हा तर लोकशाहीवरील हल्ला!

रामा काणकोणकर हल्लाप्रकरणी राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
2 hours ago
हा तर लोकशाहीवरील हल्ला!

पणजी : समाज कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर सहा जणांनी प्राणघातक हल्ला केल्यानंतर यासंबंधी तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. हा हल्ला लोकशाहीवरील असून पोलिसांचा गुन्हेगारांना धाक राहिलेला नाही, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.

गोवा सुरक्षित नाही : काँग्रेस

गोव्यात आता दिवसाढवळ्या हल्ले होऊ लागले आहेत. गोवा पूर्वीसारखा सुरक्षित राहिलेला नाही. कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे, असे काँग्रेसचे विधीमंडळ नेते युरी आलेमाव यांनी सांगितले. रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा त्यांनी निषेध केला. उपचार सुरू असताना गोवा वैद्यकीय महाविद्यालय (जीएमसी) रुग्णालयाला भेट देऊन त्यांनी रामा काणकोणकर यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. राज्यात लोकांचा पोलिसांवरील विश्वास उरलेला नाही. याआधीही रामा काणकोणकर यांच्यावर न्यायालयाबाहेर हल्ला झाला होता, असे युरी आलेमाव म्हणाले.

प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनीदेखील या हल्ल्याचा तीव्र निषेध केला.

हा प्रत्येक गोवेकरावर झालेला हल्ला : गोवा फॉरवर्ड

रामा काणकोणकर यांच्यावर झालेला हल्ला हा त्यांच्यावरच नाही, तर प्रत्येक गोवेकरावर झालेला आहे. मी या हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. हा हल्ला गोवा फॉरवर्ड सहन करणार नाही. न्यायासाठी आम्ही लढत राहणार, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आणि आमदार विजय सरदेसाई यांनी सांगितले.

सखोल चौकशी व्हावी : आरजी

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे. गोव्यात हिंसाचाराला थारा दिला जाऊ नये. या हल्ल्याची पोलिसांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी आरजीचे नेते मनोज परब यांनी केली.

कायदा, सुव्यवस्था ढासळली : क्रूझ सिल्वा

गोवा आता पूर्वीप्रमाणे सुरक्षित आणि शांत प्रदेश राहिलेला नाही. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्णपणे ढासळली आहे. गृहमंत्री म्हणून अंमली पदार्थांचा विळखा, गँगवार्स आणि वाढत्या हल्ल्यांना आळा घालण्यात ते संपूर्ण अपयशी ठरले आहेत. नागरिकांचे संरक्षण करण्याऐवजी या सरकारने गुन्हेगारांना मोकाट सोडले आहे. मुख्यमंत्र्यांनी पीडब्ल्यूडी खाते दिगंबर कामत यांना दिले त्याप्रमाणेच गृहमंत्रिपद देखील एखाद्या सक्षम व्यक्तीकडे द्यावे, अशी टीका आमदार क्रूझ सिल्वा यांनी केली.

लोकशाहीवर झालेला हल्ला : गोविंद गावडे

आमदार गोविंद गावडे यानी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन रामा काणकोणकरच्या प्रकृतीची विचारपूस केली. हा केवळ रामा काणकोणकर यांच्यावर हल्ला नसून तो लोकशाहीवर झालेला हल्ला आहे, असे आमदार गोविंद गावडे यांनी म्हटले आहे.

सत्तरी तालुका एसटी समाजाचा इशारा

रामा काणकोणकर यांच्यावर हल्ला करून त्यांना जबर जखमी करण्यात आल्याची घटना दुर्दैवी आहे. सामाजिक विचारांना प्रोत्साहित करून जनतेला जागरुक करण्याचे कार्य सामाजिक कार्यकर्ते करीत असतात. मात्र त्यांचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न काही घटक करू लागलेले आहेत. त्यांच्यावर झालेला हल्ला हा निंदनीय आहे. सरकारने हल्ला करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सत्तरी तालुका एसटी समाजाने दिलेला आहे. 

हेही वाचा