संयुक्त पाहणीनंतर सांडपाणीवाहू टँकर रोखण्याचा निर्णय
खर्रे, सुकूर येथील पठाराची पाहणी करताना मंत्री रोहन खंवटे. सोबत सुकूर सरपंच, उपजिल्हाधिकारी व इतर अधिकारी वर्ग.
म्हापसा : खर्रे, सुकूर येथील उघड्यावर सांडपाणी टाकलेल्या पठार परिसराची पंचायतीने संयुक्त पाहणी केली. या ठिकाणी गेल्या २० वर्षांपासून सिवेज टँकरमार्फत सांडपाणी टाकले जात असल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे.
सुकूर पंचायतीतर्फे गुरुवारी सकाळी ही संयुक्त पाहणी॒ केली. यावेळी मंत्री रोहन खंवटे, बार्देशचे उपजिल्हाधिकारी वसंत दाभोलकर, मामलेदार अनंत मळीक, सरपंच सोनिया पेडणेकर, आरोग्य केंद्राधिकारी डॉ. सिकंदर तलवार, पोलीस उपअधीक्षक विश्वेश कर्पे, निरीक्षक राहुल परब, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, सांडपाणी व्यवस्थापन महामंडळाचे अधिकारी, पंचायत मंडळ व तक्रारदार रहिवासी उपस्थित होते.
खर्रे येथील सर्वे क्र. २२०/१ या पठार जमिनीमध्ये बऱ्याच काळापासून सांडपाणी टाकले जात आहे. ज्यामुळे आसपासच्या लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्यासह पर्यावरणाचा ऱ्हास चालू आहे, अशी तक्रार रहिवाशांनी पंचायतीकडे केली होती.
पाहणीवेळी घटनास्थळी एक हंगामी स्वरूपाची इमारत आणि सांडपाणी सोडण्याचे साहित्य आढळून आले. त्यामुळे सदर बांधकामाच्या फाटकाला सील ठोकण्यात आले. तसेच सदर साहित्य जप्त करण्यासह संबंधीतांवर कायदेशीर कारवाईचे निर्देश यावेळी मंत्री खंवटे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
मंत्री खंवटे म्हणाले की, या ठिकाणी उघड्यावर सांडपाणी सोडले जात असल्याची तक्रार आली होती. त्यानुसार परिस्थिती जाणून घेण्यासाठी संयुक्त पाहणी केली. ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून हा बेकायदा प्रकार सुरूच राहिल्यास केवळ लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार नाही तर खर्रे गावातील विहिरींचे पाणी दूषित होऊ शकते.
मंत्री खंवटे यांनी दिले कठोर निर्देश
* सांडपाणी वाहून नेणाऱ्या टँकर्सना या ठिकाणी प्रवेश बंद करावा. कोणताही टँकर आढळल्यास तो तातडीने जप्त करावा.
* सांडपाण्याचे नमुने घेऊन त्याचा अहवाल आरोग्य खात्याला सादर करण्याचे निर्देश पंचायत आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत.
* संबंधित जागेची कागदपत्रे जप्त करून सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश उपजिल्हाधिकारी, मामलेदार आणि पोलिसांना देण्यात आले आहेत.
* काही वर्षांपूर्वी या ठिकाणी मोठा जमीन घोटाळा झाला होता. त्यामुळे, ही जमीन ताब्यात घेण्याचे आदेश सेरूला कोमुनिदादला दिल्याचेही मंत्री खंवटे यांनी सांगितले.