अहमदाबाद: गोव्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक बातमी आहे. फोंडाचे सुपुत्र आणि प्रतिभावान दिग्दर्शक आदित्य सुहास जांभळे यांनी 'आर्टिकल ३७०' या हिंदी चित्रपटासाठी प्रतिष्ठित फिल्मफेअर २०२५ चा 'उत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण)' पुरस्कार पटकावला आहे. आदित्य जांभळे हे फिल्मफेअर पुरस्कार जिंकणारे पहिलेच गोमंतकीय ठरले आहेत. गुजरातची राजधानी अहमदाबाद येथे ७०व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
आदित्य जांभळे: राष्ट्रीय पुरस्कार विजेता गोमंतकीय
* इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमध्ये बीई पूर्ण केल्यानंतर आदित्य यांनी गोव्यातील नाट्य आणि चित्रपट क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले.
* ते दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेते आहेत.
* २०१६ मध्ये त्यांनी दिग्दर्शित केलेल्या "आबा, ऐकताय ना?" या लघुपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
* त्यांचा दुसरा लघुपट "खरवस" २०१८ मध्ये सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणून राष्ट्रीय पुरस्कार विजेता ठरला.
* 'इफ्फी २०१८' मध्ये 'खरवस'ला इंडियन पॅनोरमा विभागात 'ओपनिंग फिल्म' चा मान मिळाला होता.
* त्यांच्या 'अमृतसर जंक्शन' या तिसऱ्या शॉर्ट फिल्ममुळेच त्यांना 'उरी' चित्रपटाच्या निर्मात्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली, ज्याची परिणती 'आर्टिकल ३७०' चित्रपटात झाली.
माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोव्यात 'इफ्फी' कायमस्वरूपी आणून जे 'फिल्म संस्कृतीचे रोपटे' लावले होते, त्याला आदित्यच्या रूपाने आता रुजकर फळे लागण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
यंदाच्या फिल्मफेअरमध्ये 'लापता लेडीज'चा दबदबा
यंदाच्या फिल्मफेअर सोहळ्यात किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' या चित्रपटाने तब्बल १४ पुरस्कार जिंकत नवा विक्रम रचला आहे. यापूर्वी सर्वाधिक पुरस्कारांचा विक्रम 'गली बॉय'च्या नावावर होता. 'लापता लेडीज'ला बेस्ट फिल्म आणि किरण राव यांना बेस्ट डायरेक्टरचा पुरस्कार मिळाला.
प्रमुख पुरस्कार विजेते:
* उत्कृष्ट अभिनेता (मेल): अभिषेक बच्चन (आय वॉन्ट टू टॉक) आणि कार्तिक आर्यन (चंदू चॅम्पियन) यांना संयुक्तपणे.
* उत्कृष्ट अभिनेत्री (फिमेल): आलिया भट्ट (जिगरा).
* उत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स): राजकुमार राव (स्त्री २).
* उत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स): प्रतिभा रांटा (लापता लेडीज).
* उत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण): आदित्य सुहास जांभळे (आर्टिकल ३७०) आणि कुणाल खेमू (मडगाव एक्सप्रेस) संयुक्तपणे.
* उत्कृष्ट अभिनेता (पदार्पण): लक्ष्य (किल)