सुकूर येथे अपघात : चिखलात दुचाकी घसरून अवजड वाहनाखाली चिरडून ठार
म्हापसा : सुकूर, पर्वरी येथील चिखलमय झालेल्या महामार्गावर दुचाकी घसरून झालेल्या अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी अंत झाला. दुचाकीवरून खाली पडलेल्या सनी अशोक नार्वेकर (२८, रा. नानोडा-डिचोली) याच्या अंगावरून अवजड वाहन गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दुचाकी चालवणारा त्याचा मित्र शुभम म्हावळिंगकर किरकोळ जखमी झाला आहे.
गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सनी नार्वेकर आणि शुभम म्हावळिंगकर हे दोघे पर्वरीहून म्हापशाकडे जात असताना सुकूर येथे पर्वरी जुना बाजार जंक्शनपासून काही अंतरावर ही दुर्दैवी घटना घडली. पर्वरी येथील उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे रस्त्यावर पडलेले डांबर तसेच काँिक्रटमुळे हा महामार्ग चिखलमय झाला होता. याच चिखलातून जाताना त्यांची दुचाकी घसरली. दुचाकीवरून खाली पडलेल्या सनीच्या अंगावरून मागून येणारा अवजड ट्रक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती मिळताच पर्वरी पोलीस निरीक्षक राहुल परब यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवचिकित्सेसाठी गोमेकॉत पाठवून दिला. जखमी शुभम याच्यावर पर्वरी आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करण्यात आले. अपघातानंतर फरार झालेल्या ट्रकचालकाचा पोलीस शोध घेत आहेत.