कर्मचाऱ्यांनी केलेल्या स्वागतासाठी गावडेंना नोटिस का ? संघटनेचा सवाल
पणजी: हार, फुले आणि ओवाळणीने एसएजीच्या कार्यकारी संचालक पदाचा ताबा घेतल्याबद्दल सरकारने नोटीस बजावलेल्या डॉ. अजय गावडे यांना ‘गाकुवेध’ संघटनेने पाठिंबा दिला आहे. कर्मचाऱ्यांनी पारंपारिक पद्धतीने आणि स्वेच्छेने त्यांचे स्वागत केले असल्याचा दावा करताना, ‘गाकुवेध’चे अध्यक्ष गोविंद शिरोडकर यांनी ही नोटीस मागे घेण्याची मागणी केली आहे.
या मागणीचे पत्रक त्यांनी जारी केले आहे. डॉ. अजय गावडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर पर्यायांची चाचपणी केली जात असल्याचेही गोविंद शिरोडकर यांनी म्हटले. डॉ. अजय गावडे हे अनुसूचित जमाती समाजातील असून, त्यांनी आजपर्यंत प्रामाणिकपणे सेवा बजावलेली आहे. एक कार्यक्षम अधिकारी अशी त्यांची ओळख आहे.
कर्मचाऱ्यांनी केलेल्या स्वागतासाठी त्यांना नोटीस बजावणे हा त्यांच्यावर झालेला अन्याय आहे, असे गाकुवेधने म्हटले आहे. अशा प्रकारामुळे चांगल्या अधिकाऱ्यांचे खच्चीकरण होत असते, असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.