शिक्षणात पाठ्यपुस्तकांना महत्त्व आहेच; परंतु फक्त तेवढेच शिक्षण आजच्या स्पर्धेच्या युगात पुरेसे ठरत नाही. मुलांमधील सुप्त कला-गुणांना वाव मिळणेही आवश्यक आहे. कौशल्य विकसित व्हावे यासाठी बरेच पालक मुलांना खासगी शिकवणीत पाठवतात. कौशल्य विकासाचे महत्त्व लक्षात घेऊन बर्याच शाळांनी शाळेतच असे शिक्षण देणे सुरू केले आहे. आतातर केंद्र सरकारने लागू केलेल्या नवीन शैक्षणिक धोरणात कौशल्य विकासाला विशेष महत्त्व दिले आहे. बालपणीच व्यवहार ज्ञानाची ओळख व्हावी, अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडावे, असे वाटणे चुकीचे नाही. हीच गरज लक्षात घेऊन बंगळुरूमध्ये 'विद्याक्षेत्र' शाळा सुरू करण्यात आली आहे. या शाळेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले आहे.
बंगळुरूमध्ये सुरू झालेली ‘विद्याक्षेत्र’ ही शाळा वेगळीच आहे. शाळेत पुस्तकांचा ढिगारा नाही, सतत परीक्षा नाहीत आणि स्पर्धेचे ओझेही नाही. उलट मुलांना शिकायला स्वातंत्र्य, शोधायला वेळ आणि अनुभव घ्यायला भरपूर जागा दिली जाते. ही शाळा २०१६ मध्ये मुनीत धिमान आणि त्यांची पत्नी प्रीती यांनी सुरू केली. दोघेही विदेशात गलेलठ्ठ पगाराची नोकरी करत होते. भारतात मुलांना खरे शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी भारतात येऊन ‘विद्याक्षेत्र’ची पायाभरणी केली. सुरुवातीला फक्त १३ विद्यार्थी होते. आज या शाळेत १५० हून अधिक मुले शिकत आहेत.
या शाळेत मुलांना फक्त गणित, विज्ञान, इंग्रजीच शिकवले जात नाही, तर शेती, विणकाम, मातीची भांडी घडवणे, नैसर्गिक रंगांनी वस्त्र रंगवणे, नाट्यकला, शास्त्रीय संगीत आणि संस्कृत यांचेही ज्ञान दिले जाते. वर्गात बसून वहीत लिहिण्याबरोबरच मुले शेतात काम करतात, विणकरांसोबत करघा चालवतात, संगीतकारांकडून थेट शिकतात. त्यामुळे त्यांचे शिकणे केवळ गुणांच्या चौकटीत मर्यादित न राहता जीवनाशी जोडलेले होते. विशेष म्हणजे शाळेत कोणतेही शुल्क घेतले जात नाही. कोणत्याही जात, धर्म, किंवा उत्पन्नाच्या कागदपत्रांची गरज नसते. पालकांनी फक्त मुलांच्या शिकण्याच्या प्रवासासाठी सहकार्य करावे, एवढेच अपेक्षित असते. काही पालक शाळेत स्वयंपाकघरात मदत करतात, काही वाहतुकीत हातभार लावतात, तर काही स्वतःचे कौशल्य मुलांना शिकवतात. ही खरी ‘गुरुकुल’ पद्धत आहे. येथे संपूर्ण समुदायच शिक्षण प्रक्रियेत सहभागी होतो.
सर्वात महत्त्वाचे या शाळेत मुलांना परीक्षा देण्याचा ताण नसतो; पण जेव्हा मुले नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (एनआयओएस) ची बोर्ड परीक्षा देतात, तेव्हा त्यांचे निकाल अतिशय उत्तम लागतात. ८५ ते ९५ टक्के गुण मिळवणारी अनेक मुले हीच शाळेची ताकद दाखवून देतात. आज ‘विद्याक्षेत्र’ फक्त शाळा नाही, तर एक चळवळ बनत आहे. इथून प्रेरणा घेऊन देशात अशा अनेक शाळा सुरू करण्याचे स्वप्न पाहिले जात आहे. २०४७ पर्यंत १०८ शाळा सुरू करण्याचा उद्देश ठेवला आहे. मुलांना गुणांच्या शर्यतीत ढकलण्यापेक्षा त्यांना जीवन समजावे, कौशल्य मिळावे, संस्कृतीशी जोडावे आणि आत्मविश्वासाने पुढे जावे, हा या शाळेचा ध्यास आहे.
- प्रदीप जोशी,
(लेखक दै. ‘गाेवन वार्ता’चे उप वृत्तसंपादक आहेत)