बेताळभाटीत टॅक्सीत बसण्यास केला होता मज्जाव
मडगाव : बेताळभाटी येथील रिसॉर्टनजीक अहमदाबादमधील पर्यटक रजनी मट्टा यांना रोखून टॅक्सीत बसण्यास मज्जाव करत पायी जाण्यास भाग पाडले. या प्रकरणी मानसिक व शारीरिक त्रास दिल्याप्रकरणी कोलवा पोलिसांनी संशयित मेनिनो डिसिल्वा, मिलाग्रीस आल्मेदा, आग्नेलो रॉड्रिग्ज (सर्व रा. बेताळभाटी) यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला. संशयितांना अटक करण्यात आली होती, त्यानंतर जामिनावर सुटका करण्यात आली.
बेताळभाटी येथील एका रिसॉर्टमध्ये गुजरात अहमदाबाद येथून आलेल्या रजनी आशिष मट्टा या पाच दिवस वास्तव्यास होत्या. १५ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास रजनी यांनी विमानतळावर जाण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने टॅक्सी बुक केली होती. टॅक्सी आल्यानंतर त्या रिसॉर्टबाहेर गेल्या असताना रिसॉर्टबाहेरील टॅक्सीचालकांनी त्यांना टॅक्सीत बसू दिले नाही. विमानतळावर जाण्यासाठी बुक केलेल्या गाडीत त्यांना बसण्यास दिले नाही. यामुळे महिला पर्यटकाला सुमारे पाच किलोमीटर अंतर भर पावसात सामान घेऊन चालत जावे लागले. या प्रकाराचा व्हिडिओ पर्यटक महिलेने काढला व तो समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. यानंतर कोलवा पोलिसांनी अहमदाबाद येथील रजनी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी तक्रार दिल्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली.
रिसॉर्टमध्ये राहत असलेल्या पर्यटकांनी विमानतळावर जाण्यासाठी स्थानिक टॅक्सीचाच वापर करावा, असा अट्टाहास स्थानिक टॅक्सीचालकांकडून धरण्यात येतो. याच कारणातून महिला पर्यटकाला मानसिक व शारीरिक त्रास भोगावा लागला होता.
स्थानिक टॅक्सीचालकांवर कारवाई
कोलवा पोलिसांनी स्थानिक टॅक्सीचालक संशयित मेनिनो डिसिल्वा, मिलाग्रीस आल्मेदा, आग्नेलो रॉड्रिग्ज यांच्यावर गुन्हा नोंद करत अटक केली. त्यानंतर जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंजू वांतामुरी करीत आहेत.