राजीनाम्याचे वृत्त खोटे : मंत्री तवडकरांचा दावा
पणजी: माझ्या हातात माती दिली तरी तिचे सोने करण्याची क्षमता माझ्यात आहे. त्यामुळे मंत्रिपदाच्या उर्वरित दीड वर्षांच्या काळात मी तीन वर्षांएवढे कार्य निश्चितपणे करेन, असा विश्वास क्रीडामंत्री रमेश तवडकर यांनी व्यक्त केला. माझ्या खात्यांबाबत मी असमाधानी असल्यामुळे राजीनामा देणार असल्याचे काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त खोटे असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
क्रीडा व कला, संस्कृती खात्याचे मंत्री रमेश तवडकर यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष धाकू मडकईकर आणि तियात्र अकादमीचे अध्यक्ष ऍंथनी बार्बोजा उपस्थित होते.
मंत्री तवडकर यांनी राजीनाम्याच्या चर्चांवर स्पष्टीकरण देताना सांगितले की, मुलाच्या शैक्षणिक प्रवेशामुळे मी बंगळुरूला गेलो होतो, त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहू शकलो नाही. माझ्या गैरहजेरीत भाजपच्या सुकाणू समितीची कोणतीही बैठक झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या गैरहजेरीमुळेच माझ्याविषयी चुकीची माहिती पसरवली जात आहे.
माजी सभापती म्हणून मी पूर्णपणे समाधानी होतो, असे सांगताना त्यांनी मंत्रिपद स्वीकारण्यामागचे कारणही सांगितले. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मी मुख्यमंत्र्यांना मंत्रिपदासाठी इच्छुक नसल्याचे सांगितले होते. मात्र, पक्षाला माझी गरज वाटल्याने पक्षाने दिलेल्या आदेशानुसारच मी हे मंत्रिपद स्वीकारले आहे. मी माझ्या खात्यांबाबत पूर्णपणे समाधानी आहे. १९९६ पासून मी आदिवासी समाजासाठी कार्य करत आहे आणि यापुढेही हे कार्य सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.