पोलिसांना थेट आव्हान

पोलीस आणि प्रशासन गोव्यात व्यक्तीस्वातंत्र्याची अशा पद्धतीने गळचेपी होऊ देणार का, त्याकडे गोव्याचे लक्ष आहे. प्रश्न रामा कोणकोणकरचा एकट्याचा नाही. गोवेकर सुरक्षित आहेत का, ते दाखवून देण्याची वेळ पोलिसांवर आलेली आहे.

Story: संपादकीय |
2 hours ago
पोलिसांना थेट आव्हान

सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकरवर दिवसाढवळ्या झालेल्या हल्ल्याने पुन्हा एकदा पोलिसांची भीती राहिली नसल्याचे सिद्ध होते. हा हल्ला फक्त काणकोणकरवर झालेला हल्ला नव्हे, तर तो राज्याच्या व्यवस्थेला आव्हान देणारा हल्ला आहे. पोलीस, प्रशासन, न्यायव्यवस्था या साऱ्यांनाच काणकोणकरवर हल्ला करणाऱ्या गुंडांनी आव्हान दिले आहे. आमचे कोणीच काही बिघडवू शकत नाही, याची खात्री असलेल्या आणि मातलेल्या गुंडांनी रामाला लाथा - बुक्क्यांनी मारहाण करून त्याला ज्या पद्धतीने काठ्यांनी बदडले ते पाहता ते काणकोणकरला जिवंत मारण्याच्या हेतूनेच आले होते, हे स्पष्ट आहे. त्याच्यासोबत असलेल्या पत्रकाराला सुरीचा धाक दाखवून बाजूला करण्यात आले आणि त्यानंतर पाच - सहा जणांनी रामा काणकोणकरला मारहाण केली. या हल्ल्यातील सर्वच आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. यापूर्वी अनेक प्रकरणांमध्ये त्यांच्यावर गुन्हे आहेत. पोलिसांच्या सराईत गुन्हेगारांच्या यादीत (हिस्ट्री शीटर) या सर्वांची नावे आहेत. त्यांना रोखण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. अटक केल्यानंतर जामिनावर सुटणारे हे गुंड आता सराईत गुंड म्हणून पोलिसांच्या यादीत असले तरी त्यांना पोलिसांची भीती राहिलेली नाही. 

पणजीत मुख्यालय आहे. सर्व पोलीस यंत्रणाच  पणजीत आहे. असे असताना मुख्यालयाच्या चार - पाच किलो मीटरच्या परिघात हे गुंड राहतात. दोन दिवसांपूर्वीच पोलीस महासंचालकांनी गुंडांचा बंदोबस्त करण्याविषयी भाष्य केले होते. गोव्यात ऑर्गनाईज्ड क्राईम म्हणजेच संघटित पद्धतीने गुन्हे करणाऱ्या गँग नाहीत, असे विधान त्यांनी केले होते. त्यांनी हे विधान केल्याच्या ४८ तासांच्या आतच एका मोठ्या गुंडाच्या टोळीत वावरणाऱ्या पाच - सहा सराईत गुन्हेगारांनी रामा कोणकोणकरवर हल्ला केला. सामाजिक क्षेत्रात तो काम करतो याच कारणावरून जर त्याला मारहाण झाली असेल, तर गोव्यातील ही स्थिती चिंताजनक नाही का? मुंगूल - फातोर्डा येथे झालेला हल्ला हा वैयक्तिक शत्रुत्वातून झाल्याचे पोलीस महासंचालकांचे म्हणणे आहे. रामा काणकोणकरवर झालेला हल्लाही तसाच होता का, त्याचे उत्तरही त्यांना द्यावे लागेल. सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवतो म्हणून रामा काणकोणकरला मारहाण करून त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्याच्याही मुळाशी पोलिसांना जावे लागेल. ज्या गुंडांना पोलिसांनी अटक केली आहे, त्यांची कसून चौकशी व्हायला हवी. असे गुंड सामाजासाठी घातक असताना त्यांना जामीन कसा मिळतो, असाही प्रश्न येतो. समाजासाठी घातक असलेल्या या गुंडांना जामीन न मिळता ते तुरुंगात राहतील याची काळजी पोलिसांना घ्यावी लागेल. दोन दिवसांपूर्वी टीव्हीवरील मुलाखतीत पोलीस महासंचालकांनी केलेली सर्व विधाने खोडून काढण्याचे काम या टोळीने केले आहे. त्यांना कोणाचा आशीर्वाद आहे, त्यांचा बोलविता धनी कोण, मास्टरमाईंड कोण याच्या मुळाशी पोलीस जातील का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांनी तपासात गांभीर्याने लक्ष द्यावे यासाठी त्यांच्यावर दबावाचीही गरज आहे. हा हल्ला रामा काणकोणकर यांच्यावर नव्हे तर गोव्यातील सामाजिक कार्यात वाहून घेतलेल्या समस्त तरुणांवर झालेला आहे. त्यामुळेच पोलिसांवर दबाव येणे गरजेचे आहे. मुंगूल प्रकरण हे दोन टोळ्यांमधील प्रकरण होते. रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ला हा एका टोळीने नियोजनबद्ध पद्धतीने केलेला हल्ला आहे. सांताक्रूझसारख्या परिसरात पूर्वीपासून गुंडगिरी पोसली गेली आहे. तिथे गोव्यातील गुन्हेगारीचे केंद्र झालेले आहे. ते मोडून काढण्यासाठी पोलिसांनी प्रसंगी "मकोका"सारखा कायदा लावण्याचा विचार करायला हवा. यापुढे कोणावरच असे हल्ले होऊ शकत नाहीत, किंवा तेवढी हिंमतही येणार नाही अशा पद्धतीने पोलिसांनी आपली खरी ताकद आता दाखवायला हवी. पोलीस स्थानक हल्ला प्रकरणात पोलिसांनी ज्या पद्धतीने एका रात्रीत साऱ्यांचा बंदोबस्त केला होता, तसा बंदोबस्त आता पोलीस करू शकतील का? की समाजाला दाखवण्यासाठी अटकेची प्रक्रिया करून या गुंडांना जामिनावर सुटण्याची सोय करून दिली जाईल, ते पुढच्या काही दिवसांत दिसेल. पण या घटनेने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर समाजात प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि हे प्रश्न स्वीकारून त्यांना उत्तर देण्याची धमक पोलिसांनी दाखवायला हवी. पोलीस आणि प्रशासन गोव्यात व्यक्तीस्वातंत्र्याची अशा पद्धतीने गळचेपी होऊ देणार का, त्याकडे गोव्याचे लक्ष आहे. प्रश्न रामा कोणकोणकरचा एकट्याचा नाही. गोवेकर सुरक्षित आहेत का, ते दाखवून देण्याची वेळ पोलिसांवर आलेली आहे.