्वी या देवस्थानची सरकार दरबारी नोंदणी झाली, म्हणजे त्यापूर्वी कित्येक वर्षे तिथे पूजा अर्चा होत असणार! स्व. बाबलो मर्तो नाईक यांच्या सांतिनेज येथील रामदास विद्यालयात झालेल्या भंडारी बांधवांच्या पहिल्या बैठकीत देवस्थानची नोंदणी करण्याचा निर्णय झाला. घटनेवर चर्चा झाली. गोवा व महाराष्ट्रातील भंडारी बांधवांचे देवस्थान म्हणून नोंदणी करण्यात आली. बाबलो म. नाईक यांचे विचार किती विशाल व दूरदृष्टीचे होते, याची या घटनेवरून कल्पना येते. त्यानंतर २०१७ म्हणजे नोंदणीनंतर ९१ वर्षांनी झालेल्या निवडणूक सभेत संपूर्ण गोव्यातील भंडारी बांधवांना देवस्थान समितीवर प्रतिनिधित्व मिळावे म्हणून तालुकावार सदस्य निवडण्यात यावे, अशी सूचना काही ज्येष्ठ महाजनांनी केली. तशी कोणतीही तरतूद देवस्थान नियमावलीमध्ये नसल्याचा दावा करून सभेला मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या साखळी परिसरातील लोकांनी केला. हा वाद वाढला आणि मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला. गोवा महाजन कायद्याखाली ज्या लोकांनी देवस्थानची नोंदणी केली आहे, त्या लोकांचे रक्ताचे वंशजच महाजन होऊ शकतात. रुद्रेश्वर देवस्थानच्या सरकार दरबारी नोंद असलेल्या घटनेनुसार गोवा व महाराष्ट्रातील सर्व भंडारी या देवस्थानचे महाजन आहेत. एखादा कायदा नियमावलीपेक्षा वरचढ असतो. त्यामुळे नियम किंवा नियमावलीला कमी महत्त्व दिले जाते. देवस्थानच्या महाजन यादीची छाननी करून कायदेशीर महाजनांची यादी तयार करण्याची जबाबदारी उच्च न्यायालयाने एका निवृत्त न्यायाधीशांवर सोपवली होती. त्यासाठी ८ वर्षांपूर्वी ६ महिन्यांची मुदत दिली होती. या ८ वर्षात ४-५ लवाद बदलले, पण यादी काही तयार झाली नाही. आता गेल्याच महिन्यात दीपक वायंगणकर या उपजिल्हाधिकारी पातळीवरील अधिकाऱ्याची नियुक्ती उच्च न्यायालयाने केली असून ६ महिन्यांत महाजनांची अधिकृत यादी तयार करण्यास सांगितले आहे. जुन्या लवादाकडे आलेल्या अर्जांची छाननी करून वैध यादी तयार करायची आहे. ६ महिन्यांत हे काम पूर्ण करायचे असल्याने सरकारने वायंगणकर यांना पूर्ण वेळ हेच काम करण्याची मुभा दिली पाहिजे.
सरकार दरबारी हे प्रकरण भिजत पडल्याने गेली ८ वर्षे डिचोली तालुका मामलेदार देवस्थानाचे प्रशासक आहेत. त्यांच्या अधिपत्याखाली यशवंत माडकर यांच्या अध्यक्षतेखाली अस्थाई समिती देवस्थानचा कार्यभार चालवीत आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे सर्व चालत आहे. हरवळे गावातील एका गटाने मध्यंतरी काही वाद उरकून काढला. हा वाद गैरसमजातून निर्माण झाला होता. त्यावर सर्वमान्य तोडगा काढण्यात आला. भंडारी समाज २-३ गटात विभागलेला असतानाही भंडारी समाजाचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी पुढाकार घेऊन श्री रुद्रेश्वराच्या नावाने गोवाभर पसरलेल्या भंडारी समाजाला एकसंध केले. राजकीय मतभेद बाजूला ठेवून श्री रूद्रेश्वर रथयात्रा काढली. या रथयात्रेचे नियोजनबद्ध व शिस्तबद्ध आयोजन करून हम भी कम नही, हे भंडारी समाजाने सिद्ध केले. या रथयात्रेमुळे देवस्थानच्या तिजोरीत मोठी भर पडली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या रथयात्रेमुळे भाजप, काँग्रेस, आप व शिवसेना आदी सर्व राजकीय पक्षातील भंडारी नेते एकत्र आले. पक्षीय, समाजातील गटबाजी विसरून भंडारी झेंड्याखाली एकत्र नांदले. याच एकतेमुळे जातिनिहाय जनगणना हवी, या मागणीला जोर आला. बिहार निवडणुकीमुळे राष्ट्रीय पातळीवर वेगळा विचार झाला आणि जातिनिहाय जनगणनेची मागणी मान्य झाली.
श्री रुद्रेश्वराची रथयात्रा आणि जातिनिहाय जनगणना मागणी यामुळे भंडारी समाजाच्या विविध क्षेत्रांतील नेत्यांमधील संपर्क वाढला. गोव्यातील अनेक भंडारी नेत्यांनी शिक्षण क्षेत्रात बजावलेल्या कामगिरीची चर्चा आणि परिचय झाला. कुडचडे येथील स्व. पुंडलिक तुकोबा नाईक यांनी स्वबळावर शिक्षण क्षेत्रात बजावलेल्या कामगिरीतून स्फूर्ती घेऊन अनेक भंडारी नेत्यांनी शिक्षणक्षेत्रात फार मोठी कामगिरी केलेली आहे. त्यात शिरोड्याचे आमदार सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, फोंड्याचे आमदार कृषीमंत्री रवी नाईक यांचे कार्य खरोखरच वाखाणण्याजोगे आहे. बाळ्ळीचे माजी सरपंच व दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष रोहिदास नाईक यांचे कामही कौतुकास्पदच आहे. या लोकांकडून स्फूर्ती घेऊन म्हापसा पालिकेचे नगरसेवक डॉ. तारक आरोलकर यांनी शिक्षणक्षेत्रात काम करण्याची तयारी केली आहे. त्यासाठी स्वतःची वैयक्तिक संस्था न काढता भंडारी विश्वस्त मंडळ त्यांनी स्थापन केले आहे. शिक्षण तसेच इतर क्षेत्रात वावरणाऱ्या लोकांना सोबत घेऊन त्यांनी काम सुरू केले आहे. पेडणे तालुक्यातील धारगळ गावातील आपल्या मालकीची सुमारे ५ हजार चौ.मी. जमीन त्यांनी भंडारी विश्वस्त मंडळाला दान दिली आहे. ५ हजार चौ.मी. जमीन ही जमीन लहान वाटत असली तरी या जमिनीची किंमत लक्षात घेता डॉ. तारक आरोलकर यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
या भंडारी विश्वस्त मंडळांचे पदाधिकारी व सदस्य पाहता ही संस्था एक राष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प साकारेल याची मला खात्री आहे. ही सगळी श्री रुद्रेश्वराची कृपा आहे. त्यांनी सद्बुद्धी दिल्यानेच डॉ. तारक आरोलकर यांनी या विश्वस्त मंडळाची कल्पना प्रत्यक्षात आणली असणार. श्री रुद्रेश्वराच्या प्रेरणेमुळेच श्री रुद्रेश्वर देवस्थान प्रश्नांवर सर्वमान्य तोडगा काढण्यासाठी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, कृषीमंत्री रवी नाईक व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत या तिघांची एक उच्चस्तरीय बैठक झाली. हरवळे देवस्थान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या साखळी मतदारसंघात येत असल्याने ही समस्या हा वाद लवकरात लवकर सुटावा, ही मुख्यमंत्र्यांचीही अपेक्षा आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात गेली ८ वर्षे चालू असलेला खटला या प्रकरणातील सर्व पक्षकार म्हणजे यशवंत माडकर, पंढरीनाथ मापारी, गणू वस्त आदींनी मागे घ्यावा लागेल. त्यासाठी न्यायालयात चालू असलेल्या खटल्यातील सर्व पक्षकारांची एक बैठक येत्या काही दिवसांत होईल. श्री रुद्रेश्वराची इच्छा म्हणून या बैठकीत सर्वमान्य तोडगा काढला जाईल, अशी खात्री केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, कृषी मंत्री रवी नाईक व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनाही आहे. त्यानंतर श्री रुद्रेश्वर देवस्थानची खास सर्वसाधारण बैठक घेऊन माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांची अध्यक्षपदी निवड केली जाईल!

- गुरुदास सावळ
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)