सप्टेंबरमधील तिसरा शुक्रवार प्रेक्षकांसाठी खूप खास असणार आहे. बॉक्स ऑफिसवर तसेच ओटीटीवर हिंदी-मराठी अनेक दमदार चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होत आहेत. यामध्ये ‘जॉली एलएलबी ३’ सह ‘आतली बातमी फुटली’ चित्रपटांचा समावेश आहे.
जॉली एलएलबी ३ । थिएटर्स
‘जॉली एलएलबी ३’च्या चित्रपटाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. या यशस्वी फ्रँचायजीच्या तिसऱ्या भागात जॉलीची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. अक्षय कुमार, अर्शद वारसी व सौरभ शुक्ला यांचा कोर्टरूम ड्रामा, जॉली ‘एलएलबी ३’ आज थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.
आतली बातमी फुटली । थिएटर्स
सिद्धार्थ जाधव अभिनीत ‘आतली बातमी फुटली’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. सिद्धार्थचा हा चित्रपट थिएटरमध्ये १९ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येईल. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, अभिनेता सिद्धार्थ जाधव असे मराठीतले नामवंत चेहरे या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र आले आहेत.
द ट्रायल सीझन २ । जीओहॉटस्टार
काजोल पुन्हा एकदा कोर्टरूम ड्रामा सीरिज ‘द ट्रायल सीझन २’मध्ये नोयोनिका सेनगुप्ताची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाली आहे. या सीरिजचा हा सीझन जिओ हॉटस्टारवर पाहायला मिळेल.
हाऊसमेट्स। झी५
हाऊसमेट्स हा एक तमीळ हॉरर कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे, ज्यामध्ये दर्शन, काली वेंकट व विनोधिनी मुख्य भूमिकांत आहेत. १ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता ओटीटी रिलीजसाठी सज्ज आहे. ही नवविवाहित जोडप्याची कथा आहे. जे त्यांच्या स्वप्नातील घरात राहतात; परंतु विचित्र घटना घडल्यावर त्यांचा आनंद भीतीत बदलतो.
पोलीस-पोलीस। जिओ हॉटस्टार
ही कॉमेडी ड्रामा सीरिज इन्स्पेक्टर अर्जुनची कथा सांगते, जो रवी नावाच्या एका गुन्हेगाराला गुप्तपणे त्याच्या टीममध्ये भरती करतो. या सीरिजमध्ये सेंथिल कुमार, जयसीलन थंगवेल व शबाना शाहजहान यांच्या भूमिका आहेत. ही सीरिज जिओ हॉटस्टारवरदेखील पाहू शकता.
अजेय : द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी । थिएटर्स
‘अजेय : द अनटोल्ड स्टोरी ऑफ अ योगी’ हा चित्रपटदेखील प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. हा चित्रपट उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रवींद्र गौतम यांनी केले आहे. ही कथा शंतनू गुप्ता यांच्या ‘द मंक हू बीकेम चीफ मिनिस्टर’ या पुस्तकापासून प्रेरित आहे. हा चित्रपट तुम्ही शुक्रवारी (१९ सप्टेंबर) थिएटरमध्ये पाहू शकता.
शी सेड मेबी । नेटफ्लिक्स
‘शी सेड मेबी’ या चित्रपटात मावी नावाच्या एका तरुणीची कथा सांगितली आहे. तिचे जीवन वरकरणी अगदी परिपूर्ण दिसते, पण अचानक तिला कळते की ती एका श्रीमंत तुर्की कुटुंबाची वारसदार आहे. त्यानंतर तिला आपले प्रेमसंबंध आणि नव्या कुटुंबीय जबाबदाऱ्या यामध्ये समतोल साधावा लागतो. या चित्रपटात बेरितान बाल्ची, सिनान ग्युलॅच आणि सेरकान चायोलू यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
बिलेनियर्स बंकर्स । नेटफ्लिक्स
‘बिलेनियर्स बंकर्स’ हा एक थरारक चित्रपट असून, यात काही अब्जाधीश जागतिक युद्धाच्या पार्श्वभूमीवर किमेरा अंडरग्राउंड पार्क या आलिशान भूमिगत बंकरमध्ये आश्रय घेतात. मात्र, त्यांचे सुख फार काळ टिकत नाही कारण दोन कुटुंबांमधील जुने वैर पुन्हा पेट घेते.