साळगाव कचरा प्रकल्प ही सरकारनिर्मित आपत्ती: ट्रोजन डिमेलो

प्रकल्पामुळे जलस्रोत दूषित; जबाबदार अधिकाऱ्यांना अटक करण्याची तृणमूल काँग्रेसची मागणी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
19 mins ago
साळगाव कचरा प्रकल्प ही सरकारनिर्मित आपत्ती: ट्रोजन डिमेलो

पणजी: साळगाव पठारावरील कचरा प्रक्रिया प्रकल्प ही सरकारने निर्माण केलेली आपत्ती आहे. या प्रकल्पामुळे जलस्रोत दूषित होत असून, लोकांचा हळूहळू जीव घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणत्याही नोटिसाबजावता, जे लोक या स्थितीला जबाबदार आहेत, त्यांना तात्काळ तुरुंगात टाकून लोकांचा जीव वाचवावा, अशी मागणी तृणमूल काँग्रेस पक्षाचे (टीएमसी) राष्ट्रीय नेते ट्रोजन डिमेलो यांनी केली आहे.

पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी टीएमसी गोवा निमंत्रक मारीयान रॉड्रिग्स उपस्थित होते. ट्रोजन डिमेलो म्हणाले की, साळगाव कचरा प्रकल्पामुळे कळंगुटमधील गावरावाडा येथील झरा, साळगावचा प्रसिद्ध सालमोना झरा आणि सांगोल्डाचा झरा दूषित झाला आहे.

गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकल्पाला कारणे दाखवा नोटीस बजावून, सात दिवसांच्या आत ‘तो का बंद करू नये’ याचे उत्तर मागितले आहे. जर हा प्रकल्प बंद झाला, तर कचरा मायकल लोबो किंवा केदार नाईक यांच्या घरी नेणार का, असा सवालही डिमेलो यांनी केला. या प्रकल्पाची परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे सांगणाऱ्या मायकल लोबो यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये ‘विकास’ करण्यासाठी प्रवेश केला की ‘विनाश’ करण्यासाठी, हे स्पष्ट करावे. हा प्रकल्प भाजपचीच निर्मिती असून, तो आणण्यामागे मायकल लोबो यांचाच हात आहे.

हा कचरा प्रकल्प डोंगरावर बांधला आहे. वरुन येणाऱ्या पाण्यामुळे साळगावमधील सर्व झरे दूषित झाले आहेत. कांदोळी आणि नेरूळ सारख्या दूरच्या भागांतही कचऱ्याची दुर्गंधी पसरली आहे. केवळ नोटिसा देऊन आणि वेळ देऊन चालणार नाही. या भागात विष पसरवण्याचे काम सुरू असल्याने जे लोक याला जबाबदार आहेत, त्यांना अटक केलीच पाहिजे, अशी मागणी डिमेलो यांनी केली.

हेही वाचा